Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘व्ही. शांताराम’ पुरस्कार पाठक यांना मिळावा - सुलोचनादीदी
पुणे, १८ जून/प्रतिनिधी

 

ज्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमुळे मराठी चित्रपटांना पुरस्कार देण्याची प्रथा राज्य शासनाने सुरू केली अशा मधुकर पाठक यांना शासनातर्फे ‘व्ही. शांताराम पुरस्कार मिळावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ लेखक व दिग्दर्शक मधुकर गोपाळ पाठक यांच्या चित्रपट क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या ‘दिग्दर्शकाचा दस्ताऐवज’ माहितीपटाच्या या सीडीचे प्रकाशन सुलोचनादीदी यांच्या हस्ते आज झाले. या प्रसंगी त्या बोलत होत्या.
या वेळी दिवंगत राम शेवाळकर यांनी संपादित केलेल्या पाठक यांच्या ‘विजांची साखळी’ व ‘दिव्याची अवस’ या निवडक कथासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी दिग्दर्शक योगेश्वर गंधे, चित्रकार रविमुकल, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक विजय जाधव, अनुबंध प्रकाशनचे अनिल कुलकर्णी उपस्थित होते.
सुलोचनादीदी म्हणाल्या की, बाबांनी (पाठक यांनी) दिग्दर्शित केलेला प्रपंच हा चित्रपट अतिशय दर्जेदार होता. या चित्रपटाला राज्य शासनाच्या चित्रपट महोत्सवात पुरस्काराने गौरविण्यात आले.
राज्य शासनातर्फे मराठी चित्रपटांना पुरस्कार देण्यास हा चित्रपट कारणीभूत ठरला. त्यानंतर या पुरस्काराची प्रथा आजपर्यंत कायम आहे. त्यामुळे मधुकर पाठक यांना ‘व्ही. शांताराम’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे.
डॉ. कुलकर्णी म्हणाले की, बाबांच्या कथा ग्रामीण परंपरेतून आल्या आहेत. त्यामुळे त्या अधिक वास्तव व अर्थाचा दृश्यात्मक प्रत्यय देणाऱ्या असतात. त्यांनी लिहिलेली ‘गोमे वाडीची कुंदा’ ही कथा मराठीतील सवरेत्कृष्ट कथा आहे. या कथेचा शालेय पाठय़पुस्तकात समावेश व्हावा, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
जाधव, पाठक, रविमुकुल आणि गंधे यांनी मनोगत व्यक्त केले. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमानंतर दिग्दर्शकाचा दस्ताऐवज हा माहितीपट सादर करण्यात आला.