Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

संकेतस्थळावर मिळणार फेरफारचेही उतारे
पुणे, १८ जून / खास प्रतिनिधी

 

हस्तलिखित सातबारा उतारे देण्याच्या प्रक्रियेतून तलाठय़ांना हद्दपार करण्याची पहिली पायरी म्हणून भूमि अभिलेख खात्याच्या संकेतस्थळावर सातबारा उतारे उपलब्ध करण्यात आले आहेत. तलाठय़ांचे हे अधिकार गोठवितानाच शेतजमिनीची १९५० पासूनचे फेरफार उतारेही संकेतस्थळावर देण्याची सोय लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे.
राज्यातील सुमारे २ कोटी ११ लाख सातबारा उताऱ्यांची नोंद संगणकावर घेण्याचे काम भूमि अभिलेख खात्याने पूर्ण केले आहे. हे पूर्णत्वास गेल्यामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांनी संगणकीकृत सातबारा उतारे देण्याची व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात महसुली गावांत तलाठय़ांमार्फत मिळणारे हस्तलिखित सातबारा उतारे बंद करण्याचा निर्णय महसूल खात्याने घेतला आहे. या गावांतील शेतजमिनींचे सातबारा उतारे तलाठय़ांऐवजी तहसील कार्यालयातील सेतू वा नागरी सुविधा केंद्रातून दिले जाणार आहेत. अशा पद्धतीने उतारे देण्यास पुण्यासह राज्यात काही ठिकाणी सुरूवातही करण्यात आली आहे.
नागरिकांना घरबसल्या आपल्या जमिनीचे सातबारा उतारे पाहता यावेत तसेच त्याच्या संगणकीकृत प्रती मिळविता याव्यात यासाठी संकेतस्थळही सुरू करण्यात
आले आहे. भूमिअभिलेख खात्याच्या www.mahabhulekh.nic.in आणि www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ‘लँड रेकॉर्ड’वर जाऊन हे उतारे पाहता येणार आहेत. संगणकावरून काढलेल्या सातबारा उताऱ्याच्या प्रती मात्र जमीन-खरेदी विक्रीसाठी ग्राह्य़ धरल्या जाणार नाहीत. तसेच कायदेशीर पुरावा म्हणून त्या ग्राह्य़ धरल्या जाणार नाहीत. तहसील कार्यालयातील सेतू वा नागरी सुविधा केंद्रातून शिक्का मारून उतारे घेतल्यासच त्याला कायदेशीर प्रत म्हणून मान्यता मिळणार आहे.
भूमि अभिलेख खात्याच्या संकेतस्थळावरून काढलेल्या प्रती या नागरिकांच्या माहितीसाठी अमूल्य साठा ठरणार आहेत. तलाठय़ांना हाताशी धरून अपरोक्षपणे वा लँडमाफियांकडून जमिनीच्या सातबारा उताऱ्यात होणाऱ्या गडबडी रोखण्यासाठी या संकेतस्थळावरील नोंदींचा उपयोग सर्वसामान्यांना होणार आहे. या बदलांबरोबरच नागरिकांना जमिनीचे फेरफार उतारे मिळण्याची सोय लवकरच या संकेतस्थळामार्फत केली जाणार आहे.