Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

भाजपशी युती करून काँग्रेसची सरशी!
नगराध्यक्षांची निवडणूक

चंद्रपूर, १८ जून/ प्रतिनिधी

जिल्हय़ातील चार पालिकांच्या अध्यक्षपदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाशी युती करीत काँग्रेसने बाजी मारली. चंद्रपूरचे नगराध्यक्ष म्हणून काँग्रेस-भाजप युतीचे मनोहर पाऊणकर निवडून आले. बल्लारपुरात याच युतीचे डॉ.मधुकर बावणे, मूलमध्ये काँग्रेसचे विजय चिमडय़ालवार तर राजुरा पालिकेत काँग्रेस व शेतकरी संघटनेचे रमेश नळे विजयी झाले.

त्रुटींबाबत प्रश्नचिन्ह कायम
वनाधिकाऱ्यांचे राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्रश्नधिकरणास पत्र

रेश्मा जठार

चंद्रपूर जिल्ह्य़ातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पालगत राखीव वनक्षेत्रातील बहुचर्चित प्रस्तावित खाण प्रकल्पाला मान्यता देण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा सखोल अभ्यास व्हावा, अशी मागणी या प्रकल्पाशी संबंधित तत्कालीन प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) यांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रश्नधिकरणाचे सदस्य सचिव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या प्रकल्पाबाबत कंपनीने केलेल्या एन्व्हॉयरोन्मेंट इम्पॅक्ट असेसमेंट अहवालातील त्रुटींबाबत प्रश्नचिन्ह कायम असतानाच, प्रकल्पाशी संबंधित इतरही त्रोटक बाबी वनाधिकाऱ्यांच्या पत्राने उजेडात आल्या आहेत.

मर्दडी घाटात एस.टी. लुटण्याचा प्रयत्न
रुग्णवाहिका अडवली
मारहाणीत पाच जखमी
बुलढाणा, १८ जून/ प्रतिनिधी

बुलढाणा-औरंगाबाद मार्गावरील दुधाजवळील मर्दडी घाटात दरोडेखोरांनी रस्त्यावर झाड तोडून एस.टी. बस व रुग्णवाहिका लुटण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांच्या मारहाणीत पाच जखमी झाले असून १२ हजार रुपयांचा माल दरोडेखोरांनी लंपास केला.

नक्षलवाद विरोधी विभागाचे आधुनिकीकरण
चंद्रपूर जिल्ह्य़ात आणखी चार पोलीस ठाणी
चंद्रपूर, १८ जून/ प्रतिनिधी
उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या ७८ जागा रिक्त असताना आणखी चार पोलीस ठाणी व मूल येथे पोलीस उपविभाग सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याने पोलिसांना कमी मनुष्यबळात अधिक कामाचा ताण सहन करावा लागणार आहे. नक्षलवाद विरोधी विभागाच्या आधुनिकीकरणाचा प्रस्तावही विचाराधीन असून नक्षलवादग्रस्त भागातील वणी आणि जिवती येथे ‘आऊट पोस्ट’ सुरू करणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी दिली.

सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहोळा
चंद्रपूर, १८ जून / प्रतिनिधी
ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती व महिला मंचच्या वतीने येत्या २८ जूनला सकाळी ११ वाजता सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहोळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास इच्छुक वधू-वरांनी अथवा पालकांनी इच्छुकांच्या नावाची नोंद करावयाची असल्यास आवश्यक कागदपत्रांसह २० जूनपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, बोधिसत्त्व परिसर, हॉटेल कुंदन प्लाझाजवळ, नागपूर रोड, चंद्रपूर येथील सभागृहाच्या व्यवस्थापकाकडे संपर्क करावा, असे आवाहन समितीचे पदाधिकारी अशोक खंडाळे, गोपाळराव देवगडे, राजदत्त अलोणे, विजय उमरे, प्रदीप अडकीने, कार्तिकस्वामी अलोणे, पुष्पा नळे, करुणा फुलझेले, यशोधरा ब्राह्मणे यांनी केले आहे.

मानोरात ‘रास्ता-रोको’
मानोरा, १८ जून / वार्ताहर

भुली येथील सतीश अवचितराव राठोड यांना मारहाण करणाऱ्यास अटक करण्याच्या मागणीसाठी अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली ‘रास्ता-रोको’ आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी दिग्रस चौकात रास्ता-रोको केले. यावेळी २०० नागरिकांना अटक करून नंतर सोडून देण्यात आले. या आंदोलनात भाऊ नाईक, उकंडराव राठोड, इप्तेखार पटेल, सुरेंद्र देशमुख, हेमेंद्र ठाकरे, प्रकाश राठोड, भारत चव्हाण, अनंत राठोड, प्रेमसिंग नाईक, भावसिंग राठोड सामील झाले होते. दरम्यान मारहाणीच्या घटनेतील आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख अशोक चव्हाण यांनी तहसील कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषण सेनेचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी भेट देऊन सोडवले.

ग्रामस्वच्छता अभियानात पोफळी अव्वल
बुलढाणा, १८ जून / प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे २००८-२००९ या वर्षाचे पुरस्कार जाहीर झाले असून तालुक्यातील पोफळी या गावाने तालुकास्तरावरील प्रथम क्रमांक पटकावीत अव्वल स्थान तर जहागीरपुर आणि कोथळी ग्रामपंचायतीने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले आहेत. अभियानात यावर्षी तालुक्यातील १६ गावांनी सहभाग घेतला. पोफळी या गावाने प्रथम, जहागीरपूरने द्वितीय, तर कोथळीने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. पोफळीची लोकसंख्या २ हजार ३२२ असून गावात ४०० कुटुंबे आहेत. गावाचे सरपंच सुनील पाटील व ग्रामस्थांच्या मदतीने हा पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न केले.

अनिल सव्वालाखेची ‘लिम्का’मध्ये नोंद
यवतमाळ, १८जून / वार्ताहर
यवतमाळचा राहणारा आणि सध्या सिंगापूर येथे अभियंता असलेल्या अनिल रामदास सव्वालाखे याचे नाव ‘लिम्का बुक ऑफ रेकार्डस’ मध्ये नोंदविल्या जाणार आहे. अनिलने ‘सुपर मेमरी’ म्हणजे अद्भूत स्मरणशक्ती क्षेत्रात अपूर्व यश संपादन करून दाखवले आहे. शून्य आणि एक हे दोन अंक मिळून २०० अंकाची एक संख्या त्याला सांगण्यात आली. त्याने ही संख्या २ मिनिटे ४७ सेकंदात जशीच्या तशी स्मरणशक्तीच्या आधारे सांगितली. इतकेच नव्हे तर कोणता अंक कोणत्या क्रमांकावर आहे हेही सांगितले.

मानसरोवर यात्रेवरून परतलेल्या चिकित्सकांचे स्वागत
गोंदिया, १८ जून / वार्ताहर

मानसरोवर येथील दुर्गम यात्रा करून परतलेल्या चिकित्सक दलाचे येथील बाबा अमरनाथ सेवा समितीच्यावतीने नागरा येथील डॉ. बाहेकार फार्म हाऊस येथे स्वागत करण्यात आले. डॉ. विनोद जैन, डॉ. अंजू जैन, डॉ. विकास जैन, डॉ. लता जैन, डॉ. नितीन कोतवाल, डॉ. अनिता कोतवाल, डॉ. जयपुरिया, डॉ. निर्मला जयपुरिया, डॉ. सुबोध गुप्ता, डॉ. वीणा गुप्ता, डॉ. अंशुमन चव्हाण, डॉ. यादव कुदळे, डॉ. कुदळे, डॉ. ललिता जैन, डॉ. दीप्ती जैन, डॉ. प्रतिभा चव्हाण, बिपीन पटेल, जयश्री पटेल, अंबु पटेल, निखील कुसुमकर, सुषमा कुसुमकर हे मानसरोवरची यात्रा करून सुखरूप गोंदियाला परतले आहेत. बाबा अमरनाथ सेवा समितीच्यावतीने नागरा येथे सर्वाचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी समितीचे डॉ. राजेंद्र जैन, अजित जैन, संजय टाह, प्रदीप पटेल, दिनेश मिश्रा, आनंद रघुवंशी, शैलेश गौर, पन्नालाल पचाडे, गिरीश कुदळे, पीयूष तिवारी, प्रश्न. श्यामका आदी उपस्थित होते.

रमाई आंबेडकर स्मृतिदिन
बुलढाणा, १८ जून / वार्ताहर

येथील विदर्भ हाऊसिंग सोसायटीमधील बुद्धविहारात क्रांती ज्योती महिला मंडळाच्यावतीने रमाई आंबेडकर स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मंडळाच्या सचिव कमल शिरसाठ यांनी रमाईच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन केले. अध्यक्षस्थानी वैशाली ठाकरे होत्या.

कोरडवाहू शेतकरी भांबावला
भंडारा, १८ जून / वार्ताहर

घाईने पूर्वतयारी आटोपून खरीप हंगामाच्या शेतीकरिता पावसाची वाट पाहणारा शेतकरी रोहिणी नक्षत्रात आलेल्या सलामीच्या पावसाने सुखावला. परंतु, पाठोपाठ येणारा मृगाचा पाऊस न बरसल्याने त्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मागील दुष्काळी वर्षाची पुनरावृत्ती तर होणार नाही ना, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कोरडवाहू शेतकरी तर भांबावून गेला आहे. मागील अनुभवामुळे मात्र शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकण्याची घाई केली नाही. बियाणे आणि खतविक्रीलाही मंदी आली आहे.

पावसाअभावी शेतकरी चिंतेत
आर्णी, १८ जून / वार्ताहर
जून महिना लागून १५ दिवस लोटले तरी वरुणराजाची कृपा झाली नसल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. शेतीमाल पेरणीअगोदरची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. शासनाकडून पीक कर्ज घेऊन बियाणे व खते याची व्यवस्था करून पुढील वर्षातील हंगाम सुगीचा येईल, असे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्याची आता वरुणराजाने सत्त्वपरीक्षा घेणे सुरू केले आहे. कोरडवाहू शेती मोठय़ा प्रमाणात असल्याने मृगनक्षत्राच्या पावसाची वेळेवर हजेरी लागली तर शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होते. मात्र, पाऊस पुढे सरकला तर हंगाम पुढे सरकतो व पिकांच्या उत्पन्नात मोठी घट शेतकऱ्यांना सहन करावी लागते. कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्ज माफ करून शासनाने दिलासा दिला. कर्जाचे वाटपही बँकेमार्फत वेळेवर सुरू झाले पण, आता पाऊसच नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे शेती व इतर कामावर परिणाम होत आहे.भीतीपोटी शेतकरी हवालदिल झाला आहे.

अपघातात दोन जखमी
रिसोड, १८ जून / वार्ताहर

ट्रॅक्टरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमीपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास उपचाराकरिता अकोला येथे हलविण्यात आले. तालुक्यातील मोठेगाव येथील बबन देशमुख (३७) व विनोद देशमुख (३०) मोटार सायकलने जात असताना चाफेश्वर मंदिराजवळ रिसोडकडे येणाऱ्या ट्रकने (एमएच३७ ए-९१०८) धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. जखमीचा भाऊ विलास देशमुखने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून ट्रॅक्टर चालक सुरेश सिरसाट (३५) याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.