Leading International Marathi News Daily

रविवार , २१ जून २००९

मानसी हत्या प्रकरणी ‘सीआयडी’ चौकशीची शिफारस करणार- सातव
औरंगाबाद, २० जून/खास प्रतिनिधी

मानसी देशपांडे या तरुणीची हत्या होवून नऊ दिवस झाले आहे, तरीही अद्यापपावेतो या प्रकरणातील मारेकऱ्यांना पकडण्यात औरंगाबाद पोलिसांना सपशेल अपयश आले आहे. पोलिसांच्या एकूणच तपास प्रक्रियेवर शंका घेतली जावू लागली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रजनी सातव यांनीही पोलिसांच्या तपासावर असमाधान व्यक्त केले आहे. या हत्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची शिफारस महिला आयोग राज्य शासनाकडे करणार आहे, अशी माहिती रजनी सातव यांनी दिली.

चातुर्य येतसे फार..
कधीतरी, कुणीतरी सांगून ठेवलंय, ‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, मनुजा चातुर्य येतसे फार..’ परत मग कधीतरी, कुणीतरी त्यात बदल केला, ‘केल्याने पर्यटन..’ एरवी मराठी माणूस कुणाचं ऐकणारा नव्हे. ‘मोडेन पण ऐकणार नाही,’ बाणा. पण पर्यटन केल्यानं चातुर्य येतं, हे त्याला पटलं असावं. कसा कुणास ठाऊक, त्यानं हा सल्ला स्वीकारला. त्यामुळेच पर्यटनस्थळी गुजराथ्यांबरोबर मराठी टक्काही मोठा दिसतो! ठळकपणे..

हिंगोली, गेवराई व सिल्लोडमध्ये पावसाची हजेरी
हिंगोली, २० जून/वार्ताहर

हिंगोली शहरासह परिसरात शनिवारी पावसाने हजेरी लावल्याने आता दमदार पाऊस होईल, अशी शेतकरीवर्गाला आशा वाटू लागली आहे. शनिवारी दुपारी १ वा. जोरदार पावसाचे आगमन झाले. मात्र काही वेळात जोर कमी होऊन ४ पर्यंत रिमझिम चालू होती. कळमनुरी, सेनगाव परिसरात असाच पाऊस झाला. आकाशात काळेकुट्ट ढग जमा झालेले असल्याने दमदार पावसाची शक्यता वर्तविली जात होती.

नांदेडमध्ये अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई ; १० लाखाची वाळू जप्त
नांदेड, २० जून/वार्ताहर

अनधिकृतपणेवाळूउपसा करून त्याची बेकायदेशीर साठवण करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने कारवाईचे संकेत दिले असून प्रशासनाने आज सुमारे १० लाख रुपयांची वाळू जप्त केली आहे.
जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागांतून वाळूचा मोठय़ा प्रमाणावर बेकायदेशीर उपसा होतो. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने होणाऱ्या या गैरव्यवहारातून मोठय़ा प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. गेल्या काही वर्षात वाळू व्यवसायाला मोठे महत्त्व प्रश्नप्त झाले आहे.

जालन्याचे नगराध्यक्षपद शिवसेनेकडे राखण्यात आमदार खोतकरांना यश
जालना, २० जून/वार्ताहर

एकूण ५३ पैकी शिवसेना-भाजपचे २४ सदस्य असतानाही जालना नगराध्यक्षपद पुन्हा शिवसेनेकडेआले. काँग्रेसचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस २ आणि १ अपक्ष नगरसेवक मतदानाच्या वेळी अनुपस्थित होता. त्याचा फायदा होऊन शिवसेनेच्या भारती भागत २७ मते घेऊन विजयी झाल्या. उपाध्यक्षपदी भाजपचे भास्कर मुकुंदराव दानवे हेही २७ मते घेऊन विजयी झाले. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार अनिता वाघमारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार खुशालसिंग ठाकूर यांना प्रत्येकी १८ मते पडली.

वीज कोसळून महिलेचा मृत्यू; दोन गंभीर जखमी
लोहा, २० जून/वार्ताहर

शेतात चिपाड वेचण्यासाठी गेलेल्या शेतमजूर महिलांच्या अंगावर वीज पडल्याने सावरगाव (न.) शिवारात एक महिला ठार तर दोन गंभीर जखमी झाल्या. जखमींना नांदेड येथे हलविण्यात आले असून ही घटना सायं. ५ वा. घडली. लोहा तालुक्यातील सावरगाव येथे शेतात चिपाड वेचण्यासाठी गेलेल्या महिला पावसामुळे झाडाच्या आश्रयाला थांबल्या. त्यावेळी वीज कोसळली. यात भाग्यश्री शिवाजी बेंद्रे (वय २२) ठार झाली, तर पद्मिन सुभाष बोईनवाड (वय ३०) व सुषमा हावगीराव संगमे (वय ४५) या दोघी गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती कळताच कृषी उत्पन्न बाजारचे संचालक बालाजी पाटील कदम, सरपंच माधव पाटील आदींसह ग्रामस्थांनी जखमींना लोह्य़ाच्या रुग्णालयात हलविले.

वादळी वाऱ्याने उडालेला पत्रा अंगात घुसून विद्यार्थ्यांचा मृत्यू
औरंगाबाद, २० जून/प्रतिनिधी

दुपारी १.३० च्या सुमारास सोसाटय़ाच्या वाऱ्यानिशी आलेल्या मुसळधार पावसाने पाचोडजवळील एकतुणी गावातील एका सहावीतील विद्यार्थ्यांचा बळी घेतला. मधल्या सुट्टीनंतर वर्गात बसलेल्या विकास घाडगेचा अंत त्याच वर्गावरून उडालेल्या पत्र्यामुळे झाला.

अण्णा हजारे यांची आज नांदेडमध्ये सभा
नांदेड, २० जून/वार्ताहर

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे प्रणेते व ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री अण्णा हजारे यांचे आज नांदेडमध्ये आगमन झाले असून रविवारी त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत आज सकाळी ११ वाजता पीपल्स महाविद्यालयात युवक मेळावा, दुपारी २ वाजता बी. के. हॉल येथे महिला मेळावा व सायंकाळी ७ वाजता याच ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. राजकारणातील वाढत्या गुन्हेगारीच्या पाश्र्वभूमीवर जनजागरण व संघटन करण्यासाठी अण्णा हजारे राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागांत सभा, मेळावे घेणाऱ्या अण्णा हजारे यांचे सायंकाळी नांदेडमध्ये आगमन झाले. रविवारी होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या वतीने करण्यात आले आहे.

नांदेड शहराला आता दोन दिवसांआड पाणीपुरवठा
नांदेड, २० जून/वार्ताहर

मृग नक्षत्रात पावसानेमारलेली दडी, तापमानात झालेली प्रचंड वाढ या पाश्र्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून नांदेडला आता दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दरम्यान, संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सिद्धेश्वर, यलदरी धरणांतून पाणी आणण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. नांदेड जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागांत उन्हाळ्याच्या प्रश्नरंभीच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली. अनेक भागांत जानेवारी महिन्यापासूनच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. आजमितीस सुमारे २७५ टँकरद्वारे ३५० गावांना, अनेक वाडीतांडय़ांना पाणीपुरवठा सुरू आहे. यंदा तापमानात प्रचंड वाढ झाल्याने बाष्पीभवन होऊन अनेक जलसाठे कोरडे पडले. कै. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचा पाणीसाठा पाणलोट क्षेत्रातील बंधाऱ्यामुळे ११ टीएमसी वरून ४ टीएमसीवर आला आहे. नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयास १० जुलैपर्यंत पुरेल एवढेच पाणी आहे.आता प्रशासनाने सिद्धेश्वर तसेच यलदरी धरणातून पाणी आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

नांदेड जिल्ह्य़ातील आरक्षण जाहीर
नांदेड, २० जून/वार्ताहर

जिल्ह्य़ातल्या १६ पंचायत समित्यांचे आरक्षण शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातल्या बचत भवनात जाहीर करण्यात आले. त्यानुसार सर्वसाधारणसाठी ५, अनुसूचित जातीसाठी १, अनुसूचित जातीच्या महिलेसाठी १, अनुसूचित जमातीसाठी १, ओबीसी महिलेसाठी १, ओबीसीसाठी ३, सर्वसाधारण महिलेसाठी ४ पंचायत समित्या राखीव झाल्या आहेत. नांदेड जिल्ह्य़ातल्या १६ पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठीचे आरक्षण यापूर्वी १२ जानेवारीला जाहीर करण्यात आले होते. परंतु त्याला हिमायतनगर व बिलोली येथील काही नागरिकांनी आक्षेप घेतला होता, तसेच ग्रामीण विकास मंत्रालयात तक्रार केली होती. त्यामुळे आरक्षण प्रक्रिया पुन्हा घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवनात आरक्षणाची प्रक्रिया पार पडली. त्यानुसार किनवट (अनुसूचित जाती महिला), माहूर (अनुसूचित जाती), हिमायतनगर (ओ.बी.सी. महिला), नांदेड, कंधार, भोकर (ओ.बी.सी.), लोहा, नायगाव, धर्माबाद, देगलूर (सर्वसाधारण महिला) व अर्धापूर, बिलोली, उमरी, हदगाव, मुदखेड (सर्वसाधारण) असे आरक्षण जाहीर झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी, उपजिल्हाधिकारी पी. पी. कुलकर्णी यांच्यासह वेगवेगळ्या पंचायत समितीतील सदस्य यावेळी उपस्थित होते.

‘पाणीटंचाईमुळे जिल्ह्य़ातील शाळा अर्धवेळ भरवाव्यात’
विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली
जळकोट, २० जून/वार्ताहर

उन्हाळी सुट्टय़ा संपल्यानंतर १५ जूनपासून लातूर जिल्ह्य़ातील सर्व शाळा सुरू झालेल्या आहेत. मात्र पाणीटंचाईमुळे विद्यार्थी उपस्थिती घटत आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील सर्व शाळा पाणीटंचाई समस्या आकारात येईपर्यंत अर्धवेळ कराव्यात, अशी मागणी हेरचे आमदार तथा विधीमंडळ पंचायत राज समितीचे सदस्य टी. पी. कांबळे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. शिक्षण विभागाकडून करण्यात आलेले जनजागरण आणि सर्वाना शिक्षण मोहिमेतून शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तके देण्याची कृती यामुळे शाळेतील उपस्थितीबाबत विद्यार्थ्यांकडून पहिल्या दिवसापासूनच जोरदार प्रतिसाद मिळाला. मात्र कडक उष्म्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत बसणेही मुश्कील झाले आहे. समाधानकारक पाऊस होऊन पाणीटंचाई निवळेपर्यंत शाळा अर्धवेळ घेणे हिताचे होणार आहे. तेव्हा नांदेड जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर जिल्ह्य़ातील शाळाही अर्धवेळ भरवाव्यात अशी मागणी श्री.कांबळे यांनी केली आहे.

‘घरकुल योजनेसाठी अडीच कोटी वापरणार’
बीड, २० जून/वार्ताहर

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अनेक योजना राबविल्या जातात. मात्र पुरेशा निधीअभावी वैयक्तिक लाभाच्या योजना दुर्लक्षित राहिल्या. या वेळी समाज कल्याण विभागाला मिळालेल्या अडीच कोटी रुपये वैयक्तिक घरकुल योजनेसाठीच वापरले जाणार आहेत, अशी माहिती सभापती प्रभाकर वाघमोडे यांनी दिली. बीड जिल्हा परिषदेचे चालू आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आले. या वेळी प्रथमच समाज कल्याण विभागासाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद ठेवण्यात आली आहे. या विभागामार्फत मागसवर्गीयांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र मागील काही वर्षापासून अपुऱ्या तरतुदीअभावी घरकुलाची योजना बारगळली होती. त्यामुळे हजारो अर्ज आणि नाममात्र लाभार्थी अशी अवस्था या विभागाची झाली होती. २००७-०८ या वर्षात घरकुलासाठी ८३ लाख तर २००८-०९ या वर्षात ५६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यातून १३२ लाभार्थ्यांला २५ ते ४५ हजारापर्यंत अनुदान दिले जाते. चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात समाज कल्याण विभागासाठी अडीच कोटींचा निधी ठेवण्यात आला आहे. हा सर्व निधी घरकुल योजनेसाठी वापरला जाणार आहे असे वाघमोडे यांनी सांगितले.

‘सुशीलरत्न’ काव्यसंग्रहाचे देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन
लातूर, २० जून/वार्ताहर

परिवर्तन प्रकाशन, लातूर या प्रकाशन संस्थेच्या वतीने ‘सुशीलरत्न’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते बाभळगाव येथे करण्यातोले. कवी रामकृष्ण बैले यांनी या काव्यसंग्रहात विलासराव देशमुख यांचे जीवन व कार्य काव्यरूपाने शब्दबद्ध केले आहे. लातूर येथील कवी, साहित्यिक, विचारवंत व प्रकाशक साहित्य क्षेत्रात नवीन साहित्यकृतींची भर टाकून वाचकांस वाचनीय पुस्तके उपलब्ध करून देत असल्याचे कौतुगोद्गार यावेळी देशमुख यांनी काढले. यावेळी प्रकाशक प्रश्नचार्य धनंजय बेडदे, कवी रामकृष्ण बैले, नगरसेवक मोहन माने, प्रश्न. अनंत लांडगे, विष्णुपंत पांचाळ, राजेश भांडे आदी उपस्थित होते.

दयानंद विद्यालयाच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर निवड
लातूर, २० जून/वार्ताहर

भारत शिक्षण प्रसारक मंडळ संचालित जयक्रांती संलग्न दयानंद विद्यालयाच्या आरती हाके व नीलेश कोहाळे या दोन सॉफ्टबॉल खेळाडूंची मंडी, हिमाचल प्रदेश येथे ९ ते १४ जूनदरम्यान आयोजित ज्युनियर राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. जळगाव येथे २ जूनला झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत कौशल्याच्या आधारावर त्यांची निवड करण्यात आली. या खेळाडूंना प्रशिक्षक प्रश्न. राजेश कारंजकर, कैलाश खानापूरकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे सचिव प्रश्न. गोविंद घार, अध्यक्ष बालाजी घार, प्रश्नचार्य जी. एन. शिंदे, प्रश्नचार्या डॉ. कुसुम पवार यांनी अभिनंदन केले.

‘विधानसभा निवडणुकीत युतीचा विजय होणार’
औरंगाबाद, २० जून/खास प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीला यश मिळणार असल्याचे भाकित ज्योतिषी अशोक पवार यांनी केले आहे. श्री. पवार हे बीड जिल्ह्य़ातील आष्टीचे आहेत. चेहऱ्यावरून भविष्य सांगण्याची कला त्यांच्याकडे आहे. अडीच वर्ष मठात राहून काशीस्वामींकडून मुद्राशास्त्राचे ज्ञान प्रश्नप्त केले.श्री पवार छंद म्हणून ही सेवा देतात. ते कुठलेही शुल्क आकारत नाही. सध्या ते मुद्राशास्त्र नावाचे पुस्तक लिहीत आहेत. हे पुस्तक या वर्षाच्या अखेरीला प्रसिद्ध होणार आहे. श्री. पवार यांनी कलाकार, राजकारणी, समाजसेवक आणि शैक्षणिक सम्राटांचे भविष्य सांगितले आहे. १९९२ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या पक्षातील काही नेते दूर जाणार असल्याचे भाकित वर्तविले होते. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी त्यावेळी शिवसेनेचा त्याग केला होता. अटलबिहारी वाजपेयी यांना पुन्हा पंतप्रधानपदाचा योग असल्याचे त्यांनी केलेले भाकित खरे ठरले. आगामी काळात प्रियांका गांधी या देशाच्या पंतप्रधान होतील. प्रियांका गांधी यांच्याकडे पंतप्रधानपद चालून येणार आहे. तसेच शरद पवार यांची मजल उपपंतप्रधानपदापर्यंत जाईल. मात्र ते पंतप्रधान होणार नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.

वर्गमित्रांकडूनच लैंगिक छळ!
औरंगाबाद, २० जून /प्रतिनिधी

इयत्ता दहावीत शिकणाऱ्या दोघांनी तिसऱ्याचा लैंगिक छळ केल्याचा खळबळजनक प्रकार आज सिंधी कॉलनी येथील एका इंग्रजी शाळेत उघडकीस आला. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सायंकाळपर्यंत गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली नव्हती.
एका विद्यार्थ्यांने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्याच वर्गातील दोन सहकारी त्याचे चुंबन घेत असत. गेल्या शैक्षणिक वर्षातही असाच प्रकार झाला होता. या वेळी शाळा सुरू झाल्यापासून पुन्हा तसेच सुरू झाले. त्यानंतर आज पैशांचे आमिष दाखवून अश्लील चाळे करण्यास सांगितले.
एक दिवस अश्लील चाळे केले तर २० रुपये आणि महिनाभर चाळे करू दिल्यास पाच हजार रुपये देण्यात येईल, असे आमिष त्याला दाखविले. त्याने नकार दिल्यानंतर त्याच्यावर जबरदस्ती करण्यात आली. त्यामुळे त्याने हा प्रकार शिक्षक आणि नंतर पालकांना सांगितला. पालकांनी जवाहरनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी केली. काल सायंकाळपर्यंत गुन्ह्य़ाची नोंद झाली नव्हती.

विद्यार्थी आघाडी सक्षम करू - पोकळे
बीड, २० जून/वार्ताहर

महाराष्ट्रात भाजप विद्यार्थी आघाडी ही संघटना सक्षम करून खासदार गोपीनाथ मुंडे यांनी दिलेलीजबाबदारी यशस्वी पार पाडू, असा विश्वास भाजपा विद्यार्थी आघाडीचे नुतन प्रदेशाध्यक्ष रमेश पोकळे यांनी व्यक्त केला. बीड येथील वसंतराव काळे पत्रकारिता महाविद्यालयात भारतीय जनता पक्ष विद्यार्थी आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने रमेश पोकळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना श्री. पोकळे म्हणाले, राज्यात विविध स्तरांवर विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी विद्यार्थ्यांच्या सक्षम संघटनांची गरज आहे. पक्षाने आपणावर अतिशय महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. ती सार्थ करण्यासाठी आपण भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही जबाबदारी यशस्वी पूर्ण करू.
प्रश्नरंभी महाविद्यालयाचे प्रश्नचार्य डॉ. नामदेव सानप यानी पोकळे यांचा सत्कार केला. याप्रसंगी प्रश्न. दीपक गालफाडे, प्रश्न. व्यंकटेश वैष्णव, प्रश्न. बापूसाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

परतूरच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या करीमाबी शेख
परतूर, २० जून/वार्ताहर

परतूर पालिकेच्या शनिवारी झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या करीमाबी शेख महेबूब निवडून आल्या. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसच्या निलिमा काळे यांचा पराभव केला. शेख यांना ८ तर काळे यांना ७ मते मिळाली. नगराध्यक्षपदानंतर लगेच उपनगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. यात अंकुश तेलगड निवडून आले. त्यांनी नाजेमोद्दीन काजी यांचा पराभव केला. दरम्यान, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे ब्रिजलाल होलाणी व अंकुश तेलगड सभागृहात गैरहजर राहिल्याची माहिती पीठासीन अधिकारी रिटा मेत्रेवार यांनी दिली. काँग्रेसचे दोन नगरसेवक गैरहजर राहिल्याने नगरपालिकेतील काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली असून पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. नोव्हेंबर २००६ मध्ये झालेल्या सदस्यपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची बहुमतातील सत्ता आली होती; परंतु केवळ अडीच वर्षातच काँग्रेसला आपली सत्ता गमवावी लागली. नगराध्यक्षपदी श्रीमती शेख यांची निवड होताच शिवसैनिकांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा केला.

भाविकांच्या टेम्पोला अपघात; २० जखमी
लोहा, २० जून/वार्ताहर

कंधार-लोहा रस्त्यावर हाजीसय्या दग्र्यासाठी कळंब येथून आलेल्या भाविकांच्या टेम्पोला मालट्रकची धडक झाली. त्यात २० जण जखमी झाले असून, ही घटना नगरपालिका कचरा व्यवस्थापन प्रकल्पासमोर काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या जखमीतील पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. कळंब येथील भाविक टेम्पोमधून हाजीसैया दग्र्याचा नवस फेडून गावाकडे परतत असताना लोह्य़ाकडून कंधारकडे जाणाऱ्या मालमोटाराची धडक झाली. यात अनिल खैरमोडे, प्रकाश खैरमोडे, ललति आळणे, दीपक खैरमोडे, दगडू मोरे, मालमोटारचालक शेख नवाब यांच्यासह २० भाविक जखमी झाले. त्यातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
रात्री साडेआठ वाजता अपघाताची माहिती मिळताच नगरसेवक जफरोद्दीन गणेश कुंटेवार, पत्रकार प्रश्न. गंगाधर तोगरे, दुर्गादास सराफ, मारुती पंढरे, गंगाप्रसाद यन्नावार, विजय पाटील, वाघमारे, डी. सी. कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते घटनास्थळी धावले. जखमींना त्यांनी तात्काळ रुग्णालयात हलविले. या प्रकरणी कंधार पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

लोहा तहसील कार्यालयात अपुरे कर्मचारी
लोहा, २० जून/वार्ताहर

१२६ गावांचा समावेश असलेल्या लोहा तहसील कार्यालयात अपुरा कर्मचारीवर्ग असल्यामुळे प्रशासकीय कामकाजाला मोठी अडचण होत आहे. वेगवेगळ्या प्रमाणपत्र व महसूल कामासाठी अपुरे कर्मचारी असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडत आहे. लोहा तहसील कार्यालयात दोन नायब तहसीलदार, दोन अव्वल कारकून, चार लिपिक असा कर्मचारीवर्ग आहे. १२६ गावांच्या व्यापक तालुक्यासाठी आवश्यक तेवढा कर्मचारीवर्ग येथे नाही. जिथे पाच मंडळ अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे, तिथे तिघांकडून काम भागवावे लागते. महसूल कामे, पीक सर्वेक्षण, शैक्षणिक कागदपत्रे, वसूल, महसुली, वाद-प्रकरणे याशिवाय शासनाच्या विविध योजनेची अंमलबजावणी, मतदारनोंदणी, निवडणुका अशा कामांचा मोठा व्याप असतानाही तहसील कार्यालयात अपुरे कर्मचारी असल्यामुळे गतिमान प्रशासनाला अडचण ठरते. तहसीलदार संतोष गोरड यांना कामात गतिमानता आणण्यासाठी उपलब्ध कर्मचाऱ्यांकडूनच वेळेनंतरही काम करून घ्यावे लागते. सुट्टीच्या दिवशीही हीच परिस्थिती असते. यामुळे अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वावर ताण पडत आहे.