Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

चिंचवडमधील गणगे प्रशालेच्या मुख्याध्यापकाचा अपघाती मृत्यू
पिंपरी, १८ जून / प्रतिनिधी

 

चिंचवड कृष्णानगर येथील गणगे प्रशालेच्या मुख्याध्यापकांचा बुधवारी सकाळी त्यांच्या घराजवळ झालेल्या अपघातामध्ये टेम्पोच्या धडकेने मृत्यू झाला. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देहूरोड पोलीस ठाण्याचे हवालदार गोकुळ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग पंढरीनाथ आगलावे (वय ४५, रा. शिवाजी पार्क, चिंचवड) असे अपघाती मृत्युमुखी पडलेल्या मुख्याध्यापकांचे नाव आहे.
पोलिसांनी टेम्पोचा चालक अनिल दिनकर गुनवणे (वय २९, रा. सावकार चौक, मोरेवस्ती, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आगलावे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास घराकडे येत होते. दरम्यान, चुकीच्या दिशेने येणाऱ्या एमएच १४ एफ ९१७० या टेम्पोची त्यांच्या मोटारसायकलीस धडक बसली. यात आगलावे सर गाडीवरून खाली पडले. त्यांच्या अंगावरून टेम्पोचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी अधिक तपास सहायक फौजदार बी. डी. मोंदळे, हवालदार भारत चव्हाण, गोकुळ शिंदे करीत आहेत. त्यांच्या मृत्यूची माहिती शाळेतल्या शिक्षकांना कळताच शाळेला सुटी देण्यात आली.
आगलावे सरांच्या मागे पत्नी, दोन लहान मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोलापूर जिल्हय़ातील बार्शी तालुक्यात असलेल्या बावी या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.