Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पिपरीत उद्यानाच्या जागेत हॉकर्स झोन?
पिपरी, १८ जून/प्रतिनिधी

 

पिपरीनगर येथील साधू वासवानी उद्यानातील झाडे तोडून त्या ठिकाणी हॉकर्स झोन निर्माण करण्याच्या विषयावरून पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या सभेत आज चांगलाच वाद झाला. याबाबत निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची भूमिका घेत अतिरिक्त आयुक्त सुभाष डुंबरे यांनी वेळ निभावून नेली.
िपपरीतील साधू वासवानी उद्यानातील अशोकाची आठ, सुरुची चार, सिल्व्हर ओकची तीन, टिकोया ऑन्सची दोन, िपपळे, संकेश्वराची प्रत्येकी एक याप्रमाणे १९ झाडे हॉकर्स झोनसाठी तोडण्याचा विषय वृक्ष प्राधिकरणाच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.
हॉकर्स झोनला विरोध नाही, मात्र झाडे तोडून हा प्रकल्प राबविण्यात येऊ नये, अशी भूमिका समिती सदस्यांनी घेतली. तथापि या भागातील नगरसेवक रामआधार धारिया यांनी सभेत येऊन हा विषय मंजूर करण्याची विनंती सदस्यांना केली. सदस्य आपल्या भूमिकेशी ठाम राहिल्याने बराच वादविवाद झाला.
एकदा अशाप्रकारची मंजुरी दिली तर सगळेच नगरसेवक उद्यानाच्या जागेत हॉकर्स झोन करण्याचा आग्रह धरतील आणि नको तो पायंडा पडेल, अशी भीती सदस्यांनी व्यक्त
केली.
अखेर वादविवाद वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन डुंबरे यांनी याबाबतचा निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करू, अशी भूमिका घेतली. दरम्यान, पुढील आठवडय़ात पर्यावरणप्रेमींची बैठक आयोजित करण्याचा निर्णय आजच्या सभेत घेण्यात आला.