Leading International Marathi News Daily

रविवार , २१ जून २००९

(सविस्तर वृत्त)

असंतोषाच्या वातावरणात भाजपचे मंथन सुरु
पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी समित्यांची स्थापना
नवी दिल्ली, २० जून/खास प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकांतील भाजपच्या पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी केंद्रीय व राज्यस्तरीय

 

समित्या नेमून भागणार नाही तर या समित्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर पराभवास जबाबदार ठरलेल्या नेत्यांना दंडित करण्याचीही इच्छाशक्ती पक्षनेतृत्वाला दाखवावी लागेल, असा सूर आजपासून दिल्लीत आत्मचिंतनासाठी बोलविण्यात आलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केला.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांतील भाजपच्या पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्पष्ट करून दोषारोपाच्या प्रकाराला लगाम लावण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे पक्षात धुमसत असलेला असंतोष शमला नाही. पक्षाचे रणनितीकार आणि निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख अरुण जेटली कार्यकारिणीच्या बैठकीला अनुपस्थित राहून युरोपात पर्यटनासाठी कसे गेले, असा सवाल ज्येष्ठ नेते अरुण शौरी यांनी पुन्हा उपस्थित केला. पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी दिल्लीबाहेरचे दहा नेते आणावे, अशी सूचनाही त्यांनी केली. जसवंत सिंह यांच्या नाराजीचा सूर आजही कायम होता. यापुढे आपण लोकसभेची निवडणूक लढणार नाही, असे त्यांनी आजच्या बैठकीत जाहीर करून टाकले. पक्षातील असंतुष्टांचा आवाज फार तीव्र होऊ नये, याची काळजी लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांच्या गोटाच्या वतीने घेतली जात होती. लोकसभा निवडणुकांतील पक्षाच्या कामगिरीचा राज्यनिहाय आढावा घेतल्यानंतरच ज्येष्ठ नेत्यांनी आपली मते मांडावी, असे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले. पण राज्यांचे अहवाल मांडले जात असताना अनेक नेत्यांनी हस्तक्षेप करीत आपल्या भावना मुक्तपणे व्यक्त केल्या आणि पराभवास जबाबदार नेत्यांवर शरसंधान करण्याची संधी सोडली नाही.
आरोप-प्रत्यारोपांच्या धुमश्चक्रीत भाजपच्या पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी केंद्र व राज्य स्तरावर समित्या नेमण्याचा निर्णय राजनाथ सिंह यांनी जाहीर केला. या समित्यांच्या सदस्यांची नावे गोपनीय ठेवण्यात आल्याचे पक्षाचे प्रवक्ते राजीव प्रताप रुडी यांनी सांगितले. पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी समित्यांची स्थापना म्हणजे वेळकाढूपणाचा प्रकार असल्याचे मत भाजप वर्तुळात व्यक्त केले जात आहे. या समित्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर पराभवास कारणीभूत ठरलेल्या संबंधितांवर कारवाई करण्याची इच्छाशक्ती दाखवून सर्वसामान्य कार्यकर्त्यांंच्या मनात विश्वास निर्माण करण्यात यावा, अशी मागणी शौरी यांनी केली. शौरींनी पक्षांतर्गत कामकाजाविषयी स्पष्टपणे नाखुषी जाहीर करीत अरुण जेटलींसह काही नेत्यांवर थेट शरसंधान केले. असंतुष्ट नेत्यांच्या आरोपांची धार बोथट करण्याची जबाबदारी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते सुंदरसिंह पटवा यांनी पार पाडली. त्यांनी पक्षाच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेताना अडवाणींच्या गोटाचे अप्रत्यक्ष समर्थन करताना नाराज नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
लोकसभा निवडणुकांतील पराभवानंतरही हिंदूुत्व, भारतीयत्व आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या आपल्या मूळ आदर्शवादावर भाजप ठाम असून संघाशी असलेले यापुढेही उत्तम संबंध राहतील, अशी ग्वाही राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात दिली. भाजपच्या सदस्यत्व मोहीमेच्या प्रमुखपदी उपाध्यक्ष बाळ आपटे यांची, तर पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांसाठी निवडणूक अधिकारी म्हणून थावरचंद गहलोत यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यनिहाय अहवालांवर चर्चा झाल्यानंतर उद्या अडवाणी यांचा भाषणाने या बैठकीचा समारोप होईल.