Leading International Marathi News Daily

रविवार , २१ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अहवालाचे केवळ मुखपृष्ठ पाहून पोलिसांना ‘क्लिन चीट’!
माजी केंद्रीय गृहसचिव राम प्रधान यांचे परखड प्रतिपादन
२६/११ हल्ला : पोलिसांतील अत्युच्च धैर्याची दखलच नाही!
नांगरे-पाटील, राजवर्धन, कारगावकर, बागवान यांसारखे पोलिसांतील ‘हिरो’ पडद्याआड.
खरे पाहता, मुख्यमंत्र्यांनीही अहवालावर दृष्टिक्षेप टाकला नव्हता.
मुंबई, २० जून / प्रतिनिधी
२६/११ रोजी दहशतवादी हल्ला झाला तेव्हा मुंबई पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य नि निकड ओळखून ज्या वेगाने पावले उचलली आणि ज्या निडरपणे तरुण पोलीस अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांचा सामना केला. या अत्युच्च धैर्य दाखवलेल्या अनेक पोलीस अधिकारी आणि

 

व्यक्तींच्या कार्याची अद्याप दखलही घेण्यात आलेली नाही, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहसचिव राम प्रधान यांनी केले आहे. ज्यांनी केवळ अहवालाचे मुखपृष्ठ पाहिले होते, अशा काही गिन्याचुन्या व्यक्तींनी पोलिसांना ‘क्लिन चीट’ मिळाल्याचा निष्कर्ष काढला. खरे पाहता, मुख्यमंत्र्यांनीही अहवालावर दृष्टिक्षेप टाकला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
२६/११ च्या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी शासनाने राम प्रधान यांची समिती नेमली होती आणि या समितीने शासनाला सादर केलेला अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. या पाश्र्वभूमीवर प्रधान यांनी ‘लोकसत्ता’कडे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यात ते म्हणतात : जेव्हा मी तरुण अधिकाऱ्यांचा उल्लेख करतो तेव्हा माझ्या मनात ताजमध्ये घुसून दहशतवाद्यांना तोंड देणारे पोलीस उपायुक्त विश्वास नांगरे-पाटील आणि राजवर्धन यांचे नाव येते. याशिवाय तीन सहकारी मारले गेलेले असतानाही कामा रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावर दहशतवाद्यांचा सामना करणारे अतिरिक्त आयुक्त सदानंद दाते आणि हॉटेल ट्रायडण्टमध्ये घुसलेले अतिरिक्त आयुक्त कारगावकर यांचे कर्तृत्त्व लक्षात घेणे आवश्यक ठरते. सहाय्यक पोलीस आयुक्त इसाक बागवान यांनी एकटय़ाने आजुबाजुची कुमक मागवून विशेष कृती दलाचे आगमन होईपर्यंत नरिमन हाऊसमधील दहशतवाद्यांविरोधातील कारवाई सुरू ठेवली, हेही कल्पनेच्या पलीकडचे आहे. या हल्ल्याचा ठपका वा जबाबदारी कुठल्या पोलीस अधिकाऱ्यावर येते, इथपर्यंत चर्चा सीमित राहिली. दोषी कोण? पोलीस आयुक्त की पोलीस महासंचालक याच आवर्तात चर्चा घुटमळली. समितीने केलेल्या शिफारशींची तातडीने आणि योग्य पद्धतीने केलेली अंमलबजावणी आणि निरीक्षणे पोलीस अधिकारी आणि जनतेला दिलासादायक ठरतील, असेही प्रधान यांनी स्पष्ट केले आहे.