Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मतदार ओळखपत्रांसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत!
पुणे, १८ जून / खास प्रतिनिधी

 

मतदार ओळखपत्रांसाठी दाखविली जाणारी उदासीनता आणि शासकीय यंत्रणेला मतदारांपर्यंत पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन या कामासाठी प्रथमच सेवाभावी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच या संस्थांचे स्वयंसेवक मतदारांच्या घरी जाऊन ओळखपत्रांसाठी मतदारांची छायाचित्रे घेण्याचे काम विनामोबदला करणार आहेत.
जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी पुण्यातील ३५ स्वयंसेवी संस्थांशी याबाबत आज चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रयोग करण्यात येत असून त्याद्वारे ओळखपत्र देण्याचे काम शंभर टक्के पूर्ण करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीबरोबरच शहरातील अकरा विधानसभा मतदारसंघांत ओळखपत्रांसाठी छायाचित्र घेण्यासाठी प्रत्येकी पाच ठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे. ग्रामीण भागातील दहा विधानसभा मतदारसंघांतही अशी व्यवस्था करण्यात आहे. या व्यवस्थेद्वारे ओळखपत्र देण्याचे काम पुढील आठवडय़ात सुरू होणार आहे.
ओखळपत्रासाठी छायाचित्र देण्यास मतदारांना उद्युक्त करण्यासाठी या संस्थांच्या स्वयंसेवकांना ओळखपत्रे दिली जाणार आहेत. त्यांच्यामार्फत मतदार नोंदणीच्या अर्जासह छायाचित्र घेण्याचेही काम केले जाणार आहे. तसेच ‘बीएलओ’ समवेत ओळखपत्रांसाठी आलेले अर्ज, नावे यांची यादी करण्याचे काम या संस्थांचे प्रतिनिधी करणार आहेत. या संस्थांनी ओळखपत्रांबाबत जनजागृती करावी अशी अपेक्षा आहे, असेही जिल्हाधिकारी दळवी यांनी स्पष्ट केले.
शहरातील अकरा मतदारसंघांपैकी हडपसर मतदारसंघांत ओळखपत्र देण्याचे सर्वात कमी म्हणजे ३७ टक्के काम झाले आहे. पर्वती व भोसरी मतदारसंघात ४१ टक्के, वडगावशेरी ४२ टक्के, कोथरूडमध्ये ४३, खडकवासला व शिवाजीनगरमध्ये ४४ टक्के काम झाले आहे. केवळ कसबा विधानसभा मतदारसंघात ५७ टक्के काम होऊ शकले आहे. शहरी भागातील मतदारसंघांत ५५ टक्के काम झाले आहे. ग्रामीण भागातील इंदापूर मतदारसंघात ८६ टक्के, बारामतीत ७९ टक्के, भोरमध्ये ७२ टक्के तर खेडमध्ये सर्वात कमी ६२ टक्के काम झाले आहे. ग्रामीण भागात ओळखपत्र काढण्याचे काम ७० टक्के झाले आहे, असेही दळवी यांनी सांगितले.

ओळखपत्रांत पुणे शेवटी!
मतदार ओळखपत्र देण्याच्या कामात देशात महाराष्ट्र राज्य शेवटच्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्हा या कामात शेवटचा राहिला आहे आणि जिल्ह्य़ातील शहरी भाग ओळखपत्र देण्यात सर्वात मागे आहे. ग्रामीण भागात चांगले काम झाले असले तरी शहरी भाग फारच मागे आहे. त्यामुळे येत्या काळात पुणे शहर व जिल्ह्य़ात ओळखपत्रांचे ९५ टक्के काम पूर्ण करण्याचा निर्धार आहे, असेही जिल्हाधिकारी दळवी यांनी सांगितले.