Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

ठाण्याच्या मुलांचे सैन्यदलात जय हो..
ठाणे / प्रतिनिधी- राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (आरआयएमसी) डेहराडून येथे महाराष्ट्रातून निवड होणारा गौरव म्हेत्रे हा ठाण्याचा पहिला विद्यार्थी ठरला आहे. त्याबरोबर भारतीय वायुदलात इंजिनिअरिंग बॅचमध्ये प्रवेश घेणारी ठाण्यातील पहिली तरुणी होण्याचा मान अक्षदा सुहास भोळे हिला मिळाला आहे. या दोघांचा सत्कार गडकरी रंगायतनच्या तालीम गृहात नुकताच करण्यात आला. ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण झालेल्या अक्षदाने बारावी सायन्स बांदोडकर महाविद्यालयातून पूर्ण केले.

खासदारांसमोर प्रवाशांनी वाचला रेल्वेसमस्यांचा पाढा
ठाणे/प्रतिनिधी : स्टेशनकडे येण्यासाठी वेळेवर बस नसतात, प्लॅटफॉर्मवरील तिकीट खिडक्या बंद, वेंिडग मशिन सदैव बंद, अरुंद पूल, शौचालयांची वानवा, गाडीतील पंखे बंद.. अशा अनेक समस्यांचा पाढा वाचून रेल्वेप्रवाशांनी आज ठाण्याचे खासदार संजीव नाईक यांना भंडावून सोडले.
खासदार म्हणून निवडून आल्यानंतर नाईक यांनी प्रथमच ठाणे रेल्वे स्थानकास भेट देऊन प्रवाशांशी थेट संवाद साधला, तेव्हा त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड, ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, सरचिटणीस मनोज प्रधान उपस्थित होते.

‘ठाण्यात सुरू आहेत अडीच हजार कोटींची विकास कामे’
ठाणे/प्रतिनिधी

जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत सुरू असलेली १५०० कोटी रुपयांची विकास कामे, एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेले ५०० कोटींचे प्रकल्प तसेच एमएसआरडीसी व पालिका यांच्या माध्यमातून शहरात आज सुमारे २ हजार ५०० कोटींची विकास कामे सुरू असून पालिकेच्या इतिहासात प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात विकास प्रकल्प सुरू आहेत, असा दावा महापालिका आयुक्त नंदकुमार जंत्रे यांनी केला.

द्या ठेका आणि महापालिका विका !
रत्नाकर चासकर

कल्याण- डोंबिवली महापालिकेने बी.ओ.टी.वरील आठ प्रकल्पांना यापूर्वीच मंजुरी दिली आहे, मात्र सर्वच प्रकल्प विविध कारणांमुळे अडचणीत आले असताना स्थायी समिती सभापती वामन म्हात्रे यांनी बी.ओ.टी.वरील आणखी १३ प्रस्ताव सादर केले आहेत. ‘द्या ठेका आणि महापालिका विका’ अशी अवस्था झाली आहे. पालिका वाचवायची असेल तर या विरोधात सामान्य नागरिकांनीच पुढाकार घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

‘स्वरत्नमाला’ प्रश्नसंचाचे आज प्रकाशन
डोंबिवली - राष्ट्रीय शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी तयार केलेल्या स्वरत्नमाला या प्रश्नपेढीचे प्रकाशन १९ जून रोजी करण्यात येणार आहे. राणाप्रताप भवनमधील डॉ. हेडगेवार सभागृहात दुपारी तीन वाजता आयोजित या कार्यक्रमाला ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक सुधीर जोगळेकर, शिक्षणतज्ज्ञ प्रश्न. सुरेंद्र बाजपेई, संस्थेचे अध्यक्ष शशिकांत कर्डेकर, कार्यवाह म.म. अनगळ, शशिकांत भाटय़े उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी निवड
शहापूर : तालुक्यातील वासिंदजवळील पाली येथील स्वामी विवेकानंद या संस्थेने आजतागायत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन भारत सरकारने राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी निवड केली आहे. तिरुनेलवली, तामिळनाडू येथे २० ते २६ जून दरम्यान हे शिबीर होणार आहे. याआधी संस्थेने दिल्ली, गोवा व मालेगाव येथील राष्ट्रीय एकात्मता शिबिरात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील म्हसकर आणि कोषाध्यक्ष शिवाजी तरणे यांच्या मार्गदर्शनाखाली व देव कोळी आणि शैलेन्द्र कोळी यांच्या नेतृत्वाखाली सुनील म्हसकर, शिवाजी तरणे, देवकोळी, शैलेन्द्र कोळी, राजू मोरे, धनश्री मोकल, हेमांगी कदम, कोमल माने, अमृता गायकर, गौरव संत, काजल तमायचे, समीक्षा जोशी, सुनील वाघमारे, सूरज भांगरे, विवेक भुयाळ, स्वप्नाली तांबळे, गौरवी बोटे, सागर कोळी हे कलाकार शिबिरात सहभागी होत आहेत.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन
कळवा : येथील विवेकानंद अ‍ॅकॅडमीतर्फे परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. २२ ते २७ जून या काळात सायंकाळी ६ ते ८ या वेळेत हे शिबीर भरणार आहे. मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. प्रकाश खांडगे, लेखक अरुण हरकारे, शिक्षणतज्ज्ञ डॉ. दत्ता करपे, निवृत्त पोलीस उपायुक्त बा.बा. जाधव आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. २८ जून रोजी सकाळी ११ वा. समारोप होईल. संपर्क- वैद्या सुमेधा देसाई- ९८२११६३९८८.