Leading International Marathi News Daily

रविवार , २१ जून २००९

(सविस्तर वृत्त)

राष्ट्रवादी पराभवाच्या अहवालाची होळी;
नाव घेणाऱ्यांना सोडणार नाही -उदयनराजे
सातारा, २० जून / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचे खापर फोडणाऱ्यांच्या यादीत खासदार

 

उदयनराजे भोसले यांचे नाव गोवण्यात आल्याची संतप्त प्रतिक्रिया येथे उमटली असून, राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे फडकावत मोर्चा काढून निदर्शने केली व येथील पोवई नाका परिसरातील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळा परिसरात राष्ट्रवादी पराभवाच्या अहवालाची तसेच तो तयार करणाऱ्या नेत्यांच्या प्रतिमेची होळी केली.
या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ज्यांनी बेजबाबदार अहवाल सादर केला त्यांची प्रतिमा व तो अहवाल आपल्या चाहत्यांनी उत्स्फूर्तपणे जाळून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपण याबाबत कुणाला आवरू शकत नाही. लवकर माझ्याबाबत खुलासा झाला नाही तर लोक ऐकणार नाहीत. शरद पवार यांची प्रतिमा जाळलेली नाही, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले व जोपर्यंत खुलासा होत नाही, तोपर्यंत पक्षाचे कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचेही सांगितले.
माझे नाव कारण नसताना घेतले आहे. माझा राष्ट्रवादीशी संबंध काय, असा सवाल करून उदयनराजे यांनी सांगितले की, राष्ट्रवादीच्या दुर्दशेला जबाबदार असणाऱ्यांचा शोध घेऊन पक्षश्रेष्ठींनी संबंधितांवर कारवाई करावी, मीही त्यांचा शोध घेत असून, त्यांना मी सोडणार नाही. पक्ष खरोखरच मोठा व्हावासा वाटत असेल, तर पराभवास जबाबदार नेत्यांनी स्वतहून आत्मपरीक्षण करून राजीनामा द्यावा व नैतिकता पाळावी.
राष्ट्रवादीच्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेत आपण नव्हतो. पक्षाची उमेदवारी मिळण्यापूर्वी चार-पाच दिवस अगोदरपर्यंत आपण अपक्ष उभे राहण्याचा ठाम निर्णय केला होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक सोपी जाईल असा आग्रह धरून उमेदवारी दिली होती. पक्षांतर्गत कुणाला माझा एवढा तिरस्कार वाटत असेल, तर चिन्हाचा आग्रह करायचा नव्हता. पराभवाचे खापर माझ्या माथी कसे काय मारले कळत नाही. मी मनापासून परखडपणे बोलतो, तोंडावर बोलतो, भारतीय जनता पक्षात, काँग्रेसमध्ये होतो तेथेही जनता-कार्यकर्ते माझ्याबरोबर असताना दुर्दैवाने काही नेते माझा तिरस्कार करीत तोच अनुभव राष्ट्रवादीतही येत आहे.
मला लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य मिळू नये यासाठी पक्षाशी गद्दारी करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला व आपण या नेत्यांचा शोध घेत असल्याचे सांगितले. मी गप्प बसणाऱ्यापैकी नाही. पुराव्यासकट ते बाहेर काढीन.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पर्याय नसल्याचे उदयनराजे यांनी सांगितले. सातारा माझा मतदारसंघ असल्याने जिल्ह्य़ातील उमेदवार निवडीमध्ये अजितदादा पवार यांच्यासह कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही. शालिनीताईंसह इतरांचे सहकार्य मिळाले आहे. उमेदवार मतदारसंघाचे हित जोपासणारे असतील यावर आपला भर असेल. अजित पवार यांना पुणे जिल्ह्य़ातून इकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार का, असा प्रश्न करून ते म्हणाले, त्यांच्या सूचना ऐकू, पण येथील उमेदवार बिनविरोध कसे होतील ते मी बघणार आहे.
मी बोलतो ते लोकांना आवडते. ते लोकांच्या हिताचे असते. त्यामुळे बाकीच्यांची मी काळजी करीत नाही. पक्षाच्या पराभवाबाबत चिंतन करण्यापेक्षा चूक मान्य केल्यास लोक कौतुक करतील असे त्यांनी सांगितले.