Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १९ जून २००९

विविध

दहशतवादाविरोधात लढण्याचे भारत, अमेरिकेचे आवाहन
वॉशिंग्टन, १८ जून/पी.टी.आय.

कोणत्याही प्रकारचा दहशतवाद खपवून न घेण्याची भूमिका जाहीर करीत भारत व अमेरिका यांनी दहशतवादाविरोधात लढण्याच्या जागतिक मोहिमेसाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्यास आज मान्यता दर्शविली. दहशतवादाच्या प्रश्नावर सातत्य राखून दीर्घकालीन व सर्वसमावेशक लढा उभारण्याच्या प्रयत्नात आंतरराष्ट्रीय समुदायाने सहभागी व्हावे, असे आवाहन उभय देशांनी केले.

संसदेच्या अधिवेशनापूर्वी माणिकराव ठाकरेंऐवजी नव्या प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती?
नवी दिल्ली, १८ जून/खास प्रतिनिधी

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी अ. भा. काँग्रेसमध्ये होणाऱ्या व्यापक फेरबदलांबरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनाही बदलले जाणार आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे नाव आघाडीवर आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात १७ जागाजिंकल्याबद्दल माणिकराव ठाकरे यांना विधान परिषदेवरील बिनविरोध निवडीसह आमदारकीचे बक्षीस मिळाले आहे.

लालगढमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध जोरदार कारवाई
लालगढ, १८ जून/पीटीआय

पश्चिम बंगालमधील लालगढ भागावर कब्जा केलेल्या माओवाद्यांना त्या भागातून हुसकावून लावण्यासाठी सुरक्षा दलांनी कारवाईस आज प्रारंभ केला परंतु नक्षलवाद्यांनी जागोजागी उभे केलेले अडथळे, खणून ठेवलेले रस्ते तसेच भूसुरुंग पेरुन ठेवल्याच्या संशयामुळे या कारवाईत बरेच अडथळे येत होते.पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक सुजीतकुमार सरकार यांनी सांगितले की, पोलिसांनी केंद्रीय सुरक्षा दलांच्या मदतीने लालगढ येथे नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईला आज प्रारंभ केला.

कुख्यात दरोडेखोर अखेर चकमकीत ठार
चित्रकुट, १८ जून / पी.टी.आय.
सुमारे ४०० पोलिसांच्या गोळीला गोळीचे उत्तर देणाऱ्या घनश्याम केवट या कुख्यात दरोडेखोराचा खात्मा करण्यात पोलिसांना तब्बल ५२ तासांनी यश आले. या थरारनाटय़ात चार पोलिसांना आपला जीव गमवावा लागला. घनश्याम केवट हा कुख्यात दरोडेखोर होता. त्याला पकडण्यासाठी पोलिस जीवाचे रान करीत होते. त्याला पकडणाऱ्याला ५० हजारांचे बक्षिसही जाहीर करण्यात आले होते. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवरील घनदाट जंगलातील जामुली या छोठय़ाशा गावातील एका घरात तो असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी जंगलाच्या चारी बाजूंनी घेराव केला. या घरातून घनश्याम व त्याच्या साथीदारांनी पोलीसांच्या दिशेने बेछुट गोळीबार केला. यामध्ये या विशेष पथकाचे नेतृत्व करणारे पोलीस महासंचालक व्ही. के गुप्ता, पोलीस आयुक्त एस. के. सिंग यांच्यासह अनेक पोलीस जखमी झाले. अखेर घनश्यामने आश्रय घेतलेले घर पेटविण्यात आले. घनश्यामने या घरातून पळण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या गोळीने त्याचा वेध घेतला. घनश्याम चकमकीत ठार झाला असला तरी ही मोहीम अद्याप संपली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. घनश्यामचे अनेक साथीदार जंगलात लपले असल्याचा संशय असून त्यांचा आता शोध घेण्यात येत आहे.

ओरिसामध्ये नक्षलवाद्यांनी घडविलेल्या स्फोटात नऊ पोलीस ठार
भुवनेश्वर, १८ जून/पीटीआय
ओरिसातील कोरापूत जिल्ह्यातील जोगी पल्लूर या ठिकाणी राज्याच्या नक्षलवादीविरोधी पथकाची एक जीप आज सायंकाळी साडेपाच वाजता नक्षलवाद्यांनी सुरुंगस्फोटाद्वारे उडवून दिली. या घटनेत ओरिसाचे नऊ पोलीस शहीद झाले. ओरिसा स्पेशल स्ट्राईक फोर्सचे (ओएसएसएफ) पोलीस जीपने नारायणपतन येथून लक्ष्मीपूर येथे चालले होते. या रस्त्यावर नक्षलवाद्यांनी अडथळे उभारले होते. स्फोट घडविण्यात आलेल्या ठिकाणी सीआरपीएफचे जवान तातडीने रवाना झाले. लक्ष्मीपूर येथे हे जवान व नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.

वझिरिस्तानमध्ये अमेरिकी विमानांच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात नऊ जण ठार
इस्लामाबाद, १८ जून/ पी.टी.आय.
अमेरिकी ड्रोन विमानांनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात पाकिस्तानच्या दक्षिण वझिरीस्तान या आदिवासी भागात नऊ जण ठार झाल्याचे एका खाजगी दूरचित्रवाणी वाहिनीवर सांगण्यात आले. तालिबानी नेता बैतुल्लाह मसूद याचा तळ या भागात असल्याचे मानले जाते. त्या ठिकाणी एकंदर तीन क्षेपणास्त्रे या भागातील मदरशावर आणि निवासी भागात डागण्यात आली. वाणा शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर हा परिसर असून ठार झालेल्या व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नसल्याचे वृत्तात म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून तालिबान्यांविरोधातील कारवाईसाठी पाकिस्तानी लष्कर, हेलिकॉप्टर्सच्या ताफ्यासह या परिसरात शोध घेत आहे. मसूद व त्याच्या साथीदारांना शोधण्यासाठी काही ठिकाणी कारवाईही केली जात आहे. यामुळे हजारो नागरिक या भागातून अन्यत्र स्थलांतर करीत आहेत.

मिग कोसळले, चालक सुरक्षित
नवी दिल्ली, १८ जून / पी.टी.आय.
हवाई दलाचे मिग-२१ हे लढाऊ विमान आज आसामच्या छाबुआ भागात कोसळले. सुदैवाने या घटनेत चालक बचावला .आसाममधील छाबुआ येथील तळावरुन सरावासाठी या विमानाने उड्डाण केले व काही क्षणातच ते कोसळले. विमानाचे उड्डाण होताच त्यामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याचा संदेश प्राप्त झाला होता असे सूत्रांनी सांगितले. कोसळलेल्या विमानाच्या चालकाने कॉकपीटमधून बाहेर पडण्यात यश मिळविले. मिग कोसळण्याचे प्रकार वाढत असून ही सहावी घटना असल्याचे सांगण्यात आले.

हिलरी क्लिंटन यांच्या हाताला दुखापत
वॉशिंग्टन, १८ जून/पी.टी.आय.

अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री हिलरी क्लिंटन या व्हाईट हाऊस परिसरात पडल्यामुळे त्यांच्या उजव्या हाताच्या कोपराजवळ फ्रॅक्चर झाले. भारतासंबंधीचे महत्त्वपूर्ण भाषण संपवून ६२ वर्षीय हिलरी क्लिंटन आज दुपारी त्या सभागृहाबाहेर पडत असताना पाय अडकून खाली पडल्या. त्यांना लगेच इस्पितळात नेऊन उपचार करण्यात आले. कोपराला फ्रॅक्चर झाल्यामुळे येत्या आठवडय़ात त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागणार असून त्यानंतर त्या पूर्ववत काम करू शकतील, असे सांगण्यात आले. दरम्यान, वैद्यकीय पथकाने तत्परतेने उपचार केल्याबद्दल श्रीमती क्लिंटन यांनी त्यांची प्रशंसा केली आहे.