Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

राज्य

वि.सा. संघ आणि साहित्य महामंडळातील कलगीतुरा रंगला
राजीनाम्याच्या मागणीला बगल देण्याचा पाटलांचा प्रयत्न
नागपूर, १८ जून / प्रतिनिधी
आर्थिक गैरव्यवहाराबाबत कौतिकराव ठाले पाटलांनी दिलेला इशारा विदर्भ साहित्य संघाने धुडकावून लावला असून राजीनाम्याच्या मागणीला बगल देण्याचा हा प्रकार असल्याची टीका पाटलांना उत्तरादाखल पाठवलेल्या पत्रातून केली आहे. पाटलांनी वि.सा. संघाच्या पदाधिकाऱ्यांवर गरळ ओकण्याचा आरोप केलेला असला तरी ती गरळ म्हणजे काय, याचा नेमका उल्लेख पत्रात केलेला नाही.

ठाले पाटलांचा पोलिसात जाण्याचा इशारा
नागपूर, १८ जून / प्रतिनिधी

विदर्भ साहित्य संघाने आपणाविरुद्ध गरळ ओकणे थांबवले नाही तर, त्यांचा आर्थिक गैरव्यवहार चव्हाटय़ावर आणून पोलिसात तक्रार दाखल करू, असा इशारा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिला आहे. दीड महिन्यापूर्वी ठाले पाटलांनी महाबळेश्वरच्या मराठी साहित्य संमेलनात घडलेल्या प्रकारावर लेख लिहून त्यांची बाजू स्पष्ट केली होती. त्यावर तीव्र आक्षेप नोंदवत वि.सा. संघाने तातडीने बोलावलेल्या बैठकीत पाटलांच्या राजीनाम्याचा ठरावही मांडला होता. ठाले पाटलांविरुद्ध संघाने बंड पुकारताच पाटलांनीही ‘चोराच्या उलटय़ा बोंबा’ असे उत्तर देऊन संघाच्या शेपटीवर पाय ठेवला होता.

अजित पवारांच्या पत्नीच्या फार्म हाऊससाठी मुळा नदीचे पात्र खरडले
अभिजित घोरपडे
पुणे, १८ जून

जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या फार्म हाऊसच्या बांधकामासाठी पुण्यापासून ३० किलोमीटर अंतरावर मुळा नदीच्या पात्रातील माती व वाळू उपसून तिचे पात्र खरडण्यात आले आहे. याशिवाय नदीच्या पात्रातही काँक्रीटचे काही खांब आणि कुंपणाची भिंत उभारण्यात आली असल्याचे आज निदर्शनास आले. राज्यातील नद्या व पाण्याची जबाबदारी असलेल्या जलसंपदामंत्र्यांच्या पत्नीसाठीच अशाप्रकारे नदीच्या प्रवाहात हस्तक्षेप करण्यात येत आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या मालकीच्या ‘फायर पॉवर अ‍ॅग्रो फार्मस् प्रा. लि.’ या कंपनीच्या घोटावडे (ता. मुळशी) येथील जागेत फार्म हाऊसचे बांधकाम सुरू आहे.

‘ब्लड कॅन्सर’ ग्रस्त मुलीच्या पालकांकडून लाच मागणारे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय
जयंत धुळप
अलिबाग, १८ जून

रायगड जिल्हा रुग्णालयातील कनिष्ठ लिपीक सुनील सोनावणे याला लाचप्रकरणी रंगेहाथ पकडून दिल्यानंतर या जिल्हा रुग्णालयामुळे समस्याग्रस्त झालेले नागरिक आता जिल्हाभरातून पुढे येऊ लागले आहेत़ प्राप्त माहितीनुसार, कर्जतमधील १२ वर्षांच्या ‘ब्लड कॅन्सर’ग्रस्त मुलीच्या वडिलांकडून रायगड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एऩ एस़ नेहुलकर यांच्या कार्यालयातील कनिष्ठ लिपीक सोनावणे याने मोठय़ा रकमेची लाच मागण्याचा मानवतेलाच काळिमा फासणारा प्रकार केल्याचे उघड झाले आह़े

पारोळा, सावद्याचे नगराध्यक्ष अविरोध; भुसावळमध्ये पुन्हा पक्षादेश
जळगाव, १८ जून / वार्ताहर
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सावदा आणि पारोळा येथील विरोधी उमेदवारांनी माघार घेतल्याने सावद्यातून विकास आघाडीच्या हेमांगी चौधरी तर पारोळा पालिकेत शिवसेनेच्या सुनीता कासार यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादीचे चंद्रकांत पाटील अविरोध निवडून आले आहेत. दरम्यान, भुसावळमध्ये सत्ताधारी गटाने लागोपाठ दुसऱ्यांदा आपल्या सदस्यासाठी पक्षादेश बजावला आहे.
नगराध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेंतर्गत उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पारोळा व सावद्याचे चित्र स्पष्ट झाले. आता चोपडा, भुसावळ, फैजपूर आणि पाचोरा येथील निवडणूक २० जून रोजी होणार आहे. फैजपूर येथे निलेश राणे व सलिम खाटिक यांच्यात तर भुसावळमध्ये विद्यमान नगराध्यक्षा संगीता बियाणी व राष्ट्रवादीच्या रेखा चौधरी यांच्यात सरळ लढत होणार आहे. पाचोऱ्यात काँग्रेसचे दोन व राष्ट्रवादीचा एक उमेदवार रिंगणात आहे. चोपडा पालिकेत शहर विकास आघाडीच्या कल्पना जगताप तसेच राष्ट्रवादी व मनसे आघाडीच्या राधाबाई देशमुख यांच्यात सरळ लढत आहे. भुसावळ शहर बचावतर्फे सदस्यांसाठी पुन्हा एकदा पक्षादेश बजावण्यात आला आहे.

नाशिकमध्ये ‘ॠतुरंग’तर्फे स्पर्धेतील लघुपटांचा महोत्सव
नाशिक, १८ जून / प्रतिनिधी

येथील ॠतुरंग परिवारतर्फे आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेतील सर्व लघुपटांचा विशेष महोत्सव २० जून रोजी होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. सायंकाळी सहा वाजता उंटवाडीरोडवरील इन्स्टिटय़ुट ऑफ इंजिनिअर्सच्या अशोका व्हच्र्यु सभागृहात हे लघुपट दाखविले जाणार आहेत. जिल्ह्य़ातील कलावंतांना व्यासपीठ मिळावे या हेतुने ॠतुरंग परिवारच्या वतीने लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा हौशी व व्यावसायिकांसाठी खुली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून शासकीय, निमशासकीय कर्मचारी, व्यावसायिक तसेच महिलाही या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. स्पर्धेसाठी विषयाचे बंधन नसल्यामुळे रसिकांना विविधांगी विषयांच्या लघुपटांचा आस्वाद या महोत्सवानिमित्त घेता येणार आहे. सर्व स्पर्धकांनी व रसिकांनी या महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात नाशिकचा साजिन सुरेशनाथ
नाशिक, १८ जून / प्रतिनिधी

महाराष्ट्राचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जात असून या संघात नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या साजिन सुरेशनाथची निवड झाली आहे. २२ दिवसांच्या या दौऱ्यात महाराष्ट्राचा संघ ऑस्ट्रेलियातील निवडक संघांबरोबर चार दिवसीय एक, तीन दिवसीय दोन, एक दिवसाचे दोन व एक ट्वेन्टी २० सामना खेळणार आहे. पुढील रणजी हंगामाच्या तयारीच्या दृष्टीने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने हा दौरा आयोजित केला आहे. संघटनेच्या आमंत्रितांच्या साखळी स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर साजिनची संघात निवड करण्यातोली आहे. या दौऱ्यात साजिनने छाप पाडल्यास त्याचा रणजी संघातील समावेशाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. निवडीनिमित्त नाशिक जिल्हा संघटनेतर्फे अनंत कान्हेरे मैदानात आयोजित कार्यक्रमात साजिनचा सचिव रतन कुयटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी निवड समिती सदस्य प्रशांत रॉय, संघटनेचे खजिनदार समीर रकटे उपस्थित होते.