Leading International Marathi News Daily

रविवार , २१ जून २००९

अहवालाचे केवळ मुखपृष्ठ पाहून पोलिसांना ‘क्लिन चीट’!
माजी केंद्रीय गृहसचिव राम प्रधान यांचे परखड प्रतिपादन

२६/११ हल्ला : पोलिसांतील अत्युच्च धैर्याची दखलच नाही!
नांगरे-पाटील, राजवर्धन, कारगावकर, बागवान यांसारखे पोलिसांतील ‘हिरो’ पडद्याआड.
खरे पाहता, मुख्यमंत्र्यांनीही अहवालावर दृष्टिक्षेप टाकला नव्हता.
मुंबई, २० जून / प्रतिनिधी
२६/११ रोजी दहशतवादी हल्ला झाला तेव्हा मुंबई पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य नि निकड ओळखून ज्या वेगाने पावले उचलली आणि ज्या निडरपणे तरुण पोलीस अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांचा सामना केला. या अत्युच्च धैर्य दाखवलेल्या अनेक पोलीस अधिकारी आणि व्यक्तींच्या कार्याची अद्याप दखलही घेण्यात आलेली नाही, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहसचिव राम प्रधान यांनी केले आहे. ज्यांनी केवळ अहवालाचे मुखपृष्ठ पाहिले होते, अशा काही गिन्याचुन्या व्यक्तींनी पोलिसांना ‘क्लिन चीट’ मिळाल्याचा निष्कर्ष काढला. खरे पाहता, मुख्यमंत्र्यांनीही अहवालावर दृष्टिक्षेप टाकला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी पराभवाच्या अहवालाची होळी;
नाव घेणाऱ्यांना सोडणार नाही -उदयनराजे

सातारा, २० जून / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचे खापर फोडणाऱ्यांच्या यादीत खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव गोवण्यात आल्याची संतप्त प्रतिक्रिया येथे उमटली असून, राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे फडकावत मोर्चा काढून निदर्शने केली व येथील पोवई नाका परिसरातील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळा परिसरात राष्ट्रवादी पराभवाच्या अहवालाची तसेच तो तयार करणाऱ्या नेत्यांच्या प्रतिमेची होळी केली. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ज्यांनी बेजबाबदार अहवाल सादर केला त्यांची प्रतिमा व तो अहवाल आपल्या चाहत्यांनी उत्स्फूर्तपणे जाळून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपण याबाबत कुणाला आवरू शकत नाही. लवकर माझ्याबाबत खुलासा झाला नाही तर लोक ऐकणार नाहीत. शरद पवार यांची प्रतिमा जाळलेली नाही, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले व जोपर्यंत खुलासा होत नाही, तोपर्यंत पक्षाचे कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचेही सांगितले.

मेघराजाची वातावरणनिर्मिती
मुंबई, २० जून/प्रतिनिधी
अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा, उन्हाची काहिली आणि पाणीटंचाईने केलेली पंचाईत यामुळे अक्षरश: कावलेल्या मुंबईकरांना शुक्रवारपासून ‘वातावरणनिर्मिती’ करीत मेघराजाने आपण लवकरच येत असल्याचे संकेत दिले. त्यानुसार तो मुंबापुरीच्या उंबरठय़ावर येऊन थडकलासुद्धा. परंतु एवढे दिवस ताटकळत ठेवल्यानंतर महामाया मुंबईत प्रवेश करताना ‘चाकरमान्यां’चे हाल होऊ नयेत, याच बहुधा उदात्त हेतूने मान्सूनने शनिवारी मुंबईत ‘एण्ट्री’ घेतली नाही. आता त्याची प्रतीक्षा हक्काच्या सुट्टीच्या दिवशी, रविवारी तमाम मुंबईकर करीत आहेत. मान्सूनच्या आगमनाबाबत वेधशाळेने ‘आपला लौकिक’ राखत पार १ जूनलाच तो येणार, असे ठाम भाकित केले होते.

असंतोषाच्या वातावरणात भाजपचे मंथन सुरु
पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी समित्यांची स्थापना
नवी दिल्ली, २० जून/खास प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकांतील भाजपच्या पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी केंद्रीय व राज्यस्तरीय समित्या नेमून भागणार नाही तर या समित्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर पराभवास जबाबदार ठरलेल्या नेत्यांना दंडित करण्याचीही इच्छाशक्ती पक्षनेतृत्वाला दाखवावी लागेल, असा सूर आजपासून दिल्लीत आत्मचिंतनासाठी बोलविण्यात आलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांतील भाजपच्या पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्पष्ट करून दोषारोपाच्या प्रकाराला लगाम लावण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे पक्षात धुमसत असलेला असंतोष शमला नाही. पक्षाचे रणनितीकार आणि निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख अरुण जेटली कार्यकारिणीच्या बैठकीला अनुपस्थित राहून युरोपात पर्यटनासाठी कसे गेले, असा सवाल ज्येष्ठ नेते अरुण शौरी यांनी पुन्हा उपस्थित केला.

सरकारी अधिकाऱ्यांच्या सोसायटीसाठी वृद्धेच्या जागेवर हातोडा!
संदीप आचार्य, मुंबई, २० जून

मुंबईत राज्य शासनाच्या जागांवर होणारी अतिक्रमणे काढण्यासाठी वेळ नसलेल्या शासकीय अधिकाऱ्यांनी, मंत्र्यांचे खासगी सचिव, उपसचिव तसेच सहकार खात्यातील अधिकाऱ्यांच्या ‘मित्र प्रेम सहकारी सोसायटी’ला वांद्रे येथील मोक्याच्या जागेवरील कोटय़वधी रुपयांचा भूखंड मिळावा यासाठी सर्वनियम धाब्यावर बसवून ७५ वर्षांच्या एका वृद्धेची पिठाची अधिकृत गिरणी जमीनदोस्त करण्याचा पराक्रम केला आहे. यातील गंभीर बाब म्हणजे ज्या शासकीय अधिकाऱ्यांना हा भूखंड हवा आहे त्यातील बहुतेकांची वाशी येथील पामबीच येथे शिवशंकर गृहनिर्माण सोसायटीत मोठी घरे आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये मंत्र्यांचे सचिव, उपसचिव, खासगी सचिव तसेच सहकार व महसूल विभागातील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या किती गृहनिर्माण सोसायटय़ांना मुंबईत मोक्याच्या जागेवरील भूखंड मिळाले व ते कशा प्रकारे मिळविण्यात आले ते पाहिले तर भूखंडांचे श्रीखंड नेत्यांपेक्षा अधिकारीच कसे ओरपतात ते दिसून येईल, अशी प्रतिक्रिया एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

शिवसेनाप्रमुखांची प्रकृती ठणठणीत - उद्धव ठाकरे
मुंबई, २० जून / प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज येथे स्पष्ट केले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होत असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

 


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी