Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ‘स्वाईन फ्लू’साठी स्वतंत्र वॉर्ड!
पुणे, १८ जून / प्रतिनिधी

‘स्वाईन फ्लय़ू’च्या संशयित रुग्णांच्या संख्येत चांगलीच भर पडत असल्याने आरोग्य विभागाने आता राज्यातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड (आयसोलेशन वॉर्ड) तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार संशयित रुग्णांवर त्या त्या जिल्ह्य़ातील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येतील. दरम्यान, पुण्यात आणखी दोन ‘स्वाईन फ्लय़ू’ च्या रुग्णांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच काल दाखल झालेल्या चार रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

नव्या गाडय़ांची खरेदी पीएमपीच्या नावानेच करण्याचे आदेश
पुणे, १८ जून/ प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या नेहरू योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानातून पीएमपीने नव्या गाडय़ांची खरेदी खासगी वाहतूकदारांच्या नावाने न करता नव्या गाडय़ा स्वत:च्या नावानेच खरेदी कराव्यात, असा स्पष्ट आदेश मुंबईत झालेल्या बैठकीत आज पीएमपी प्रशासनाला शासनातर्फे देण्यात आला.
पीएमपीने सुरू केलेली गाडय़ा खरेदीची प्रक्रिया वादग्रस्त ठरलेली असतानाच आज मंत्रालयात या बाबत बैठक बोलावण्यात आली होती. नगर विकास खात्याचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी ही बैठक बोलावली होती.

चिंचवड स्टेशन चौकात भर दिवसा तरुणाचा भोसकून खून
पिंपरी, १८ जून / प्रतिनिधी

चिंचवड स्टेशन येथील शिवाजी चौकात आज भर दुपारी पावणेतीनच्या सुमारास तरुणाचा पूर्व वैमनस्यातून भोसकून खून करण्यात आला. पिंपरी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा खून झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल भगवान पवार (वय १९, रा. पंचशील हॉटेलमागे, इंदिरानगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

शहरात रविवारपासून वीस टक्के पाणीकपात
महापालिकेला पत्र रवाना

पुणे, १८ जून / खास प्रतिनिधी

दीर्घकाळ लांबलेला पाऊस आणि धरणांतील झपाटय़ाने कमी होणारा पाणीसाठा यामुळे पुणे शहराच्या पाणीपुरवठय़ात रविवारपासून (दि. २१) वीस टक्के कपात करण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने घेतला आहे. पाणीकपातीबाबतचे पत्र पाटबंधारे खात्याने महापालिकेला दिले असून उद्या, शुक्रवारी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

वैष्णवांचा धर्म
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म।
भेदाभेद भ्रम अमंगळ।।

संतांनी ज्या श्रीविठ्ठलाची भक्ती केली तो पंढरीचा पांडुरंग हा मूलत: गोकुळीचा श्रीकृष्ण असून खरा ‘लोकनेता’ आहे. सामान्यांतील असामान्य शक्ती ओळखून, त्यांना संघटित करून अलौकीक कार्य करणारा भगवान श्रीकृष्ण हा ‘पुरुषोत्तम’ आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन गोकुळातल्या सर्व गवळ्यांच्या पोरांना एका प्रेमाच्या धाग्यानं बांधून श्रीकृष्णानं अनेक मनोहारी लीला केल्या.

वृक्ष तपासणीचे त्रयस्थांकडून ‘सोशल ऑडिट’ करून घ्या
लोकायुक्तांचा महापालिकेला आदेश
पुणे, १८ जून/प्रतिनिधी
झाडांची लागवड आणि त्यांची काळजी या दृष्टीने शहरात नियमितपणे वृक्षगणना व झाडांची तपासणी करावी, या तपासणीचे ‘व्हीडीओ’ चित्रिकरण आणि या सर्व प्रक्रियेचे त्रयस्थ संस्थेकडून ‘सोशल ऑडिट’ करून घ्यावे, असे आदेश राज्याच्या लोकायुक्तांनी महापालिकेला दिले आहेत.

लाचप्रकरणातील अधिकाऱ्यांची जामिनावर सुटका
पुणे, १८ जून/प्रतिनिधी

खासगी सॉफ्टवेअर कंपनीच्या अधिकाऱ्याकडून पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रकाश कमलाकर बारवकर यांच्यासह सहायक आयुक्त दिलीप उत्पात या दोघांची अनुक्रमे पंचवीस आणि दहा हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली. या दोघांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी काल अटक केली होती. याबाबत कोथरूडमधील होरायझन डेटा सिस्टिम्स या खासगी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. कंपनीला ‘सव्‍‌र्हिस टॅक्स’ विभागाकडून २००८-०९ या सालासाठी साडेनऊ लाखांचा परतावा मिळणार होता. ही रक्कम कंपनीला देण्यासाठी दोघा अधिकाऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे पंचवीस हजारांची लाच मागितली. त्यावेळी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्या दोघांना काल अटक केली होती.

पिंपरी-काळेवाडी पुलाच्या मार्गातील अडथळा दूर
न्यायालयाने स्थगिती उठविली
पिंपरी, १८ जून / प्रतिनिधी

पिंपरी-काळेवाडी मार्गावरील पुलाच्या कामावर न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यात आली आहे. त्यामुळे या कामातील अडथळा दूर झाला असून आता रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची ग्वाही पालिकेने दिली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने िपपरीगाव ते काळेवाडी जोडणाऱ्या मार्गावर पूल बांधण्यात आला आहे. तथापि, पोहोच रस्त्याच्या जागेच्या वादातून नाणेकर कुटुंबीयांनी पालिकेच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार, २५ मे २००९ रोजी ‘जैसे थे’ चा आदेश न्यायालयाने दिला होता. या पाश्र्वभूमीवर, आज आकुर्डी न्यायालयात न्यायमूर्ती व्ही. एल. भोसले यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत यापूर्वी देण्यात आलेला ‘जैसे थे’ चा आदेश रद्द ठरविला आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे पावसाळ्यास सुरुवात होण्यापूर्वी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुभाष डुंबरे यांनी म्हटले आहे.

पिंपरीत नवीन रक्तपेढीस प्रारंभ
पिंपरी, १८ जून / प्रतिनिधी
जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून िपपरी सिरॉलॉजिकल इन्स्टिटय़ूट ब्लड बँकेच्या माध्यमातून िपपरी-चिंचवड शहरात आणखी एक रक्तपेढी उभारण्यात आली असून महापौर अपर्णा डोके यांच्या हस्ते त्या रक्तपेढीचे उद्घाटन करण्यात आले.
खराळवाडी येथील इस्टिम टॉवर्सच्या चौथ्या मजल्यावर ही रक्तपेढी आहे. त्यामध्ये रक्ताचे विघटन करणाऱ्या सर्व यंत्रणा परिपूर्ण असून रक्ताच्या शुद्धतेची तपासणी करणारी अत्याधुनिक यंत्रणा सुसज्ज आहे. तज्ज्ञ डॉक्टर्स व कर्मचारीही या रक्तपेढीत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ व गैरसोय टाळण्यासाठी २४ तास रक्तपेढी खुली राहणार आहे, अशी माहिती डॉ. धर्मेश गांधी तसेच संजय चौधरी यांनी या वेळी दिली.पिंपरी - चिंचवड शहरातील कोणत्याही रुग्णालयामध्ये कोणत्याही रुग्णाची रक्तावाचून गैरसोय होणार नाही, यासाठी रक्तपेढी सदैव प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही डॉ. गांधी यांनी दिली.

वारक ऱ्यांच्या सेवेसाठी मोफत वैद्यकीय पथक
पिंपरी, १८ जून / प्रतिनिधी

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमवेत वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्याचा उपक्रम भोसरी लायन्स क्लबच्या वतीने राबविण्यात येत आहे. तीन रुग्णवाहिका, सहा डॉक्टर, चार परिचारिका व १० कर्मचारी असे पथक पंढरपूपर्यंत जाणार आहे. डॉ. रोहिदास आल्हाट व मुरलीधर साठे यांनी पुढाकार घेतला. डॉ. भगवान वारखेडे यांच्या नेतृत्वाखाली १५ दिवसांसाठी हे पथक काल रवाना झाले. नगरसेवक वसंत लोंढे, लायन्सचे सुशील मुथीयान यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मराठवाडा मित्र मंडळाचे वेंकटराव शिंदे, डॉ. अनु गायकवाड, चंद्रकांत सोनटक्के, उद्योजक बलीद उपस्थित होते. दररोज सुमारे दोन ते अडीच हजार वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे नियोजन आहे.

नानासाहेब गोरे यांच्या विचारांची गरज - शहा
पुणे, १८ जून / प्रतिनिधी
समाज हा वर्ण आणि वर्ग व्यवस्थेमध्ये गुरफटलेला आहे. ज्या दिवशी वर्ण व वर्ग व्यवस्था संपेल त्या दिवशी समाज बुद्धिजीवी बनेल, या नानासाहेब गोरे यांच्या विचाराचे आचरण करण्याची गरज मु. ब. शहा यांनी व्यक्त केली. साधना समकालीन २००९ साप्ताहिक कार्यक्रमात नानासाहेब गोरे जयंती निमित्त ‘आठवणीतील नानासाहेब’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी जयानंद मठकर, नरेंद्र दाभोलकर उपस्थित होते. शहा म्हणाले की, नानासाहेब गोरे यांनी परखड लिखाण केले. गोरे यांनी तरुणांना समाजवादी विचारसरणीकडे प्रवृत्त केले. नानासाहेब राजकारणामध्ये आले नसते तर जगामधील थोर साहित्यिक झाले असते. ज्याप्रमाणे ते लिखाण करत, तिच धोरणे समोर ठेवून जीवन जगत. त्यांच्या लिखाणामध्ये कर्मयोग कलात्मकता, बुद्धीप्रामाण्यवाद या शैली प्रामुख्याने आढळून येतात.यावेळी नरेंद्र दाभोलकर म्हणाले की, सर्व धर्म हे सारखेच असून ते कालबाह्य़ आहेत. हिंदूु धर्मामध्ये ईश्वर ही संकल्पना अधिक प्रभावी आहे. खरे तर समाजामध्ये ईश्वराने विषमता निर्माण केली आहे. धर्म, जात, वर्ण यामुळे सामाजिक विषमता वाढते.

‘रिपब्लिकनकडे अनेक पर्याय’
पुणे, १८ जून/प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विश्वासघाताने पराभव झाला असून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमच्यापुढे अनेक पर्याय आहेत, असा इशारा लोकसभेच्या वेळी युती असणाऱ्या पक्षांना रिपब्लिकन नेते अविनाश महातेकर यांनी दिला. एस.एम. जोशी सोश्ॉलिस्ट फाउंडेशन व साधना साप्ताहिक यांच्या वतीने ‘साधना समकालीन २००९’ या सात दिवसांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ‘निकाल लोकसभेचे, चाहूल विधानसभेची’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी अशोक ढवळे, मानव कांबळे, सुहास पळशीकर, डॉ. नरेंद्र दाभोलकर उपस्थित होते.महातेकर म्हणाले की, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जातीय राजकारणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. काही पक्षांनी, दलित, मुस्लिम समाजाला जाणीवपूर्वक सत्तेपासून वंचित ठेवले.

चौघडावादक दत्तात्रय शेखर यांचे निधन
आळंदी, १८ जून/वार्ताहर
येथील नगारखान्यातील चौघडावादक दत्तात्रय पांडुरंग शेखर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. येथील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मठात तसेच आळंदी ते पंढरपूर पायीवारी सोहळ्यात त्यांनी चौघडा वादन सेवा अनेक वर्षे केली. ते ज्ञानेश्वर शेखर यांचे चुलते होत.

आमदारांच्या निलंबनाविरुध्द शिवसेना भाजपची पिंपरीत निदर्शने
पिंपरी, १८ जून / प्रतिनिधी

राम प्रधान समितीचा अहवाल जाहीर करावा तसेच विधान परिषदेतील युतीच्या तीन आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, या मागणीसाठी आज दुपारी पिंपरी - चिंचवड शहर शिवसेना व भाजपा युतीतर्फे निदर्शने करण्यात आली. पिंपरी कॅंम्प येथील डीलक्स थिएटर चौकात आयोजित निदर्शनांमध्ये झेंडे व फलक घेऊन या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. राम प्रधान समितीचा अहवाल जाहीर करुन सत्य जनतेला समजू द्या, आमदारांचे निलंबन रद्द करा अशा घोषणा देण्यात आल्या. शिवसेनेचे शहरप्रमुख भगवान वाल्हेकर, युतीच्या नगरसेवकांपैकी सीमा सावळे, विजया जाधव, अशोक सोनवणे, भीमा बोबडे, एकनाथ पवार तसेच भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सारंग कामतेकर, शहरप्रमुख अजय पाताडे, माजी शहरप्रमुख नेताजी चव्हाण, सुशीला पवार, माजी नगरसेवक कुमार जाधव, विभाग प्रमुख संतोष माचुत्रे, रोमी संधू,गुलाब गरुड, रामकृष्ण राणे, सुरेश वाडकर आदी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.