Leading International Marathi News Daily

शनिवार, २० जून २००९

विलासरावांना घरचा आहेर!
सुमारे आठ वर्षे मुख्यमंत्रीपदावर असताना पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची फारशी काळजी न घेणाऱ्या विलासराव देशमुख यांना अचानक कार्यकर्त्यांच्या भावनाची कदर करावीशी वाटू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करण्यापेक्षा काँग्रेसने स्वबळावर लढावे, असा घोषा त्यांनी सुरू केला आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांची मते आपण जाहीरपणे मांडत असल्याचे सांगण्यात ते विसरत नाहीत. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गेल्या दहा वर्षांतील एकूणच वर्तणुकीमुळे काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीच्या नेतृत्वाविषयी आकस आहेच. स्वबळावर लढण्याची मागणी विलासराव सातत्याने मांडू लागल्याने राष्ट्रवादीला टोकाचा विरोध असणाऱ्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांमध्ये साहजिकच विलासरावांबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागल्यापासून विलासराव सातत्याने राष्ट्रवादीबरोबर घटस्फोटाची मागणी करू लागले आहेत.

मोठय़ा मतदारसंघामुळे प्रचारात होणार दमछाक
अक्कलकुवा-अक्राणी

(दत्ता वाघ)

नव्या रचनेनुसारअक्राणी विधानसभा मतदार संघात संपूर्ण अक्कलकुवा तालुक्याचा समावेश करण्यात आल्याने पूर्वीची समीकरणे अमूलाग्र बदलणार आहेत. अगोदर लोअर शहादा अर्थात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेला शहादा महसुली भाग यामध्ये समाविष्ट होता, तो आता शहादा मतदारसंघाला जोडण्यात आला आहे तर त्यातील काही मंडळे नंदुरबार मतदार संघाला जोडली गेली आहेत. नवा अक्कलकुवा-अक्राणी लोकसभा मतदार संघ भौगोलिक दृष्टय़ा परिसरातील सर्वात मोठा मतदार संघ झाला असून त्यात दुर्गम पाडय़ांचाही समावेश आहे. नर्मदा काठावरील मणीबेली, बामणी, उनेल ते तोरणमाळसह खडकी, झापी, फलई, सिंदी दिगर आदी दुर्गम भागाचा समावेश या मतदार संघात असल्याचे उमेदवारांसाठी प्रचाराचे काम अधिक खडतर असणार, हे निश्चीत.

वीजदरवाढ कमी न झाल्यास रस्त्यावर यावे लागेल - राज ठाकरे
मुंबई, १९ जून/ खास प्रतिनिधी

मुंबईत करण्यात आलेली बेलगाम वीजदरवाढीमुळे मुंबईकर जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाने याबाबत पुढाकार घेऊन ही दरवाढ कमी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उर्जामंत्री सुनिल तटकरे यांच्याकडे केली. राज्यसरकार दरवाढ कमी करू शकले नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही राज यांनी दिला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात उर्जामंत्री तटकरे यांनी भेट घेऊन वीजदरवाढ कमी करण्याची मागणी करणारे निवेदन दिले.

आघाडीत झाली बिघाडी
पनवेल पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता
पनवेल, १९ जून/वार्ताहर
३८ पैकी केवळ सात नगरसेवक असणाऱ्या राष्ट्रवादीने शुक्रवारी राजकीय चमत्कार घडवीत पनवेल नगरपालिकेवर सत्ता मिळविली. शुक्रवारी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील मोहोड हे २२ विरुद्ध १४ अशा आघाडीने निवडून आले, तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्याच जयवंत महामुनी यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूकपूर्व आघाडी असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीचा घरोबा संपुष्टात आल्याने काँग्रेसचे नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर यांना विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीत वाद पेटणार !
कळवा-मुंब्रा

शशिकांत कोठेकर

ठाणे व मुंब्य्राची खाडी यांच्यामध्ये वसलेल्या कळवा-मुंब्रा या नवीन विधानसभा मतदारसंघावर दावा सांगण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत इच्छुकांची लढाई सुरू झाली असून या मतदारसंघात असलेली मुस्लिम मतदारांची संख्या लक्षात घेता मुस्लिम समाजासाठी ही जागा सोडून देण्याची मागणी सुरू झाली आहे. ठाणे महापालिकेचा भाग असलेला खाडीपलिकडील कळवा-मुंब्य्राचा परिसर लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात येतो.

काँग्रेस व राष्ट्रवादीत जागावाटप कसे होणार?
मुंबई, १९ जून / खास प्रतिनिधी

विविध नेत्यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत अनिश्चितता निर्माण झाली असली तरी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर आघाडी व्हावी, असाच एकूण मतप्रवाह आहे. आघाडी झाल्यास कोणत्या पक्षाच्या वाटय़ाला किती जागा येतील याबाबत आतापासून चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीला जास्त जागा देण्यास काँग्रेसमधून आतापासूनच विरोध होऊ लागला आहे.

वाई नगराध्यक्षपदासाठी तीन अर्जामुळे चुरस
वाई, १९ जून / वार्ताहर
नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी शनिवारी मतदान होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांचे अर्ज राहिल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. निवडणुकीसाठी चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये उपनगराध्यक्ष व भाजपच्या नगरसेविका डॉ. मेधा घोटवडेकर यांनी तीर्थक्षेत्र आघाडीला सोडचिठ्ठी देऊन जनकल्याण आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. याचबरोबर डॉ. घोटवडेकर यांनी तीर्थक्षेत्र आघाडीच्या नगरसेविका शोभा रोकडे यांच्या अर्जावर सूचक म्हणूनही सही केली. तीर्थक्षेत्र आघाडीच्या सहयोगी व अपक्ष नगरसेविका नीलिमा खरात यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, तीनही उमेदवार आमचेच असून, नगराध्यक्ष आमचाच होणार असल्याचे तीर्थक्षेत्र आघाडीच्या सूत्रांनी सांगितले.