Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

उड्डाणपुलाखालील रस्त्यामुळे अपघात टळणार
हडपसर, १८ जून / वार्ताहर

 

पुणे-सोलापूर रस्त्यावरील वैदूवाडी ते हडपसर औद्योगिक वसाहत येथे नागरिकांच्या वहिवाटीसाठी उड्डाणपुलाखालून रस्ता करण्यात आला आहे. याचा वापर नागरिकांनी केल्यास वाहतुकीची कोंडी व होणारे संभाव्य अपघातही टाळता येऊ शकतील.
किलरेस्कर न्यूमॅटिक, इंडियन ह्य़ूमन पाईप कंपनी ते वैदूवाडी दरम्यान उड्डाणपुलाखाली भुयारी मार्ग तयार करण्यात आलेला आहे. तसेच बस प्रवाशांना उड्डाण पुलावरून किलरेस्कर न्यूमॅटिक कंपनीकडे वा वैदूवाडीकडे जाता येता यावे यासाठी उड्डाण पुलाच्या मध्यभागातून ही दोन्ही बाजूस खाली उतरून जाण्यासाठी पायऱ्या बनविण्यात आल्या आहेत. याचा वापर नागरिकांनी केल्यास वाहतुकीची कोंडी व संभाव्य अपघातही टाळता येऊ शकतील.
परंतु या रस्त्याच्या वहिवाटीसंदर्भातील माहिती बहुतांश नागरिकांना नसल्याने त्याचा वापर फारसा होत नसल्याचे दिसून येते. थोडीशी साफसफाई व लाइटची पूर्ण व्यवस्था व माहिती फलक लावल्यास त्याचा वापर होऊ शकतो. यामुळे उड्डाणपुलावरून येणारी वाहने व रस्ता ओलांडणाऱ्यांची तारांबळ टाळता येईल.
बाजूलाच वाहतूक नियंत्रण शाखचे कार्यालय, बीआरटीचा रस्ता, चौकातून एकाच वेळी सुटणारी वाहने यामुळे अपघाताचा धोकाच जास्त संभवतो.
योग्य नियोजन व नागरिकांना सोयीचा रस्ता झाल्यास त्याचा फायदाच होऊ शकेल. यासाठी हजारो रुपये खर्च करून केलेल्या सुविधांचा वापर नागरिकांकडून न झाल्यास तो खर्च व्यर्थच म्हणण्याची वेळ येते. यासाठी प्रशासनाने आहे त्या सुविधांनी देखभाल करून वळण लावल्यास सर्वाचाच फायदा होऊ शकेल असे जाणकारांचे मत आहे.