Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

क्रीडा

गेल सेनेचे मिशन लंकादहन!
लंडन, १८ जून/ पीटीआय

इंग्लंडला अटीतटीच्या सामन्यात पराभूत करून उपान्त्य फेरी गाठणारी वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलची सेना लंकादहन करण्यासाठी सज्ज झाली आहे. उद्या श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या संघांमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकातील दुसरा उपान्त्य सामना रंगणार असून दोन्हीही संघ चांगलेच समतोल असल्याचे दिसत आहे.ख्रिस गेल हा संघाचे नेतृत्व चांगल्या पद्धतीने करताना दिसत आहे. फलंदाजीमध्ये तर गेल हा संघाचा आधारस्तंभ आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध साकारलेली खेळी अफलातून होती. त्यावेळी त्याने संघाला एकहाती सामना जिंकवून दिला होता.

सेहवागची अनुपस्थिती हेच पराभवाचे कारण -गांगुली
लंडन, १६ जून/वृत्तसंस्था

ट्वेंटी २० विश्वचषक स्पर्धेत भारताचा पराभव होण्यास भारतीय खेळाडूंचा थकवा हे प्रमुख कारण आहे, या प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी व्यक्त केलेल्या मताशी माजी कर्णधार सौरव गांगुली याने असहमती दर्शविली आहे. तडाखेबंद सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाला मोठा फटका बसला, असेही तो म्हणाला. सीएनएन आयबीएन वाहिनीशी बोलताना गांगुली म्हणाला की, भारतीय संघात तरुण खेळाडूंचा भरणा आहे.

‘खूब लडी मर्दानी..’
उपान्त्य लढतीत न्यूझीलंडकडून हार
नॉटिंगहॅम, १८ जून / पीटीआय

विश्वविजेत्या भारतीय पुरुषांनी सुपर एटमध्येच नांगी टाकली असताना भारतीय महिलांनी मात्र उपान्त्य फेरीपर्यंत मजल मारली. परंतु उपान्त्य फेरीत न्यूझीलंडकडून ५२ धावांनी पराभव पत्करल्यामुळे भारताचे विश्वविजेतेपदाचे मनसुबे उधळले गेले. ‘खूब लढी मर्दानी..’ या आवेशातच भारतीय महिलांनी इंग्लंडमध्ये ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत कामगिरी दाखविली. विजयासाठी १४६ धावांचे आव्हान स्वीकारलेल्या भारतीय फलंदाजीवर किवी गोलंदाजांनी चांगलाच अंकुश ठेवला.

भारतीय पराभवाचा फारसा बाऊ करू नका - अजित वाडेकर
लंडन, १८ जून/वृत्तसंस्था

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय संघाच्या पराभवास बऱ्याच गोष्टी कारणीभूत असून खेळाडूंची दमछाक हे तीलच एक कारण असल्याचे भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी म्हटले आहे. क्रिकेटच्या या प्रकाराबाबत भाकित करणे कठीण असून भारतीयांची हार हा केवळ एक धक्का आहे. त्यामुळे या पराभवाचा फारसा बाऊ करू नका आणि या स्पर्धेवरून तुम्ही भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे मूल्यमापन करू नका, असेही वाडेकर यांनी म्हटले आहे.

बुकॅनन यांना अखेर नारळ
कोलकाता, १८ जून/ वृत्तसंस्था

कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या प्रशिक्षकपदावरुन जॉन बुकॅनन यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली. बुकॅनन यांना प्रशिक्षकपदाच्या जबाबदारीतून तातडीने मुक्त करण्यात आल्याची घोषणा कोलकाता नाईट रायडर्स संघाचे भागीदार जय मेहता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. या पत्रकात म्हटले आहे की, या संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा घेताना बुकॅनन यांनी जी उद्दिष्टे ठेवली होती ती साध्य करताना बुकॅनन यांना यश आलेले नाही. त्यामुळेच आम्ही त्यांना या जबाबदारीतून तातडीने मुक्त करण्याचे ठरविले आहे.

राज्य मैदानी स्पर्धेस आजपासून प्रारंभ
पुणे १८ जून/प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा वऱ्हाडे हिच्यासह अनेक धावपटू येथे उद्यापासून सुरु होणाऱ्या १६ वर्षांखालील गटाच्या महापौर चषक राज्य मैदानी स्पर्धेत सहभागी झाले आहेत. सणस मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेतील मुले व मुली गटात २९ संघांमधील साडेपाचशे खेळाडू, दीडशे पंच व तांत्रिक अधिकारी भाग घेत आहेत. स्पर्धेचे उद्घाटन उद्या सायंकाळी ४ वाजता नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते व अर्जुन पुरस्कार विजेते मल्ल काका पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

आफ्रिदीचा झंझावात
नॉटिंगहॅम, १८ जून/ पीटीआय

शाहिद आफ्रिदी ट्वेन्टी-२० विश्वचषकादरम्यान चांगली गोलंदाजी करीत असला तरी फलंदाजीमध्ये तो सातत्याने फ्लॉप ठरत होता. पण गरज असताना उपयुक्त कामगिरी करून संघासाठी धावून येण्यासाठी पाकिस्तानचे खेळाडू प्रसिद्ध आहेत आणि याला आफ्रिदीही अपवाद नाही. संघाच्या दोन विकेटस् पडल्यानंतर आफ्रिदी नावाचा झंझावात आला आणि त्याने सामन्याचे चित्रच पालटले. त्याने ३४ चेंडूंत ८ चौकारांच्या सहाय्याने ५१धावा फटकाविल्या. त्याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावरच पाकिस्तानला २० षटकांमध्ये चार विकेट्सच्या मोबदल्यात १४९ धावा करता आल्या.

शेन वॉर्नचे भाकित; अ‍ॅशेस मालिकेत बोपारा ठरणार फ्लॉप
लंडन, १८ जून/वृत्तसंस्था

इंग्लंडचा फलंदाज रवी बोपारा हा आगामी अ‍ॅशेस मालिकेत ‘फ्लॉप’ ठरणार. कारण खेळापेक्षा ‘स्टाईल’ मारण्यातच त्याचे लक्ष असते असे म्हणत शेन वॉर्नने त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध कार्डिफ येथे ८ जुलैपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड संघात बोपाराचा समावेश होण्याची शक्यता आहे. इसेक्सच्या या स्टार खेळाडूने या वर्षांच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजविरुद्ध सलग तीन शतके ठोकली होती. मात्र मोठी खेळी साकारण्यापूर्वीच मोठे फटके खेळण्याचा मोह तो आवरू शकत नाही असे वॉर्न म्हणतो. त्यामुळेच प्रथम श्रेणी क्रिकेटसाठी तो चांगला खेळाडू असला तरी अद्याप तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू झालेला नाही, असे म्हणत वॉर्नने त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंड संघ बोपारावर अवलंबून राहिला तर संकटात सापडेल, असे भाकितही त्याने केले आहे. शेन वॉर्नने ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान कॉलिंगवूडच्या नेतृत्वावरही टीका केली होती. मात्र त्याचवेळी केविन पीटरसन व अ‍ॅन्ड्रय़ू स्टॉस हे दोन खेळाडू इंग्लंडला अ‍ॅशेस मालिका जिंकून देऊ शकतात, असेही वॉर्नने म्हटले आहे.

तीन भारतीय विम्बल्डन दुहेरीत खेळणे आनंददायी -सोमदेव
नवी दिल्ली, १८ जून / पीटीआय

एकेरीत खेळण्याची संधी निसटली, परंतु तरीही आत्मविश्वासाने खेळत सोमदेव देववर्मनने विम्बल्डन टेनिस स्पध्रेच्या पुरुष दुहेरी गटाची मुख्य फेरी गाठण्याची करामत दाखविली आहे. युवा टेनिसपटू सोमदेव आता आपल्या ग्रॅण्डस्लॅम पदार्पणाबाबत विलक्षण आशावादी आहे. बुधवारी रात्री सोमदेवने आपला दक्षिण आफ्रिकन साथीदार केव्हिन अ‍ॅन्डसनच्या साथीने अ‍ॅलेसॅन्ड्रो मोट्टी (इटली) आणि जोसेफ सिरिअन्नी (ऑस्ट्रेलिया) जोडीचा ७-६ (०), ६-७ (१), ८-६ अशा फरकाने पराभव करीत विम्बल्डन स्पध्रेची मुख्य फेरी गाठली आहे. परंतु एकेरीत ही किमया न दाखविता आल्याचे शल्य मात्र त्याला बोचत आहे. हा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा विजय होता. विम्बल्डनसाठी पात्र झाल्याने फार आनंद होतो आहे, असे त्याने यावेळी सांगितले.

बालेवाडीत रंगणार २१ वर्षांखालील
व्हॉलीबॉल विश्वचषक स्पर्धा
मुंबई, १८ जून/ क्री. प्र.

पुण्यातील बालेवाडीत २१ वर्षांखालील पाचवी व्हॉलीबॉल विश्वचषक अजिंक्यपद स्पर्धा ३१ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान रंगणार असून भारतीय प्रेक्षकांना जगातील अव्वल संघांचा खेळ पाहण्याची ही नामी संधी असेल. यजमान भारताच्या संघाला ‘अ’ गटात स्थान देण्यात आले असून या गटामध्ये अमेरिकेसारख्या बलाढय़ संघाचाही समावेश करण्यात आला आहे. ‘अ’ गटामध्ये भारत आणि अमेरिकेसह बेलारूस आणि तुनिसियाचा समावेश करण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या या पत्रकार परिषदेला महाराष्ट्राचे अर्थमंत्री दिलीप वळसे-पाटील, भारतीय व्हॉलीबॉल महासंघाचे सचिव के. मुरूगन आणि या स्पर्धेचा ‘ब्रॅंड अ‍ॅम्बेसिडर’ असलेला राहुल बोस उपस्थित होता. १९९३, २००१ आणि २००७ साली विश्वचषक पटकाविणाऱ्या तिसऱ्या मानांकित ब्राझिलच्या संघाला ‘ड’ गटात स्थान देण्यात आले असून या गटातील सर्व सामने अटीतटीचे होतील असा अंदाज आहे. कारण या गटात दुसऱ्या मानांकित अर्जेटिना, कॅनडा आणि पोलंड यांचा समावेश करण्यात आला आहे. विश्वचषकाच्या प्राथमिक फेऱ्या ३१ जुलै तर दोन ऑगस्ट दरम्यान होतील. या प्रसंगी मुरूगन म्हणाले की, व्हॉलीबॉलचा विश्वचषक भारतामध्ये ही फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. या विश्वचषकामुळे व्हॉलाबॉल या खेळाचा देशात प्रसार होण्यास मदत होईल.

मुंबई शहर, अहमदनगरच्या क्रीडाधिकाऱ्यांच्या बदल्या
पुणे १८ जून/प्रतिनिधी

मुंबई शहराचे जिल्हा क्रीडाधिकारी रमेश पोशमपेललु व अहमदनगरच्या जिल्हा क्रीडाधिकारी प्रमोदिनी गड्डमवार यांची अनुक्रमे सांगली व वाशिम येथे बदली करण्यात आली आहे.राज्याचे प्रभारी क्रीडा संचालक नरेंद्र सोपल यांनी आज ही माहिती दिली. बुलढाण्याचे जिल्हा क्रीडाधिकारी सुधीर मोरे यांची अहमदनगर येथे जिल्हा क्रीडाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावतीचे जिल्हा क्रीडाधिकारी संजय सबनीस यांची पुण्यातील क्रीडा व युवक संचालनालयात सहायक संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. जालन्याचे जिल्हा क्रीडाधिकारी गुलाब राठोड यांची नांदेड येथे जिल्हा क्रीडाधिकारीपदावर बदली झाली आहे. पोशमपेललु, राठोड व मोरे यांच्याकडे अनुक्रमे कोल्हापूर,हिंगोली व नाशिक येथील जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. गड्डमवार यांच्याकडील नगर जिल्हा क्रीडाधिकारी पदाचा कार्यभार तात्पुरता संगमनेर येथील तालुका क्रीडाधिकारी रवींद्र नाईक यांच्याकडे सोपविला जाणार आहे. पोशमपेललु यांच्याकडील जिल्हा क्रीडाधिकारीपदाचा कार्यभार मुंबई उपनगरच्या जिल्हा क्रीडाधिकारी जे.एम.सबनीस यांच्याकडे सोपविला जाणार आहे.