Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

विशेष लेख

मान्सूनची गुगली!

सध्या मान्सूनच्या लांबण्याने आपल्या नियोजनाचे पितळ मात्र उघडे पडले. पाऊस आठ-दहा दिवसांनी लांबल्यामुळे इतकी अस्वस्थता पसरावी आणि या परिस्थितीतून मार्ग काढण्याचे सक्षम पर्यायही आपल्याकडे नसावेत, ही बाबच अस्वस्थ करणारी आहे. मागे अनेकदा अशी परिस्थिती येऊनही आपण हे धडे घेतले का, याचे उत्तर आताच्या अस्वस्थतेतून मिळते.

अकोला ४१.४ अंश सेल्सिअस, नागपूर ४३, पुणे ३६.६, मुंबई ३४.५, औरंगाबाद ३९.४, कोल्हापूर ३४, सांगली ३४.८, महाबळेश्वर २९.२ अंश.. गेल्याच मंगळवारचे कमाल तापमानाचे हे आकडे! ही नोंद पाहून सध्या उन्हाळा सुरू आहे की काय अशीच शंका येईल. प्रत्यक्षात जूनच्या उत्तरार्धातही इतका उकाडा, हा मान्सूनचे आगमन लांबल्याचाच परिणाम! पाऊस लांबला असला तरी यामुळे एक बरे झाले. आपला पावसाळा हा स्वतंत्र ऋतू नसून तो उन्हाळ्याचाच एक भाग आहे, हे वास्तव लोकांनी अनुभवले. जूनच्या मध्यापर्यंत राज्यभर पाऊस पडत असल्याने तापमानात घट होते, त्यामुळे उन्हाळा जाणवत नाही. पण आता पावसानेच दडी मारल्याने, एरवी लपून राहणारा उन्हाळा राज्यात अवतरला आहे!
जूनच्या मध्यावर राज्यभर सक्रिय असणाऱ्या मान्सूनने यंदा दडी मारली आहे. या वर्षी तो केरळात वेळेआधी आठवडाभर म्हणजे २३ मे रोजी दाखल झाल्यानंतर ७ जून रोजी रत्नागिरीत दाखल होऊन त्याने महाराष्ट्रातील आगमनाची वेळही पाळली. नंतर मात्र तो तिथेच थबकला. अजूनही किमान दोन-तीन दिवस तो पुढे सरकण्याची चिन्हे नाहीत. केरळात लवकर दाखल होऊनही त्याने महाराष्ट्राला अजूनपर्यंत तरी चकविले आहे. मान्सूनच्या बेभरवशी आगमनाचा अनुभवही या निमित्ताने आला. त्याचे आगमन लांबल्याने राज्यभर अस्वस्थता निर्माण झाली. अनेक ठिकाणी खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या, पिण्याच्या पाण्यामध्ये कपात करण्याचीही वेळ आली आहे. त्यातच प्रसिद्धीमाध्यमांमधून सनसनाटी बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे तो जूनमध्ये तरी दाखल होणार का, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या निमित्ताने मान्सूनच्या लहरीपणाची चर्चासुद्धा होऊ लागली आहे.
पण मान्सून खरंच लहरी किंवा बेभरवशी आहे का? तो केरळात लवकर दाखल झाल्यामुळे पुढेसुद्धा वेळेआधी किंवा वेळेवर येईल अशी अपेक्षा होती, ती त्याने फोल ठरविली, पण त्याच्या आगमनाला असा कितीसा उशीर झाला आहे? सरासरी तारखांनुसार तो ७ जून रोजी पुण्यात दाखल होतो, १० जून रोजी मुंबईत पोहोचतो आणि १२-१३ जूनच्या आसपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापतो. या वेळी त्याचे आगमन साधारणत: दहा ते बारा दिवसांनी लांबले आहे. हेच अस्वस्थतेचे कारण आहे. पण हे पहिल्यांदाच घडत आहे का? मान्सूनचे वर्तन समजून घेतले तर आजची परिस्थिती अपवादात्मक नाही, हे लक्षात येते. त्याच्या आगमनाच्या तारखा नेहमीच पुढे-मागे होतात. त्याची केरळात पोहोचण्याची तारीख १ जून मानली जाते, पण तो दरवर्षी याच तारखेला तिथे पोहोचतो असे नाही. किंबहुना गेल्या ५० वर्षांत तो केवळ तीन वेळा १ जूनला केरळात दाखल झाला. एरवी त्याचे केरळातील आगमन लवकरात लवकर १४ मे रोजी आणि उशिरात उशिरा १९ जून रोजी झाले आहे.

 


त्याच्या महाराष्ट्रातील प्रवासाबाबतही असेच घडले आहे. तो केरळात लवकर आला तरी मध्य महाराष्ट्रात पुणे आणि कोकणात मुंबई येथे लवकर पोहोचतोच असे नाही. १९६० साली तो केरळात १४ मे रोजी दाखल झाला, पण त्याने पुण्यात व मुंबईत पोहोचण्यासाठी तब्बल एक महिना घेतला. या दोन्ही ठिकाणी तो १३ जून रोजी दाखल झाला. १९७४ सालीसुद्धा काहीशी अशीच स्थिती होती. तेव्हा तो २३ मे रोजी केरळात दाखल झाला. पण त्याच्या पुणे व मुंबईतील मुक्कामासाठी २८ जून ही तारीख उजाडावी लागली. असेच काहीसे १९७३, १९७७, १९८१ या सालीही घडले. याउलट काही वर्षी तो अगदी वेळेवर पुढे सरकला. १९८०, १९८४ आणि गेल्या वर्षीसुद्धा त्याचे आगमन वेळेवर झाले. गतवर्षी तो ३१ मे रोजी तो केरळात दाखल झाला. पुढे ७ जून रोजी पुणे व मुंबईत पोहोचला.
मान्सून संपूर्ण भारतभर पसरण्याचा काळही बराच मागे-पुढे होतो. तो सामान्यत: १५ जुलै रोजी देशाचा संपूर्ण भाग व्यापतो. पण १९६१ साली तो २१ जून रोजीच देशभर पोहोचला, तर २००२ सालच्या दुष्काळी वर्षांत त्यासाठी १५ ऑगस्ट ही तारीख उजाडली. याचा अर्थ मान्सूनच्या आगमनाच्या तारखा मागे-पुढे होतातच. त्यात विशेष असे काही नाही. त्याच्यावर हवामानाच्या असंख्य घटकांचा प्रभाव पडत असल्याने ते अपेक्षितच आहे. मान्सूनचा हा इतिहास विसरल्यावर मात्र सर्वच गोष्टी नव्या वाटतात, तेच या वर्षी पाहायला मिळत आहे. प्रत्यक्षात मात्र मान्सूनइतका भरवशाचा क्वचितच दुसरा हवामानाचा घटक सापडेल. कारण त्याचे जून महिन्यातील आगमन कधीही चुकलेले नाही. त्याला काही आठवडय़ांचा विलंब झाला तरी तो येतो आणि सरासरीच्या किमान तीन चतुर्थाश इतका पाऊस देतो, हे निश्चित! मग तो बेभरवशी कसा?
या वर्षी मान्सूनची लहर काही दिवसांसाठी फिरली हे खरे. त्याला जूनच्या सुरुवातीला आलेले ‘एला’ चक्रीवादळही कारणीभूत ठरले. हे वादळ २३ मे रोजी बंगालच्या उपसागरात निर्माण झाले आणि दोनच दिवसांत बंगालच्या किनाऱ्यावर आदळले. त्याच्यामुळे मान्सून ईशान्य भारतात लवकर पुढे सरकला, पण वादळाने समुद्रावरील जास्तीत जास्त बाष्प वापरले आणि मान्सूनच्या पुढील प्रगतीत खंड पाडला. मान्सून वेळेआधी दाखल होण्यामुळे लवकर येणाऱ्या पावसाचा फायदा असतो, तसाच धोकासुद्धा! मान्सून स्थिर होण्यासाठी आवश्यक असलेला वेळ न मिळताच पुढे सरकला, तर चक्रीवादळासारख्या एखाद्या अडथळ्यामुळे त्याची पुढील प्रगती खंडित होऊ शकते. हाच अनुभव या वर्षी आला.
याचबरोबर सध्या मान्सूनचे वारे प्रभावी नसल्याने उत्तर भारतात पश्चिमेकडून येणारे वारे सक्रिय बनले. त्यांच्यामुळे मान्सून वाऱ्यांना पुन्हा स्थिरस्थावर व्हायला वेळ लागत आहे. याशिवाय मान्सूनला पुढे ढकलणारे, विषुववृत्तापलीकडून येणारे वारे क्षीण बनले आहेत. त्यांनीसुद्धा मान्सूनला विश्रांती घ्यायला भाग पाडले आहे. आता या आठवडय़ाच्या अखेरीस बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीत तोच काय तो दिलासा ठरेल. या कमी दाबानेही फसवणूक केली तर जूनच्या अखेरीस किंवा जुलै महिन्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.
सध्या मान्सूनच्या लांबण्याने मात्र आपल्या नियोजनाचे पितळ उघडे पडले. पाऊस आठ-दहा दिवसांनी लांबल्यामुळे इतकी अस्वस्थता पसरावी आणि या परिस्थितीतून मार्ग काढण्याचे सक्षम पर्यायही आपल्याकडे नसावेत, ही बाबच अस्वस्थ करणारी आहे. सध्या मुंबई, पुण्यासारख्या शहरांसह अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यात कपात करावी लागते, याचा अर्थ काय? दुष्काळ किंवा नाजूक परिस्थितीतून पुढच्या नियोजनासाठी धडे घेणे अपेक्षित असते. मागे अनेकदा अशी परिस्थिती येऊनही आपण हे धडे घेतले का, याचे उत्तर आताच्या अस्वस्थतेतून मिळते. वर्तनातील चढउतार हे मान्सूनचे लक्षणच असल्याने भविष्यातही तो आपली फिरकी घेणारच. त्याच्या ‘गुगली’मुळे पुढील काळातही आपले नियोजन बाद झाले, तर त्याचे दोषी आपण असू. त्याचे खापर मान्सूनवर फोडता येणार नाही!
अभिजित घोरपडे
abhighorpade@rediffmail.com