Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

व्यक्तिवेध

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ स्व. प्रा. डॉ. के.डी. अभ्यंकर आज असते तर येत्या २१ जून रोजी सूर्याने कर्कवृत्तावर पाऊल ठेवता ठेवता त्यांनी सहस्रचंद्रांच्या पलीकडची मोजदाद केली असती! कारण २१ जून रोजी ते ८१ वर्षांचे झाले असते आणि २१ जून या दिवसाला खगोलशास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी सूर्य नेमका कर्कवृत्तावर येतो. अशा खगोलशास्त्रीय महत्त्वाच्या दिवशी जन्मलेल्या कृष्णा दामोदर अभ्यंकर यांनी जन्मभर ग्रह-ताऱ्यांचा वेध घ्यावा आणि खगोलशास्त्राच्या अभ्यासात आणि ध्यासात रमावे हा विलक्षण योगायोग होय! शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात त्यांनी

 

पहिला क्रमांक कधी सोडला नाही. इंदूरमध्ये १९२८ मध्ये जन्मलेल्या अभ्यंकरांनी मॅट्रिकच्या परीक्षेत त्यावेळच्या अजमेर बोर्डात, पुढे इंटरमीजिएट परीक्षेतही सुवर्णपदक मिळवले. इंदूरमधूनच बी.एससी. अर्थातच प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करून त्यांनी आग्रा कॉलेजमधून भौतिकशास्त्रात एम.एससी. केले, ते स्पेक्ट्रोकोपी हा विशेष विषय घेऊन. त्यानंतर सुरुवातीला काही दिवस इंदूरच्याच होळकर कॅलेजमध्ये भौतिकशास्त्राचे अध्यापन केले. पुढे १९५२ ते ५४ या काळात भारत सरकारची सीनिअर रिसर्च फेलोशिप मिळवून त्यांनी कोडाईकनालच्या वेधशाळेत संशोधन केले. त्या अनुभवाचा परिपाक म्हणून पुढे टाटाची फेलोशिप मिळून ते अमेरिकेत बर्कले विद्यापीठात पी.एचडी.साठी संशोधन करू लागले. त्यांचे ‘बायनरी स्टार्स’ वरचे हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे मानले गेले. अमेरिकेच्या वास्तव्यात अनेक जगप्रसिद्ध खगोलशास्त्रांच्या संपर्कात ते आले. परंतु त्यानंतर त्यांनी भारतात परतून कोडाईकनालच्या वेधशाळेत संशोधन करणे, तसेच हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात अध्यापन करणे पसंत केले. जे. आर. ओ. जयपाल रंगापूर वेधशाळेचे संस्थापक-संचालक म्हणून त्यांनी बरीच वर्षे काम केले. १९६३ मध्ये कॅनडा आणि ६७मध्ये अमेरिकेत पॅसाडेना येथे जाऊन त्यांनी संशोधनकार्य केले. के. डी. अभ्यंकरांचे भारताला सर्वात मोठे योगदान म्हणून ‘अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया’ आणि पुण्यातल्या ‘आयुका’ या संस्थांच्या स्थापनेतला त्यांचा मोठा सहभाग म्हणता येईल. ‘अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया’च्या संचालकपदाची धुराही त्यांनी वाहिली. ‘आयुका’चे संस्थापक-संचालक डॉ. जयंत नारळीकर आणि प्रा. डॉ. के. डी. अभ्यंकर यांची घनिष्ठ मैत्री होती. ‘आयुका’मध्ये त्यांचे सतत जाणे-येणे असे. ‘आयुका’साठी त्यांनी ‘अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ पॅसिफिक यु. एस. ए.’ चे १९५६ ते १९८४ पर्यंतचे सर्व अंक भेट दिले. १४ नोव्हेंबर २००७ रोजी त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांना श्रद्धांजली वाहताना डॉ. जयंत नारळीकर यांनी त्यांच्या त्या मोलाच्या भेटीचा कृतज्ञ उल्लेख आवर्जून केला होता. ऑब्जव्‍‌र्हेशनल - निरीक्षणात्मक - आणि थिऑरेटिकल -सैद्धांतिक - अशा खगोलशास्त्राच्या दोन्ही अंगांवर त्यांचे सारखेच प्रभुत्त्व होते. दीडशेहून अधिक संशोधनपर लेख, खगोलशास्त्रावरची तीन पुस्तके, अनेक विद्यापीठांसाठी क्रमिक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. खगोलशास्त्रातल्या अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या बिर्ला अवॉर्डने, तसेच आयएनएसए वेणू बापू अवॉर्डने त्यांना गौरवान्वित करण्यात आले आहे. एनएसएसए अवॉर्ड फॉर पेटंट राइट्स ऑन अ न्यू टेक्निक ऑफ मेझरिंग ऑप्टिकल पोलरायझेशन हा त्यांना मिळालेला महत्त्वाचा पुरस्कार. एवढेच नव्हे तर आंध्रप्रदेश बेस्ट टीचर अवॉर्डने त्यांच्यातल्या अध्यापकालाही दाद दिली. भारतीय आणि वेदिक खगोलशास्त्राच्या अभ्यासात त्यांना अतिशय रस होता आणि वाईहून प्रसिद्ध होणाऱ्या विष्टद्धr(२२४)वकोशातील खगोलशास्त्राशी संबंधित खंडातही त्यांचे बरेच योगदान होते. संस्कृत आणि मराठी भाषेच्या अभ्यासात ते रमून जात आणि त्यांनी शिवमहिम्नस्तोत्राचे मराठी भाषांतरही केले आहे. ‘बेलाची पाने’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. ग्रह-ताऱ्यांविषयीच्या त्यांच्या कविता एकेकाळी मुंबई आकाशवाणीवरून प्रसारित होत असत. एम. एससी. आणि पी. एचडी. साठी त्यांचे मार्गदर्शन लाभलेले अनेक विद्यार्थी आज महत्त्वपूर्ण पदांवर कार्यरत आहेत. प्रसिद्ध गणितज्ज्ञ प्रा. श्रीराम अभ्यंकर हे त्यांचे चुलत बंधू.