Leading International Marathi News Daily
शनिवार, २० जून २००९
  बाप ‘माणूस’
  एक गूढाचा प्रवास
  पण बोलणार आहे!
नेति! नेति!
  सक्षम मी
तडफदार!
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  उपेक्षित फ्रेंच कादंबरीकार - फैझा ग्वेन
  शिक्षण देता - घेता
  फूड स्टायलिश
  मुलांमध्ये रमणारे बाबा
  ‘मायक्रो’ कल्चर!
  झाले मोकळे आकाश
  चिकन सूप...
खरी ओळख
  कवितेच्या वाटेवर...
स्पर्शानं हेलावणं
  पंखांना बळ देताना...
  ललित
पैल तोगे काऊ कोकताहे...
  अदभुत!

 

बाप ‘माणूस’
आपल्याकडे आईविषयी प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. तशी वडिलांबद्दलची भावना व्यक्त करण्याची परंपरा मात्र रुजलेली नाही. वडिलांनीही मुलीबद्दल वा मुलाबद्दल फार हळव्या भावनांचं प्रदर्शन करायचं नाही, असाच संकेत काल-परवापर्यंत तरी रूढ होता. पण हे संकेत आता मोडायला लागले आहेत. आणि बाप हाही एक हाडामांसाचा ‘माणूस’ म्हणून प्रकटू लागलेला आहे.अलीकडच्या पिढीबद्दल मला एक कौतुक वाटतं. या पिढीनं साऱ्या गोष्टी फार म्हणजे फारच सोप्या करून टाकलेल्या आहेत. फादरबद्दल आदर दाखवायचाय? बाजारात जा, दहा-वीस रुपयांचं एक शुभेच्छापत्र घ्या, खाली सही ठोका आणि द्या बापाकडे धाडून! त्यातल्या रेडिमेड शब्दांतून बापाबद्दलचं जे प्रेम झिरपत असतं त्याला तोड नाही. धड इंग्रजी आणि धड मराठीही न येणाऱ्या आजच्या सुपुत्राला किंवा

 

सुपुत्रीला तसे शब्द कुठून सुचणार? ग्रीटिंग कार्डानं ही सोय चांगली करून ठेवलेली आहे. मनातल्या सर्व भावभावनांना नेमकं शब्दरूप आणि चित्ररूप दिल्यामुळे मुलाला एखाद्या मुलीबद्दल किंवा मुलीला एखाद्या मुलाबद्दल प्रेमभावना (म्हणजे ‘आय लव्ह यू’ अशी!) व्यक्त करायची झाली तरी नेमक्या शब्दांसाठी डोकं खाजवत बसावं लागत नाही. आणि दहा- पंधरा- वीस रुपयांत मुक्या भावनांना शब्दरूप मिळून जातं. ग्रेट!
आमच्या बालपणी बापाबद्दल आदर ‘दाखवण्या’साठी ‘असा’ वेगळा दिवस शोधावा लागायचा नाही. तो नेहमीच ‘दाखवणं’ कंपलसरी होतं. विशेषत: बाप समोर असेल तेव्हा! हे ‘दाखवणं’ त्या काळात फार अवघड जायचं. जी गोष्ट अस्तित्वातच नाही, ती दाखवायची तर केवढं नाटक रोज करावं लागत असेल, याची कल्पना केलेली बरी! बऱ्याच घरांत बापाची दहशतच असायची. आई स्वत:कडे प्रेमळपणाचा मक्ता घ्यायची आणि बापाच्या मानगुटीवर २४ तास राक्षसपार्टीची भूमिका येऊन बसायची. पाळण्यातल्या पोरालासुद्धा ‘आता दूध पितोस/ अभ्यास करतोस/ भाजी खातोस../.. (अशा अनेक नावडत्या कृत्यांचा समावेश गाळलेल्या जागा भरून करावा) की सांगू बाबांना? त्यांनी फटका मारला की समजेल मग सुख!’ थोडक्यात म्हणजे ‘बाप’ हा ऊठसूट मुलांना धाकदपटशा दाखवणारा, शिस्तीच्या नावाखाली कोवळ्या मुलांना फटके मारणारा, मुलांशी प्रेमळपणे न बोलणारा, तोंड उघडलं की पोरांच्या नावाने ठणाणा करणारा असा विचित्र प्राणी- अशी काहीशी ‘बापा’ची अलिखित व्याख्या बनून गेली होती. स्वत:च्या विद्यार्थीदशेत नापास होऊनही आणि ‘अभ्यास हा किती कंटाळवाणा असतो’ याचा अनुभव घेऊनही ‘मुलं अभ्यास करत नाहीत’, अशी कुरकुर आणि चिडचीड करणारे कितीतरी कारकुनी बाप त्या काळात आजूबाजूला आढळायचे. स्वत:चे बालपण विसरण्याचा बाप मंडळींना शापच असतो की काय न कळे!
अलीकडेच जुन्या पिढीतले एक वृद्ध गृहस्थ मला म्हणाले, ‘आया फक्त तीनच! एक यशवंतांची आई (‘आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी’), दुसरी श्यामची आई आणि तिसरी गजानन वाटव्यांची आई!’ (गजानन वाटव्यांची आई कशी काय? हा प्रश्न तुमच्याप्रमाणे माझ्याही मनात आला. तर ते आईवरची ‘प्रेमस्वरूप आई’ ही माधव ज्यूलियनांची करुण कविता आपल्या आवाजात म्हणून ऐकणाऱ्यांच्या डोळ्यांत हुकमी पाणी उभं करायचे, म्हणून!) पण आता हे तीनच मैलाचे दगड नाहीत. (त्याही काळात वा. गो. मायदेवांसारखे (‘तिथे माझी असणार नाही आई’) आणखीही कवी होते.
आता तर आईविषयक साहित्यात वेगानं भर पडते आहे. भालचंद्र पेंढारकरांचं ‘आई तुझी आठवण येते’ हे हंबरडावजा नाटय़गीत, फ. मुं. शिंदे आणि अलीकडच्या तत्सम कवींच्या आईविषयक कविता, अरुण कांबळे ते उत्तम कांबळे अशा दलित लेखकांनी रेखाटलेली आईची व्यक्तिचित्रणं, मराठी चित्रपटातील आईविषयक हृदयद्रावक गाणी.. बाप रे! आईवर केवढं हे साहित्य!
बट व्हॉट अबाऊट ‘फादर’? मराठी साहित्यात बापाचे स्थान नगण्यच म्हणावे लागेल. कवी बींची ‘माझी कन्या’ ही एकमेव कविता ‘बापा’च्या खात्यावर जमा आहे. तीही कुण्या मुलानं वा मुलीनं वडिलांविषयी आदरानं लिहिलेली नाही, तर बापाने स्वत:च स्वत:च्या वात्सल्याचं दर्शन किंवा प्रदर्शन तीत घडवलेलं आहे. त्यानंतरचा साहित्यातला मातब्बर ‘बाप’ म्हणजे नरेंद्र जाधवांचा. खरोखरच थोर ‘बाप’! अनेक देशी-विदेशी भाषांत अनुवाद होऊन मराठीतला हा ‘बाप’ आता विश्वसाहित्याचा एक भाग बनून गेलेला आहे. झालंच तर मालतीबाई बेडेकरांची स्वत:च्या वडिलांवर ‘खरे मास्तर’ ही छोटीशी कादंबरी आहे. याहून अधिक ‘बापा’वर साहित्य मराठीत उपलब्ध असल्याचं ठाऊक नाही. (चूकभूल द्याव-घ्यावी.) ओरिजिनल संस्कृत ‘शाकुंतला’तला वात्सल्यमूर्ती कण्व मराठी नाटकातही आलेला आहे. तो आणखी जमेस धरला तरी एकूण परिस्थिती ‘बापा’ची कणव करावी अशीच आहे.
क्षमाशील व करुणामूर्ती आई आणि तिचा उद्धट व माजोरडा मुलगा हे तर मराठी मध्यमवर्गाच्या मनातलं मोठं ‘गुलाबी स्वप्न’ किंवा ‘गुलाबी फॅण्टसी’ आहे. या स्वप्नाची आद्य दंतकथा तुम्हाला ठाऊक असेलच. एक निर्दय प्रेयसी प्रियकराला त्याच्या आईचं हृदय घेऊन यायला सांगते. तो क्रूर मुलगा आईला मारून पिशवीतून ते हृदय प्रेयसीकडे घेऊन चाललेला असतो आणि त्याला ठेच लागून तो पोरगा वाटेत उलथतो. तेव्हा बाजूला पडलेल्या पिशवीतून आवाज येतो- ‘बाळ, तुला लागलं तर नाही ना?’ भारतात अनेक वर्षांपासून पितृप्रधान समाजरचना अस्तित्वात असताना अशा धर्तीवर बापाबद्दलच्या किमान पाच-पंचवीस तरी दंतकथा लिहून घ्यायला हव्या होत्या.. आणि आतापर्यंत त्या कर्णोपकर्णी व्हायला हव्या होत्या. असो.
याच कथेची थोडी थोडी बदललेली ‘व्हर्शन्स’ म्हणजे ‘मोलकरीण’, ‘एकटी’ हे सुलोचना माऊलींचे घळाघळा घळाघळा रडवणारे मराठी चित्रपट. त्यामुळे ‘शिकलेला मुलगा पुढे आपल्याला विचारणारच नाही’, हे तमाम मराठी मध्यमवर्गीय बायकांच्या मनावर इतकं बिंबलेलं असायचं, की प्रत्यक्षात जर मुलगा पुढे त्याचं लग्न झाल्यावर आईशी चांगला वागला तर तिला हा धक्का सोसायचाच नाही. त्यामुळेसुद्धा अनेक आया अंथरुण धरायच्या.
तुटपुंज्या पगारात संसार चालवणारे बाप, चाळीतलं दारिद्रय़, घररूपी आणि चाळरूपी खुराडय़ातलं संकुचित विश्व, सकाळी वर्तमानपत्र वाचत मुलाच्या खासगी आयुष्यात नाक खुपसण्याची वृत्ती (पाहा : सतीश आळेकरची एकांकिका : ‘एक झुलता पूल’), ‘चिरंजीवांना दोन वेळा फुकटचं गिळायला मिळतंय म्हणून हे धंदे सुचताहेत!’ असा येता-जाता केलेला मुलाच्या कर्तबगारीचा पंचनामा.. त्या बापांचा संताप, चिडचिड आणि एकुणातच पोरांबद्दल प्रेम उघड करून दाखवण्याची अॅलर्जी- हे सारं बघता बघता इतिहासजमा झालेलं आहे. या पोळलेल्या आमच्या पिढीनं बाप झाल्यावर ‘असं वागणं टाळायचं’ हे मनाशी पक्कं केलं होतं. जे आपल्या वाटय़ाला आलं ते मुलांच्या वाटय़ाला येता कामा नये, ही त्यामागची भूमिका होती.
आमच्या पिढीतल्या ‘बापा’ना एकुलती एक मुलगी किंवा एकुलता एक मुलगा.. आर्थिक परिस्थितीही आमच्या वडिलांपेक्षा बरी. त्यामुळं ‘एकुलत्या एका’च्या वाटय़ाला फक्त लाड, लाड आणि लाडच! मुलांना धाक दाखवण्याची कल्पना तर आमच्या मनाला शिवूच शकत नव्हती. अनेक घरांत ‘बापा’बद्दलचा दुरावा जाऊन त्याला मुलं ‘ए बाबा’ असं म्हणू लागली होती. आणि ‘अहो बाबा’पेक्षा ‘ए बाबा’ हे कानालाही गोड वाटत होतं. अलीकडे हॉटेलवाल्यांना मिरपूड स्वस्तात मिळू लागलेली होती, हे तुमच्या लक्षात आलंय का? त्याचं कारण हेच. एकुलती एक मुलगी आपल्या बापाच्या डोक्यावर मिऱ्या वाटायची. फ्लॅटोफ्लॅटी हाच ‘कुटिरोद्योग’! आज कोणत्याही घरातील टीनएजर मुलगी आणि तिचा बाप यांच्यातील संवाद मोठा प्रेक्षणीय आणि श्रवणीय असतो. ‘शहाण्या’ बापाचा असा प्रेमसंवाद घाईघाईने आटोपता घेण्याकडेच कल असतो. थोडक्यात म्हणजे आमच्या लहानपणी आम्हाला बापाचा धाक आणि मोठेपणी मुलीचा धाक! त्यामुळे कायम ‘भय इथले संपत नाही’ अशी घाबरलेली अवस्था!
आपल्याकडे आईविषयी प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे, हे लेखात आधी आलेलंच आहे. तशी परंपरा वडिलांबद्दल भावना व्यक्त करण्याची नाही. वडिलांनीही मुलीबद्दल वा मुलाबद्दल फार हळव्या भावनांचं प्रदर्शन करायचं नाही, असाच संकेत काल-परवापर्यंत होता. पण हे संकेत आता मोडायला लागले आहेत. अनेक बाप आपली स्टिरिओटाइप कठोर प्रतिमा मोडून मुलीच्या लग्नात मुक्तकंठानं रडू लागलेले आहेत. कठोरपणा, उग्रपणा हे एकेकाळी बापाचं व्यवच्छेदक लक्षण मानलं जायचं, ते आता इतिहासजमा झाल्यातच जमा आहे. आणि बाप हाडामांसाचा ‘माणूस’ म्हणून प्रकटलेला आहे. तो आता नुसता ‘बाप’ राहिलेला नाही, तर बाप ‘माणूस’ झालेला आहे.
पूर्वी फक्त आशा पारेख किंवा साधना टाईपच्या जाडय़ा नटय़ा ‘ओ: डॅडी!’ म्हणून पडद्यावरच्या बापांच्या मिठीत जायच्या. आता वयानं मोठय़ा मुली जितक्या सहजपणे आईच्या कुशीत शिरतात, तितक्याच सहजपणे वडिलांच्या कुशीतही शिरतात. स्पर्शाचं अवघडलेपण बाप-मुलगी नात्यातून हद्दपार झालं, हे फारच चांगलं झालं.
प्रेमाच्या, मायेच्या, वात्सल्याच्या भावना अशा स्पर्शातून व्यक्त होत असतातच. पण तरीही अनेकदा अभ्यासाच्या धबडग्यात, रोजच्या घाईगर्दीत, संसाराच्या रामरगाडय़ात वडिलांबद्दल कृतज्ञता, प्रेम हे शब्दांतून सांगायचंच राहून जातं. ‘खरे मास्तर’मध्ये मालतीबाईंनी असा एक हृदयस्पर्शी प्रसंग स्वत:च्या वडिलांबाबत लिहिलेला आहे. त्यात शेवटी म्हातारे वडील कळवळून मुलींना विचारतात, ‘तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतंय? मी तुमच्याशी योग्य तेच वागलो ना?’ आणि वडिलांच्या शेवटच्या आजारात मालतीबाईंच्या लक्षात येतं की, वडिलांबद्दलची कृतज्ञता आपण कधीच शब्दांत व्यक्त केली नाही. त्यांना जन्माची चुटपूट लागून राहते.
अलीकडच्या पोरांना अशी चुटपूट लागणार नाही. वर्षांतून एकदा का होईना, त्यांना आपल्या वडिलांबद्दलच्या सद्भावना व्यक्त करण्याची संधी ‘फादर्स डे’च्या निमित्ताने मिळते आहे. ग्रीटिंग कार्ड देणं वगैरे प्रकार काहीसा कृत्रिम आहे, वरवरचा आहे. थोडा खोटाही वाटणारा आहे. पण तसंही अलीकडच्या बापांच्या तरी मुलांकडून अशा कोणत्या अवाढव्य अपेक्षा असतात? तेही मनातल्या मनात मुलांना उद्देशून त्यांच्या पिढीतल्या देव आनंदच्या गाण्याचा संदर्भ थोडा बदलून हेच म्हणत असतात- ‘पलभर (या ‘दिनभर’) के लिए कोई हमें प्यार कर ले- झुठा ही सही!’
मुकुंद टाकसाळे