Leading International Marathi News Daily
रविवार, २१ जून २००९

मराठी रंगभूमीची मृत्युघंटा?
मराठी रंगभूमी सध्या हलाखीच्या स्थितीत आहे, प्रेक्षकांअभावी मराठी नाटक मरणार की काय, अशी भीती सर्वानाच भेडसावते आहे. तरीही नवी नाटकं मात्र यायचं थांबलेलं नाही. तेव्हा खरंच वस्तुस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी नाटकवाल्यांनाच आम्ही लिहितं केलंय. त्याद्वारे मुख्य धारेतील रंगभूमीबरोबरच समांतर रंगभूमीचाही धांडोळा घेण्याचा हा रोखठोक प्रयत्न..
गेली काही वर्षे मराठी रंगभूमीची अवस्था अत्यंत वाईट आहे. नाटकांना बुकिंग नाही, नाटय़निर्मितीची खर्च मात्र दिवसेंदिवस वाढतोच आहे. महाराष्ट्र शासनाने अनुदान देऊनही प्रेक्षकांनीच नाटकाकडे पाठ फिरवली असल्याने अनुदानारूपी हा कृत्रिम श्वासोच्छवास तरी किती काळ मराठी नाटकांना तगवणार, असा प्रश्न निर्मात्यांना भेडसावतो आहे. ही सारी परिस्थिती पाहता
 

लोकांना बंगाली रंगभूमीप्रमाणेच मराठी रंगभूमीचीही गरज संपली आहे की काय, असा प्रश्न मला पडतो. खरंच, तशी जर ती संपली असेल, तर मग किती काळ या ऑक्सिजनच्या कृत्रिम नळकांडय़ांनी तिला जगवणार? त्यापेक्षा ती मेलेलीच बरी! (त्यानंतर तरी लोकांना तिचं महत्त्व कळेल!)
आज मराठी रंगभूमीची अशी अवस्थ का झालीय, हे सर्वानाच माहीत आहे. त्याची कारणेही सगळ्यांना मुखोद्गत आहेत. टीव्ही मालिका, मराठी- हिंदी चित्रपट यांच्याबरोबरच घरबसल्या अत्यंत स्वस्तात, कुठलीही दगदग न करता करमणुकीचे अनेकविध पर्याय लोकांना सहज उपलब्ध असल्याने मुद्दाम उठून नाटय़गृहात जायची आणि नाटक बघायची गरज त्यांना आज उरलेली नाही. रंगभूमीवरील लेखक-कलावंतांसह सर्व मंडळींना टीव्ही मालिका तसेच मराठी चित्रपटांचा पर्याय उपलब्ध झाल्याने तीही मंडळी तिकडे वळली आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आज त्यांच्या व्यक्तिगत गरजाही वाढल्या आहेत. आणि नाटकापेक्षा कमी कष्टांमध्ये जास्त पैसे आणि सर्वदूर प्रसिद्धी जर त्यांना इतर माध्यमांत मिळत असेल, तर ते तरी नाटकावर का अवलंबून राहतील? त्यांचे प्राधान्यक्रम बदलले आहेत. या माध्यमांतून प्रसिद्धी, पैसा आणि ग्लॅमर सहज आणि झटपट लाभत असल्याने नाटकापेक्षा त्यांना त्यांचं अधिक आकर्षण वाटलं तर त्यांना त्याचा दोष देता येणार नाही. (याला काही सन्माननीय अपवादही आहेतच! जे इतर माध्यमांत लीलया वावरूनही रंगभूमीवरही सातत्याने काम करताना दिसतात.)
या कारणाखेरीज मराठी नाटकांचा घसरलेला दर्जा, आशयघन नाटकं लिहिणाऱ्या लेखकांची वानवा, उत्तम, गुणी कलावंतांचा आटलेला झरा, नाटय़गृहांची वाढती संख्या, नवा प्रेक्षक तयार होण्याची थांबलेली प्रक्रिया हीसुद्धा अन्य कारणं याला जबाबदार आहेत. आजघडीला मराठी रंगभूमी मरणासन्न अवस्थेला आलेली दिसतेय, त्याला प्रेक्षकांनी तिच्याकडे फिरवलेली पाठही तितकीच कारणीभूत आहे. खरं तर मराठी रंगभूमीचं हेच मुख्य दुखणं आहे. पूर्वी करमणुकीची अन्य माध्यमं फारशी उपलब्ध नव्हती, हे जरी खरं असलं तरी तेव्हा मराठी प्रेक्षकांचा नाटकाकडे असलेला ओढाही तीव्र होता. वीस-पंचवीस वर्षांमागे नाटकाचा बुकिंग प्लान मागून भरत असे. कमी दराची तिकिटे आधी खपत. नाटय़गृहाची बाल्कनी प्रथम फुल्ल होई. आता मात्र मागची तिकिटं जातच नाहीत. नाटय़गृहांच्या बाल्कनी तर कायमसाठीच बंद झाल्या आहेत. आता पहिल्या दहा-बारा रांगाच कशाबशा भरतात. पहिल्या रांगांतली तिकिटे मिळाली नाही तर लोक परत जातात. या रांगाही संपूर्णपणे भरतात असंही नाही.
पंधरा-वीस वर्षांपूर्वी नाटय़गृहांमध्ये दररोज मराठी नाटकांचे तीन-तीन प्रयोग होत. आज स्थिती अशी आहे की, सकाळचे प्रयोग बंद झाले आहेत. दुपारच्या प्रयोगाला नोकरदार प्रेक्षक कामधंदा सोडून येऊ शकत नसल्याने दुपारच्या प्रयोगाच्या बुकिंगवरही परिणाम झाला आहे. उरली रात्र! पण रात्री टीव्ही मालिकांमुळे प्रेक्षक येत नाहीत. याशिवाय दंगल, बॉम्बस्फोट, आयपीएल, क्रिकेटची मॅच, अंगारकी संकष्टी वगैरे कारणं आहेतच. थोडक्यात- प्रेक्षक नाटकाला न येण्याला हवी तेवढी कारणं आहेत. मग उरतात- शनिवार-रविवार! या दोन दिवसांत नाटकं जास्त आणि नाटय़गृहांची संख्या कमी- असं व्यस्त प्रमाण होतं. मग ब्लॅकनं तारखा वगैरे घेऊन प्रयोग लावला तरी सुटय़ांच्या दिवशीही प्रेक्षक येतातच असंही नाही. त्यामुळे निर्माता नशिबावर हवाला ठेवून प्रयोग लावतो. त्याचं नशीब असेल तर प्रयोगाचा खर्च निघून त्याला थोडी चिरीमिरी सुटते. पण असं फारच थोडय़ा नाटकांच्या बाबतीत घडतं.
असं का झालं? गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने बदललेल्या सामाजिक, राजकीय व आर्थिक परिस्थितीमुळे गिरगाव तसेच लालबाग, परळ, काळाचौकी या गिरणगावातील मराठी नाटकाचा आधार असलेला प्रेक्षक पार तिकडे डोंबिवली-कल्याण-अंबरनाथ आणि इकडे विरार-वसईकडे फेकला गेला. या विस्थापनामुळे मराठी माणसाचा मुंबईतला टक्का घटत गेला. त्याचा मोठा फटका मराठी नाटकाला बसणं क्रमप्राप्त होतं. नाटय़गृहांची वाढलेली संख्या हेही बुकिंगचे आकडे खाली येण्यास कारणीभूत आहेत. पूर्वी शिवाजी मंदिर, दामोदर, दीनानाथ, गडकरी रंगायतन इथे लांब लांबच्या ठिकाणांहून येणारा मराठी प्रेक्षक त्यामुळे विभागला गेला आहे. आर्थिकदृष्टय़ा तळाच्या स्तरातला प्रेक्षक आता जवळजवळ गायबच झाला आहे. ही बदललेली वस्तुस्थितीही ध्यानी घेणं आवश्यक आहे. आता पहिल्या १२-१३ रांगांवरच प्रयोगाची आर्थिक गणितं बांधावी लागतात. त्यांतून मिळणारे उत्पन्न नाटय़प्रयोगाचा खर्च भरून येण्यास पुरेसा आहे का? बरं, या रांगाही संपूर्ण भरतात असंही नाही. त्यात सन्मानिकावाल्यांची संख्याही बऱ्यापैकी असते. मग अशा अल्प बुकिंगमध्ये प्रयोगाचा किमान २०-२२ हजार रुपये खर्च कसा वसूल होणार? हल्ली शासनाकडून निर्मात्यांना त्यांच्या त्यांच्या गटनिहाय प्रयोगाला १५ हजार रुपये अनुदान मिळते, हे खरंय; परंतु ते मिळूनही तीन-चार हजाराच्या बुकिंगमुळे प्रयोगाचा खर्चही जिथे निघत नाही, तिथे नाटक चालवणार कसे? म्हणून अनुदान मिळूनही निर्माते नाटक बंद करतात.
म्हणूनच निर्मात्यांनी आता या बुकिंगच्या आधारेच आपल्या नाटकाचं अर्थकारण आखलं पाहिजे. आणि त्यांना नाटकाशी संबंधित सगळ्यांनी साथ द्यायला हवी. नाटकाच्या बजेटचा पुनर्विचार व्हायला हवा. लेखक-दिग्दर्शक-कलावंतांना अमुक तिकीट विक्री झाली तर अमुक पैसे, अमुकच्या वर तिकीट विक्री झाली तर तमुक पैसे, तर कॉन्ट्रॅक्ट शोला अमुक अमुक मानधन अशी विभागणी करून या परिस्थितीवर मार्ग काढता येईल. यासाठी निर्मात्यांनीही पारदर्शी व्यवहार करणे गरजेचे आहे. इंग्रजी रंगभूमीवर अशा तऱ्हेने मुंबईत, मुंबईबाहेर आणि परदेशात वेगवेगळं मानधन दिलं जातं.
आपल्याकडे सध्या साधारण हजार आसनसंख्येचीच बहुतेक नाटय़गृहे आहेत. नवी नाटय़गृहंही अशीच बांधली जात आहेत. ज्यांची आज गरजच उरलेली नाही. रोडावलेली प्रेक्षकसंख्या लक्षात घेऊन थिएटर्स बांधली जात नाहीत, हेच नाटकवाल्यांचं दु:ख आहे. भव्य नाटय़गृहात अवघे दोन-अडीचशे प्रेक्षक हे चित्र खचितच सुखद म्हणता येणार नाही. नाटक करणाऱ्यांसाठी व प्रेक्षकांसाठीही! म्हणूनच ४०० ते ५०० प्रेक्षकक्षमतेची नाटय़गृहं आता उभारण्याची गरज आहे; जेणेकरून ते पूर्ण क्षमतेनं भरेल आणि नाटकाची आर्थिक गणितंही त्यामुळे आटोक्यात येतील.
मराठी रंगभूमीचं आजचं चित्र पाहता असं वाटतं की, मराठी नाटकांकडे प्रेक्षकांना पुन्हा खेचून आणायचं असेल तर मालिका व चित्रपटांतून त्यांना जे बघायला मिळत नाही, असं काहीतरी वेगळं त्यांना द्यायला हवं, तरच ते पुनश्च नाटकाकडे वळतील. ‘मराठी बाणा’ने हे सिद्ध करून दाखवलं आहे. निर्माता दिनू पेडणेकर यांनी ‘फायनल ड्राफ्ट’, ‘माकडाच्या हाती श्ॉम्पेन’सारख्या वेगळ्या हाताळणीच्या नाटकांची निर्मिती करून व ती यशस्वी करून प्रेक्षकांचा अशा ‘प्रयोगां’ना चांगला प्रतिसाद मिळतो, हे दाखवून दिलं आहे.
आणखी एक गोष्ट : नाटक करणाऱ्यांमध्ये excitement असायला हवी. मुळात त्यांच्यातच ते झपाटलेपण हवं, तरच ते प्रेक्षकांमध्ये संक्रमित होईल! दोन सीरियल्सच्या मध्ये वा चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान वेळ आहे म्हणून नाटक करण्याने नाटकाचं कधीच भलं होणार नाही. तेव्हा मालिका व चित्रपटांमध्ये बिझी असलेल्या मंडळींचा नाद सोडून देऊन नव्या, तरुण रंगकर्मीची फळी आता रंगभूमीवर आणायला हवी. त्यांच्यावर विश्वास टाकायला हवा. नाटकाची पॅशन घेऊन आलेली ही मंडळीच काही नवं करून दाखवू शकतील.. मराठी नाटकाला नवं वळण देऊ शकतील. (पुढे ही मंडळीही मालिका-चित्रपटांकडे जातील, तेव्हा त्यांच्या जागी पुन्हा नव्या रक्ताला वाव द्यायला हवा.) आज नामवंत कलाकार घेऊनही नाटकं चालत नाहीत. मग असा प्रयोग करून बघायला काय हरकत आहे? संतोष पवार, केदार शिंदे, देवेंद्र पेम ही मंडळी याचं उत्तम उदाहरण आहे. यांनी आपली नवी रंगभाषा, नवं तंत्र रंगभूमीवर आणलं. त्यांनी आपले यशाचे फॉम्युर्ले तयार केले. नवे कलावंत आणले. त्यांना यशस्वी करून दाखविले. आज मराठी व्यावसायिक रंगभूमी एकटय़ा संतोष पवारच्या खांद्यावर उभी आहे. या मंडळींचं हे योगदान निश्चितच नाकारता येणार नाही. माझी फक्त या मंडळींकडे एक छोटीशी तक्रार आहे. विनंती म्हणा हवं तर! या मंडळींनी आपलं वाचन वाढवावं, अवलोकनाच्या कक्षा अधिक रुंद कराव्यात, आजूबाजूचं वास्तव डोळसपणे व जाणतेपणानं न्याहाळावं, इतरांच्या चांगल्या कलाकृती आवर्जून पाहाव्यात, त्यावर गंभीरपणे चिंतन-मनन करावं. असं जर त्यांनी केलं, तर त्यांच्या उपजत प्रतिभेला आणखी धुमारे फुटतील. ते सध्या जे काही करताहेत, त्यापेक्षा त्यांची कितीतरी अधिक क्षमता आहे. फक्त गरज आहे ती त्यांनी स्वत:ला पैलू पाडण्याची! हे जर त्यांनी मनावर घेतलं, तर त्यांच्या हातून भन्नाट नाटय़कृती निर्माण होईल, असा मला ठाम विश्वास वाटतो.
पूर्वी राज्य नाटय़स्पर्धा, प्रायोगिक-समांतर रंगभूमी ते व्यावसायिक नाटक असा प्रवास करून कलावंत मालिका-चित्रपटांत जात. आता एकांकिका स्पर्धेतल्या एखाद्या चमकदार परफॉर्मन्सवरच ते थेट मालिका-चित्रपटांकडे जातात. परिणामी मराठी रंगभूमीवर नव्या कलावंतांचा ओघ थांबला आहे. मात्र, त्याचवेळी मुंबई, पुणे, औरंगाबाद इथल्या विद्यापीठांतून नाटय़शास्त्र विभागांत विद्यार्थी स्वेच्छेने प्रवेश घेताना दिसताहेत. आपल्या अंगची कला व्यवसाय म्हणून स्वीकारण्याचा डोळस निर्णय ते घेताहेत. अशा कलावंतांना आपली प्रतिभा दाखविण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. शहरी तसेच ग्रामीण भागांतल्या या तरुण कलावंतांमुळे स्थानिक मातीचा गंध, तिचा अस्सल बाज कलेच्या क्षेत्रात येत असतो. त्याला वाव देणं हे आपलं काम आहे. तशी संधी मिळाली की त्याचं सोनं करून दाखविण्याची धमक या तरुणाईत नक्कीच आहे, हे पुण्याच्या ललित कला केंद्रातून व मुंबईच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समधून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या रंगकर्मीनी सिद्ध करून दाखवलं आहेच.
आज मराठी रंगभूमीवरील ‘मॅजिक’ हरवलं आहे, त्याचा पुन्हा एकदा शोध घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी काही ‘वेडय़ां’ची गरज आहे. असे वेडेच रंगभूमी पुढे नेत असतात. तिला समृद्ध करीत असतात. काही वर्षांमागे अमोल पालेकरांनी एशियाटिक लायब्ररीच्या पायऱ्यांवर ‘इडिपस’ करण्याचा घाट घातला होता. मध्यंतरी आपल्याकडे वल्लभभाई स्टेडियमवर फिरतं ‘रामायण’ही सादर झालं होतं आणि त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. आपल्या वामन केंद्रेंनाही असंच खुल्या आकाशाखाली भव्य रीतीनं ‘रणांगण’ सादर करायचं होतं. तसं जर ते सादर केलं गेलं असतं, तर थिएटरचं एक वेगळं मॅजिक प्रेक्षकांना अनुभवता अालं असतं.
मध्यंतरी पृथ्वी थिएटरमध्ये ‘३६ घंटे’ हा नाटय़विषयक हॅपनिंग घडविणारा उपक्रम आयोजिण्यात आला होता. थिएटरचं मॅजिक शोधण्याचाच तो प्रयत्न होता. आदल्या रात्री प्रत्येक ग्रुपला एकेक विषय देऊन, त्यावर त्यांनी रात्रभर विचार करून नाटय़संहिता सिद्ध करायची आणि दुसऱ्या दिवशी त्यावर परफॉर्मन्स सादर करायचा, असं त्याचं स्वरूप होतं. केवळ ३६ तासांत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करायची होती. यातला थरार या हॅपनिंगमध्ये सहभागी झालेल्या रंगकर्मी व प्रेक्षकांनाही अनुभवायला मिळाला होता. अशा प्रकारच्या भन्नाट कल्पना लढवून रंगभूमीबद्दलची उत्सुकता वाढवणारी वातावरणनिर्मिती व्हायला हवी. आणि त्याकरता सातत्याने काहीतरी घडत, घडवत राहायला हवं.
पूर्वी ‘निनाद’ संस्था सोसायटय़ांमध्ये जाऊन एकांकिकांचे प्रयोग करीत असे. आज प्रेक्षक नाटकाकडे येत नसेल, तर नाटकानं त्याच्याकडे जायला हवं. ‘निनाद’च्या उपक्रमासारखंच व्यावसायिक नाटकांच्या बाबतीतही काही करता येईल का, हे आपण चाचपून पाहायला हवं. गोव्यात असाच एक ‘प्रयोग’ राजदीप नाईक राबवतो. तो स्थानिक कलावंतांना घेऊन लोकप्रिय नाटकांचे प्रयोग गावोगावी करतो. गोवा कला अकादमीतले तसेच स्थानिक हौशी कलाकार या नाटकांतून कामं करतात. माफक तिकीट दरांत नाटकं पाहायला मिळत असल्यानं प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो. झाडीपट्टी रंगभूमीचाच हा एक अवतार म्हणता येईल. आसामातही अशीच नाटकं सादर होतात. त्यांना तीन ते चार हजारावर प्रेक्षक गर्दी करतात. दक्षिणेत रंगकर्मी सुबण्णांनीही आपला असाच प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. आपल्याकडे असं का घडू नये?
या सगळ्याबरोबरच नाटकाचं मार्केटिंग, प्रसिद्धी आणि जाहिरातींचाही वेगळ्या तऱ्हेनं विचार व्हायला हवा. लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी नाटकांची मोठमोठी होर्डिग्ज असतात. ट्रॅफलगार स्क्वेअरसारख्या ठिकाणी नाटकाच्या तिकीट विक्रीचे बूथ्स आहेत. तिकीट विक्रीचे एजंटस्ही असतात. ‘माऊसट्रॅप’सारखं नाटक गेली ४० वर्षे तिथे चालू आहे. त्याच्या लोकप्रियतेची कारणं शोधून आपण आपली नाटकं चालविण्यासाठी तशी युक्ती का लढवू नये? आपणही मार्केटिंग, प्रसिद्धी व जाहिरातीची नवी तंत्रं हुडकून त्यांचा योग्य तो वापर करायला हवा.
आपल्या प्रेक्षकांचंही सर्वेक्षण करायला हवं. त्यांना काय आवडतं, ते कुठलं नाटक पाहतात, का पाहतात, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, नाटकाकडून त्यांच्या अपेक्षा काय असतात, इत्यादीचा शोध घ्यायला हवा. मध्यंतरी ‘सुयोग’ संस्थेने असे सर्वेक्षण केलं होतं. त्याचं पुढे काय झालं, कळायला मार्ग नाही. अलीकडेच ‘मिथक’ या तरुण नाटकवाल्यांच्या ग्रुपनं हे काम हाती घेतलं आहे. या पाहणीचे जे निष्कर्ष येतील, त्यांचा नाटकवाल्यांनी गांभीर्यानं विचार करायला हवा.
हल्ली नाटकवाल्यांना एकत्र यायला ठिकाणच नाही. पूर्वी छबिलदास गल्लीत किंवा शिवाजी मंदिरच्या कट्टय़ावर नाटकवाले एकत्र भेटत. कटिंग चहावर गप्पा होत. त्या सगळ्या जरी नाटकाशी संबंधित नसल्या, तरी त्यानिमित्तानं परस्परांच्या नाटकांवर बरी-वाईट चर्चा होई. वाद होत. त्यातून निकोप स्पर्धा आणि ईष्र्या निर्माण होई. या मंथनातूनच रंगभूमीच्या संदर्भात काही चांगलं घडत असे. आज नाटकवाल्यांच्या अशा अड्डय़ाची नितांत गरज आहे. आपापल्या कोषात एकाकी बेटांसारखं जगणाऱ्या रंगकर्मीना एकत्र आणणाऱ्या अशा अड्डय़ामुळे आजची रंगभूमीवरील कोंडीही कदाचित फुटू शकेल.
विजय केंकरे