Leading International Marathi News Daily

रविवार , २१ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मेघराजाची वातावरणनिर्मिती
मुंबई, २० जून/प्रतिनिधी
अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा, उन्हाची काहिली आणि पाणीटंचाईने केलेली पंचाईत यामुळे

 

अक्षरश: कावलेल्या मुंबईकरांना शुक्रवारपासून ‘वातावरणनिर्मिती’ करीत मेघराजाने आपण लवकरच येत असल्याचे संकेत दिले. त्यानुसार तो मुंबापुरीच्या उंबरठय़ावर येऊन थडकलासुद्धा. परंतु एवढे दिवस ताटकळत ठेवल्यानंतर महामाया मुंबईत प्रवेश करताना ‘चाकरमान्यां’चे हाल होऊ नयेत, याच बहुधा उदात्त हेतूने मान्सूनने शनिवारी मुंबईत ‘एण्ट्री’ घेतली नाही. आता त्याची प्रतीक्षा हक्काच्या सुट्टीच्या दिवशी, रविवारी तमाम मुंबईकर करीत आहेत.
मान्सूनच्या आगमनाबाबत वेधशाळेने ‘आपला लौकिक’ राखत पार १ जूनलाच तो येणार, असे ठाम भाकित केले होते. नेहमीप्रमाणेच हा अंदाज खोटा ठरल्यानंतर त्याचे खापर मग प. बंगालमधील ‘ऐला’ चक्रीवादळावर फोडण्यात आले. सर्वसामान्यांना मात्र ‘राजापूरची गंगा’ आल्याने यंदा मान्सून ८-१० दिवस तरी उशिरा येणार असे ‘गावाकडच्यां’नी सांगितले होते. त्यामुळे १५-१७ जूनपर्यंत पावसाने तोंड दाखविले नाही तो निश्चिंत होता. परंतु त्यानंतरही त्याचा काही मागमूस दिसत नसल्याने मुंबईकर धास्तावले होते. परंतु शुक्रवारपासून मात्र वरुणराजाने आपले ‘मेघदूत’ पाठवून आपण येत असल्याची वर्दी दिली. आता रविवारी तो नक्की येणार, असे तमाम मुंबईकर गृहित धरून चालले आहेत.
दरम्यान, मुंबईच्या वेशीवर ठाणे, कल्याण, डोंबिवली, शहापूर आदी ठिकाणी पावसाने आज दमदार हजेरी लावली. ठाणे शहरात आज वीज कोसळून सहाजण जखमी झाले तर शहापूर तालुक्यातील डोळखांबजवळच्या पांढरीचा पाडा येथे मुसळधार पावसात वीज कोसळल्याने तीन दुभत्या गायी व दोन बैल ठार झाले. राज्यभरातही आज अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाल्याचे वृत्त आहे. नगर शहर आणि आसपास सायंकाळी तडाखेबंद पाऊस झाल्याने शहरात रस्त्यांवर पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. तर पुणे शहरात रात्री ८.३० पर्यंत चक्क ४० मि.मी. पावसाची नोंद झाली. दुपारी ३ नंतर पाऊस पडायला सुरुवात झाली ती रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. सातारा, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव तसेच महाबळेश्वर अशा अनेक ठिकाणी आज कमीजास्त पावसाची नोंद झाली. या पाश्र्वभूमीवर मुंबईत पावसाला सुरुवात होत असली तरी जून महिना संपेपर्यंत ‘मुंबईस्टाईल’ मुसळधार पाऊस होण्याची फारशी शक्यता नसल्याचे वेधशाळेकडून सांगण्यात आले.