Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

वैष्णवांच्या मेळ्यात संचारले भक्तीचे चैतन्य!
पुणे, १८ जून/ प्रतिनिधी

 

संत ज्ञानेश्वर माउली व संत तुकोबारायांची पालखी अन् वैष्णवांच्या सहवासाने पुण्यनगरीत आज भक्तीचे अनोखे चैतन्य निर्माण झाले. ‘साधू संत येती घरा, तोच दिवाळी दसरा’ असे म्हणत अवघ्या पुणेकरांनी आनंदोत्सव साजरा करीत वारक ऱ्यांची मनोभावे सेवा केली. शहरातील विविध संस्था, मंडळे व व्यक्तींनी वारकऱ्यांसाठी विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्याचप्रमाणे चहापासून सुग्रास भोजनापर्यंतची व्यवस्था करण्यात आली होती.
माउली व तुकोबारायांची पालखी काल पुणे शहरामध्ये दाखल झाली. त्या वेळी पुणेकरांनी मोठय़ा जल्लोषात पालख्यांचे स्वागत केले. रात्री नऊच्या दरम्यान पालखी विठोबा मंदिरात माउलींची पालखी, तर निवडुंग्या विठोबा मंदिरात तुकोबांची पालखी मुक्कामासाठी पोहोचली. त्या ठिकाणी रात्री कीर्तन व जागर झाला. आज भल्या पहाटेच दोन्ही मंदिरांमध्ये पालख्यांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. तत्पूर्वी पहाटे संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख विश्वस्त सुधीर िपपळे यांच्या हस्ते माउलींच्या पादुकांची पूजा झाली. दुपारी बारा वाजता महानैवेद्याचा कार्यक्रम झाला. तुकोबांच्या पादुकांची पहाटे चार वाजता देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र मोरे, बाळासाहेब मोरे, विश्वजित मोरे, सूर्यकांत मोरे यांच्या हस्ते पूजा झाली.
दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी मंदिराच्या बाहेर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. रांगेमध्ये प्रामुख्याने महिलांचा समावेश मोठा होता. पादुकांवर डोके टेकवून बाहेर आलेल्या भाविकाच्या चेहऱ्यावर धन्यतेचे भाव दिसत होते. पालखीचा मुक्काम असलेल्या परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. प्रत्येकजण आपापल्या परीने भक्तीच्या या सोहळ्यामध्ये योगदान देताना दिसत होता. याच ठिकाणी वारकऱ्यांसाठी विविध संस्था व मंडळांच्या वतीने विविध सेवा- सुविधा पुरविण्यात आल्या. शहराच्या इतर भागात वारक ऱ्यांच्या वास्तव्याने शहराचा नूरच पालटून गेला होता. ठिकठिकाणी झालेली कीर्तने, टाळ-मृदंगाच्या गजराने अवघी नगरी दुमदुमून गेली होती.
संध्याकाळनंतर पालख्यांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली होती. रात्री उशिरापर्यंत गर्दी कायम होती. रात्री तुकोबांच्या पालखीसमोर धोंडोपंत दादा िदडीचे कीर्तन झाले, तर देशमुख यांचा जागर झाला. माउलींच्या पालखीसमोरही कीर्तन व जागराचा कार्यक्रम झाला. माउलींची पालखी उद्या (शुक्रवार) सकाळी सहा वाजता सासवड मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे. त्याचप्रमाणे तुकोबांची पालखीही सकाळी सहा वाजता लोणी मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे.
विद्यापीठाची हरित ऊर्जा दिंडी
पुणे विद्यापीठाच्या समर्थ भारत अभियानाअंतर्गत काढण्यात आलेली हरित ऊर्जा िदडी आज आषाढी वारीमध्ये सहभागी झाली. प्रभारी कुलगुरू यांच्या हस्ते या िदडीचे उद्घाटन झाले. अडसूळ यांच्यासह डॉ. पंडित विद्यासागर, डॉ. माणिक जाधव, डॉ. संभाजी पठारे, डॉ. संजय चाकणे, संजय गवई आदी प्रमुख िदडीमध्ये सहभागी झाले होते. दिंडीत ११५ विद्याथ्यरंनी सहभाग घेतला असून, ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ऊर्जा बचत, आदी संदेश हे विद्यार्थी देणार आहेत.
वारकऱ्यांना विविध वस्तूंचे वाटप
महात्मा फुले मंडई परिसरात श्री स्वामी समर्थ व्यापारी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे वारकऱ्यांनी चहा, नाश्ता, बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात नगरसेविका माधुरी मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र कासुर्डे, अजय डहाळे, विजय मोरे, शरद मोरे, बाबा मिसाळ आदींनी उपक्रमाचे संयोजन केले. गांजवेवाडी येथे राजेंद्र गांजवे व स्वामी ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांच्या भोजनाची व निवासाची व्यवस्था करण्यात आली. त्याचप्रमाणे माऊलींच्या पालखीतील २० क्रमांकाच्या दिंडीला तंबू भेट देण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने वारकऱ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. सेनेच्या पर्वती विभागाच्या अध्यक्षा रसिदा पटेल यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. सिकंदर पटेल, दीपक गायकवाड, मेहरबान राजबीर, अस्मान बियाबानी, जावेद तांबोळी, सलीम शेख, अजीज पटेल त्या वेळी उपस्थित होते.
महालक्ष्मी कल्याण केंद्र व भारतभाई तुरखिया यांच्या नॅशनल कॅप मार्केटच्या वतीने वारकऱ्यांना छत्र्या व रेटकोटचे वाटप करण्यात आले. भरतभाई तुररखिया, व्यंकटेश तुरसिया, शेफाली खत्री, दर्शना मोर. िडपल सागर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.
राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्तीचे शहराध्यक्ष आयाझ पठाण यांच्या हस्ते वारकऱ्यांना फराळ वाटप करण्यात आले. अ‍ॅडकॅब इंडियाच्या वतीने वारकऱ्यांना लाडूवाटप करण्यात आले.
वारकऱ्यांची आरोग्य तपासणी
कसबा मतदार संघ शिवसेना, स्थानिक लोकाधिकार समिती, भवानी पेठ व्यापारी मंडळ, नाईट ग्रुप, शेठ ताराचंद रामनाथ रुग्णालय व हार्डीकर रुग्णालय यांच्या वतीने धर्मवीर डावरे चौकामध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. सुमारे सात हजार वारकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला. रामभाऊ पारीख, मोहन दुधाणे, राजेंद्र कुले यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. त्याचप्रमाणे बारा हजार वारकऱ्यांना गजानन पंडित, राजेंद्र शिंदे, संदीप मोरे, उत्तम भुजबळ यांच्या हस्ते प्लास्टिकच्या घोंगडय़ांचे वाटप करण्यात आले.विजयशेठ गुजराथी, धनराज शेठ शहा, आनंद अगरवाल यांच्या हस्ते चहा वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांना औषध व अल्पोपाहाराचे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानचे सचिव अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला आदी त्या वेळी उपस्थित होते.
शिवसेनेच्या प्रवक्तया डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी व फिरत्या औषधोपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. राधिका हरिश्चंद्रे, साधना खरे, हुजुर इनामदार, डॉ. अनिल वाबळे त्या वेळी उपस्थित होते. फिरत्या औषधोपचार केंद्रामध्ये ऑक्सीजनचीही सुविधा आहे. संपूर्ण वारीमध्ये हे केंद्र उपलब्ध राहणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेच्या वतीने वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. डॉ. शरद अगरखेडकर, डॉ. माया तुळपुळे, डॉ. अरूण हळबे, यांनी संयोजन केले. सिंबायोसिस सेंटर ऑफ हेल्थ केअर व शीला राज साळवे मेमोरियअल ट्रस्टच्या वतीने वारीत आरोग्यसेवा पुरविण्यासाठी रुग्णवाहिका पुरविण्यात आली आहे. या सुविधेचे उद्घाटन सिंबायोसिसचे अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात आले. मुक्तांगण संस्थेच्या वतीने तंबाखू सोडण्याबाबतचा संदेश वारकऱ्यांना देण्यात आला. ‘हरिमुखे म्हणा तंबाखूला निरोप द्या’ असा संदेश देत संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांमध्ये जागृती केली. अरिहंत ग्रुप व अरिहंत महिला मंडळाच्या वतीने मंगळवार पेठेतील छाजेड चौकात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. वनमंत्री बबनराव पाचपुते तसेच पोपटलाल ओस्तवाल यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
बीएसएनएलची मोफत दूरध्वनी सेवा
राज्यात कुठेही मोफत दूरध्वनी करण्याची सुविधा बीएसएनएलच्या वतीने वारकऱ्यांना आज पुरविण्यात आली. सुमारे १२ हजार वारकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला. त्याचप्रमाणे बाजीराव रस्त्यावरील टेलीफोन भवन येथे वारकऱ्यांच्या भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. प्रधान महाप्रबंधक व्ही. के. महेंद्र यांच्या हस्ते वारकऱ्यांना टोप्यांचे वाटप करण्यात आले. महाप्रबंधक श्री. मोल, उपमहाप्रबंधक श्री पाठक, बीएसएनएल एप्लॉईज युनियनचे जिल्हा सचिव नागेश नलावडे त्या वेळी उपस्थित होते.
वारकऱ्यांमध्ये नेत्रदानाबाबत जागृती
शंकरराव भोई स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांसाठी मरणोत्तर नेत्रदानाबाबत जागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. मिलिंद भोई यांनी वारकऱ्यांना याबाबतची माहिती दिली. नेत्रदानाचे महत्त्व पटवून देत विविध गैरसमज दूर केले. या उपक्रमात १,५७२ वारकऱ्यांनी नेत्रदानाचे अर्ज भरले. डीएसके फाउंडेशनच्या वतीने तयार करण्यात आलेल्या तुकाराम गाथेचे प्रकाशन प्रा. वसंत नूलकर व फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय दीक्षित यांच्या हस्ते झाले. ही गाथा भाविकांना केवळ २० रुपयांत उपलब्ध करून देण्यात आली. सावकाश रिक्षा संघटनेच्या वतीने कस्तुरे चौक ते पर्वती या मार्गावर वारकऱ्यांसाठी मोफत रिक्षा उपक्रम राबविण्यात आला. प्रदीप भालेराव यांनी त्याचे संयोजन केले.