Leading International Marathi News Daily

शनिवार, २० जून २००९

माऊलीच्या साथीनं हरिनाम गाऊ,
वाट घाटातलीही वाटे आज लोण्याहून मऊ..

सावळ्या परब्रह्माच्या भेटीच्या ओढीनं संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संगतीनं पंढरीच्या वाटेवर निघालेल्या लाखो वैष्णवांनी शुक्रवारी दिवे घाटातील अवघड टप्पा लीलया पार केला. माऊलींची पालखी संध्याकाळी सासवड मुक्कामी पोहोचली.

जगप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ यांचे निधन
कोलकात्ता, १९ जून/पीटीआय
जागतिक कीर्तीचे सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ (वय ८८) यांचे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील त्यांच्या संगीत केंद्रात किडनीच्या प्रदीर्घ विकाराने आज सकाळी १० वाजता निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. जगविख्यात सतारवादक पंडित रविशंकर यांचे सचिव रॉबिन पाल यांनी येथे ही माहिती दिली. त्यांच्यामागे पत्नी मेरी, तीन मुलगे व एक मुलगी असा परिवार आहे. खॉ यांचे कोलकात्ता येथील सचिव आशिष रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार वर्षांपासून किडनी विकाराने त्रस्त असलेल्या उस्तादांची प्रकृती गेल्या चार महिन्यांत खूप खालावली होती व त्यांना सतत डाएलिसिसवर ठेवावे लागत होते.(अल्पचरित्र)

मंगळावर ३.४ अब्ज वर्षांपूर्वीचे सरोवर सापडल्याचा दावा
वॉशिंग्टन, १९ जून / पी.टी.आय.
मंगळाच्या पृष्ठभागावर पाण्याचे सरोवर असल्याचे पुरावे सापडल्याचा दावा अमेरिकेच्या संशोधकांनी केल्यामुळे अब्जावधी वर्षांपूर्वी या ग्रहावर जीवसृष्टी नांदत असल्याची परिकल्पना भविष्यात खरी ठरण्याची शक्यता आहे. साधारणत: ३.४ अब्ज वर्षांपूर्वी मंगळावर २०७ चौरस किमी व्यासाचे आणि ५०० मीटर खोल पाण्याचे सरोवर होते, असे नव्या संशोधनात आढळून आले आहे. या सरोवराचा आकार नव्या चित्रिकरणात स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा कोलोरॅडो विद्यापीठातील संशोधकांच्या चमूने केला. मंगळावर पाणी होते, याचा अर्थ या परग्रहावर जीवसृष्टी निश्चितपणे नांदत असावी. संशोधकांच्या हाती लागलेला हा ताजा पुरावा आहे, असे संशोधन जिओफिजिकल रिसर्च लेटर्सच्या अलीकडच्या आवृत्तीत प्रकाशित झाले आहे.

अजित पवार यांना स्वत:च्याच खात्याकडून घरचा अहेर
मुळा नदीतील फूटब्रिजचे बांधकाम थांबविण्याचे आदेश!
पुणे, १९ जून/खास प्रतिनिधी
राज्याचे जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या पत्नीच्या मालकीचे घोटावडे येथील मुळा नदीतील फूटब्रिजचे बांधकाम थांबविण्याचे आदेश जलसंपदा विभागातर्फे आज देण्यात आले. याचबरोबर त्या ठिकाणी नदीच्या पात्राशी संबंधित करावयाच्या कामाचे सर्व आराखडे जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांकडून तपासून घेऊन सर्व काम त्यांच्या तांत्रिक देखरेखीखालीच करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. जलसंपदा विभागाच्या पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश सुर्वे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना ही माहिती दिली. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या मालकीच्या ‘फायर पॉवर अ‍ॅग्रो फार्मस् प्रा. लि.’ या कंपनीच्या घोटावडे (ता. मुळशी) येथील जागेत फार्म हाऊसचे बांधकाम सुरू आहे. हे ठिकाण पुण्यापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर आहे. या जागेत सुरू असलेल्या फार्म हाऊसच्या बांधकामासाठी मुळा नदीच्या पात्रातील माती व वाळू खरवडण्यात आली आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या प्रकृतीत सुधारणा
वर्धापनदिनाचा कार्यक्रम रद्द
मुंबई १९ जून / प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत आज सुधारणा झाल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. बाळासाहेबांना अतिदक्षता विभागातून स्वतंत्र कक्षामध्ये हलविण्यात आले असून मंगळवारपर्यत त्यांना घरी सोडण्यात येईल. बाळासाहेब रुग्णालयात असताना वर्धापन दिन साजरा करणे योग्य न वाटल्याने आजचा षण्मुखानंद येथील मेळावा रद्द करण्यात आला असे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी सांगितले. श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने गुरुवारी रात्री शिवसेनाप्रमुखांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कालपासून शिवसेनेप्रमाणेच भारतीय जनता पक्षाच्याही विविध नेत्यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

उत्तर महाराष्ट्रात पावसाचे आगमन
नाशिक, १९ जून / प्रतिनिधी

गेल्या दोन आठवडय़ांपासून प्रतीक्षा असणाऱ्या पावसाचे आज उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव व नंदुरबार जिल्ह्य़ाच्या काही भागात आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. पावसामुळे वातावरणात काहिसा गारवा निर्माण झाला असून उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना सुखद अनुभव येत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे बाजार समितीत उघडय़ावर असणारा कांदा व इतर कृषीमाल भिजल्याने नुकसान सहन करावे लागले.

भाजपच्या वरिष्ठ वर्तुळातील काहींची गच्छंती अटळ !
समर खडस, मुंबई, १९ जून

भारतीय जनता पार्टीच्या उद्या होत असलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये बरीच गरमागरमी होणार आहे. सध्या भाजपमध्ये सुरू असलेल्या सुंदोपसुंदीमध्ये नक्की कुणाकुणाचा बळी जाणार याबाबत भाजपच्या अंतर्गत गोटात विविध चर्चाना ऊत आला आहे. मात्र दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनुसार यशवंत सिन्हा, सुधींद्र कुलकर्णी, चंदन मित्रा, तपन दासगुप्ता आदींची गच्छंती नक्की आहे. येत्या ६ जुलैपासून भारतीय जनता पार्टी देशव्यापी सभासद नोंदणीचे देशव्यापी अभियान सुरू करणार आहे. यानंतरच भाजपची नवी केंद्रीय कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र पक्षातील फेरबदलांना अजून बराच कालावधी बाकी असला तरी पक्षातील गटबाजी इतक्या जोरात सुरू आहे की, कधीही काहीही होऊ शकते, असे अनेकांना वाटते आहे. गेल्याच आठवडय़ात दिल्लीमध्ये मुरली मनोहर जोशी व गोविंदाचार्य यांची दिल्लीत भेट झाल्यानेही भाजपमधील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सदोष ‘एन्ट्री’मुळे ‘एमपीएससी’चा निकाल ‘आऊट’!
आयोग म्हणते.. पारदर्शकता राखण्यास निकाल स्थगित
पुणे, १९ जून / खास प्रतिनिधी
पसंतीक्रमाबाबत उमेदवारांनी घेतलेले आक्षेप प्रथमदर्शी योग्य ठरल्याने २००६ सालच्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल स्थगित ठेवण्याची वेळ महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर आली आहे. सदोष संगणकीय संस्करणामधून (डेटा एन्ट्री) हा गोंधळ निर्माण झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात येत असून निवडसूचीमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारण्यात आलेली नाही. उमेदवारांच्या गुणांमध्ये मात्र कोणतीही चूक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य लोकसेवा आयोगातर्फे २००६ सालच्या या मुख्य परीक्षेचा निकाल आठ जूनला जाहीर करण्यात आला. या परीक्षेच्या माध्यमातून ३९८ जागांवर भरती करण्यात येणार होती. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी दर्जाच्या पदांसह ‘क्लास ए’च्या ११९, तर ‘क्लास बी’च्या २७९ जागांचा समावेश आहे. हा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यावर आक्षेप नोंदविण्यात आला. पदांचे पसंतीक्रम आणि जाहीर करण्यात आलेल्या पसंतीक्रमामध्ये तफावत असल्याचे प्रथमदर्शी आढळले. या विसंगतीमुळेच संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेला निकाल स्थगित ठेवण्यात आला आहे.

मान्सूनचा रुसवा संपला!
दोन-तीन दिवसांत कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात येणार
पुणे, १९ जून / खास प्रतिनिधी
तब्बल बारा दिवसांनंतर मान्सूनचा रुसवा संपला असून, तो कर्नाटकमध्ये पुन्हा सक्रिय झाला आहे. त्याचा पुढील दोन-तीन दिवसांत कोकण व दक्षिण महाराष्ट्रात प्रवेश होण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. मान्सूनच्या आगमनाबरोबरच राज्यात पुढील आठवडय़ात समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.
मान्सूनची अरबी समुद्रातील शाखा आता सक्रिय बनली आहे.

अरुण शौरींच्या पत्रामुळे भाजपमधील कलह तीव्र
नवी दिल्ली, १९ जून/खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांतील पराभवाच्या पाश्र्वभूमीवर उद्यापासून येथे होत असलेल्या भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसांच्या बैठकीच्या पूर्वसंध्येला आज भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांना पत्र लिहून पराभवाची गंभीरपणे कारणमीमांसा व्हावी, अशी मागणी केल्याचे समजते.

तीन दुरुस्त्या सुचवून केंद्राने ‘गुजकोका’ विधेयक परत पाठविले
नवी दिल्ली, १९ जून/खास प्रतिनिधी

दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी कडक तरतुदींचा समावेश असलेल्या गुजकोका (गुजरात कंट्रोल ऑफ क्राईम अ‍ॅक्ट) विधेयकात तीन महत्त्वाच्या दुरुस्त्या सुचवून आज केंद्रीय मंत्रिमंडळाने हे विधेयक परत पाठविले. त्यामुळे दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईची भाषा वापरणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मनसुब्यांना धक्का बसला आहे. महाराष्ट्राच्या मकोका कायद्याच्या धर्तीवर गुजरात विधानसभेने गुजकोका विधेयक पारित करून राष्ट्रपतींच्या संमतीसाठी केंद्र सरकारकडे पाठविले होते. राष्ट्रपतींच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेले गुजकोका विधेयक केंद्र सरकारनेदुसऱ्यांदा परत पाठविले आहे. आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुजकोका विधेयक गुजरात सरकारकडे परत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. गुजकोका विधेयक केंद्राच्या कायद्यानुरुप होण्यासाठी तीन आवश्यक बदल करण्याची गरज आहे, अशी या निर्णयाची माहिती देताना गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले. पोलीस अधिकाऱ्यासमोर दिलेला कबुलीजबाब न्यायालयात ग्राह्य मानण्याची तरतूद या विधेयकातून वगळण्यात यावी तसेच सरकारी वकिलाने आक्षेप घेतल्यास न्यायालयाला जामीन देता येणार नाही, ही जाचक तरतूद गाळण्यात यावी, अशीही सूचना मोदी सरकारला करण्यात आली आहे. या विधेयकाला विद्यमान स्वरुपात राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठविता येणार नाही, असे चिदंबरम यांनी स्पष्ट केले. गेल्यावर्षी संसदेने बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी पारित केलेल्या दहशतवादविरोधी कायद्याच्या अनुरुप गुजकोका विधेयकात दुरुस्त्या केल्याशिवाय हे विधेयक मंजुरीला पाठविणे शक्य नाही, असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

 


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी