Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कामगार नेत्यावरील कारवाईचा तीव्र निषेध
पिंपरी, १८ जून / प्रतिनिधी

 

चाकण औद्योगिक वसाहतीमधील ‘बॉश चॅसिस सिस्टीम’ कंपनी व्यवस्थापनाने कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर आकसाने केलेल्या निलंबन कारवाईचा तीव्र निषेध आज येथे कामगारांच्या विशेष सर्वसाधरण सभेत करण्यात आला.
बॉश चॅसिस सिस्टीम्स् कामगार संघटनेच्या वतीने विशेष सर्वसाधरण सभा ज्ञानेश्वर मंगल कार्यालय भोसरी येथे आज दुपारी आयोजित करण्यात आली होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकळे होते.
बॉश कामगार संघटनेचे अध्यक्ष बबन शेलार, सरचिटणीस प्रदीप ठाकरे, सॅण्डविक एशिया कामगार संघटनेचे सरचिटणीस मारुती जगदाळे, थरमॅक्स कामगार संघटनेचे अध्यक्ष केशव घोळवे, जेसीबी कामगारांचे नेते नीलेश काळोखे व्यासपीठावर उपस्थित होते.
व्यवस्थापनाने कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रदीप ठाकरे यांच्यावर आकसाने खोटे आरोप करुन त्यांना अचानक निलंबित केले. या कारवाईचा तीव्र निषेध सभेत करण्यात आला.
कंपनीने सूडबुध्दीने केलेली कारवाई त्वरित मागे घ्यावी अन्यथा व्यवस्थापना विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ढोकळे यांनी दिला.
कंपनी व्यवस्थापनाने सर्व कायदे धाब्यावर बसवून कायम व नियमित स्वरुपाची कामे ठेकेदारी पध्दतीने कंत्राटी कामगारांकडून करुन घेतली. ही पद्धत ताबडतोबीने थांबली पाहिजे, समान कामाला समान वेतन मिळाले पाहिजे, कंत्राटी कामगारांचे शोषण थांबले पाहिजे आदी ठराव या सभेत मंजूर करण्यात आले.
व्यवस्थापनाने कामगार कार्यकर्त्यांवर आकसाने केलेल्या कारवाईमुळे त्या कामगाराचे आर्थिक नुकसान होत असेल तर अशा कामगार कार्यकर्त्यांस युनियन फंडातून आर्थिक मदत करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर
करण्यात आला.
या प्रसंगी मारुती जगदाळे, केशव घोळवे, नीलेश काळोखे यांनी या कामगारांच्या आंदोलनास पाठिंबा दिला.तसेच इंटर नॅशनल मेटल फेडरेशन या आंतरराष्ट्रीय
कामगार संघटनेने दूरध्वनीवरुन पाठिंबा व्यक्त केल्याचे ढोकळे यांनी सभेत जाहीर केले.
कामगारांनी त्याचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. प्रास्ताविक प्रदीप ठाकरे यांनी, तर सूत्रसंचालन नकुल महाजन यांनी केले.
अजित आल्हाट यांनी आभार मानले.