Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

राष्ट्रीय नमुना पाहणीसाठी अन्वेषकांची कमतरता
पिंपरी, १८ जून / प्रतिनिधी

 

राष्ट्रीय नमुना पाहणीसाठी राष्ट्रीय स्तरावर अन्वेषकांची मोठी कमतरता असल्याने आता कंत्राटी पध्दतीवर ६५० अन्वेषक एक वर्षांसाठी नियुक्ती करणार असल्याची माहिती ,या विभागाचे कें द्रीय उपसरव्यवस्थापक सर्वेशकुमार यांनी आज येथे पत्रकारांना दिली.
या विभागामार्फत येत्या वर्षांत सामाजिक व आर्थिक नमुना पाहणी करण्यात येणार आहे.ही पाहणी करणाऱ्या अन्वेषकांसाठी तीन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.त्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमानंतर ते पत्रकाराशी बोलत होते.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सामाजिक - आर्थिक म्हणजेच ग्राहकांची खर्च करण्याची क्षमता तसेच रोजगार - बेरोजगारीची नमुना पाहणी होणार आहे. येत्या एक जुलै पासून या पाहणीला सुरुवात होत आहे ,ती पुढच्या जून अखेपर्यंत पूर्ण होईल.या पाहणीत माहिती घेण्यासाठी अन्वेषकांची जी कमतरता आहे ती भरुन काढण्यासाठी कंत्राटी पध्दतीने वर्षभरापुरते लोक घेतले जातील.श्रम मंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.पुणे विभागात ३२ अन्वेषकांची कमी आहे,असे त्यांनी सांगितले.
केंद्र सकरकारने नुकताच ‘कलेक्शन ऑफ स्टॅटिस्टीक’ हा कायदा मंजूर केला.त्यामुळे यापुढे एखाद्या सरकारी पाहणीत माहिती देणे बंधनकारक असणार आहे.मात्र या पाहणीचा तपशील गुप्त राखला जाईल.अलिकडे लोक अशा अनेक प्रकारच्या पाहण्यांमुळे वैतागल्याचे दिसते . त्यासाठी लोकांचा योग्य तो प्रतिसाद मिळावा म्हणून प्रबोधनात्मक विविध कार्यक्रम विभागाने हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ,पाहणी करायला जाणाऱ्या अन्वेषकांनाच आपण ही माहिती का व कशासाठी गोळा करत आहोत, त्याचा काय उपयोग केला जाणार आहे याची पुरेशी कल्पना नसते.त्यासाठीच असे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित गरजेचे वाटतात, असे ते म्हणाले. या विभागाचे सहसंचालक एस.बी.दराडे,वरिष्ठ अधीक्षक ए.के.चव्हाण आदी व्यासपीठावर होते.