Leading International Marathi News Daily

रविवार , २१ जून २००९

प्रादेशिक

विलासरावांच्या ‘एकला चलो’ला मुख्यमंत्र्यांचीही साथ!
मुंबई, २० जून / प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करण्याचा फेरविचार करावा, या आपल्या भूमिकेचा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांनी आज पुनरुच्चार केला. प्रदेश काँग्रेसने या बाबत चर्चा करण्यासाठी कार्यकारिणीची बैठक त्वरेने बोलवावी, अशी सूचनाही विलासराव देशमुख यांनी केली. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही देशमुख यांच्या सुरात सूर मिळवून यासंदर्भात कार्यकारिणीची बैठक त्वरेने बोलाविण्याची मागणी केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

वातावरण मान्सूनसाठी अनुकूल प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबईत वरूणराजाचे आगमन
मुंबई, २० जून / प्रतिनिधी
निम्मा जून सरला तरी मुंबईकर पावसाच्या धारांऐवजी घामाच्या धारांमध्ये भिजून निघत आहेत. पावसाच्या आगमनाची वर्दी देत गेले दोन दिवस आकाशात काळ्या ढगांनी संचार सुरू केला असला तरी पावसाच्या चार-दोन थेंबांवरच मुंबईकरांना समाधान मानावे लागले. आज दुपारी मात्र ढग केवळ गरजलेच नाहीत तर बरसले सुद्धा! मुंबईतील मीरा रोड, भाईंदर आणि वसई भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्याचप्रमाणे ठाणे शहर, कल्याण, डोंबिवलीतही वरुणराजाने कृपा केली.

आयसीआयसीआय बँकेशी संबंधित अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई, २० जून / प्रतिनिधी
आयसीआयसीआय बँकेसाठी आऊटसोर्सिगचे काम करणाऱ्या डेल्टा कंपनीचा अधिकारी सुयोग देशमुख याने आज सकाळी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. आयसीआयसीआय बँकेतील दोघा अधिकाऱ्यांमुळे आपल्याला नोकरी गमवावी लागली, अशी चिठ्ठी लिहून देशमुख याने आत्महत्येचा प्रयत्न केला.

वीजदरवाढीविरोधात ‘से टाटा टू रिलायन्स’
मुंबई, २० जून / प्रतिनिधी

उपनगरात रिलायन्स वीज कंपनीने भरमसाठ वीज दरवाढ केल्यामुळे हतबल झालेल्या ग्राहकांसाठी मुंबई ग्राहक पंचायतीने पुढाकार घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा जुलै २००८ चा आणि राज्य वीज नियामक आयोगाचा अलीकडचा निकाल यांचे उदाहरण देऊन रिलायन्सच्या ग्राहकांना टाटा वीज कंपनीकडे धाव घेता येणार आहे. यासाठी, से ‘टाटा’ टू रिलायन्स ही मोहिम आखली असून त्यासाठी विशेष विभाग स्थापन केल्याचे ग्राहक पंचायतीने स्पष्ट केले आहे.

मनसेची कामगार व महिला सेना बरखास्त
पदाधिकाऱ्यांबद्दल वाढत्या ‘अर्थपूर्ण’ तक्रारींची परिणती
मुंबई, २० जून/खास प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना व महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांची नव्याने फेररचना करावयाची असल्यामुळे या दोन्हीही संघटनांची कार्यकारिणी संपूर्णपणे बरखास्त करण्याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज जाहीर केला. या दोन्ही संघटनातील अंतर्गत गटबाजी तसेच कामगार संघटनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांबद्दलच्या वाढत्या ‘अर्थपूर्ण’ तक्रारींमुळे राज यांनी ही कारवाई केल्याचे मनसेच्या सूत्रांनी सांगितले. राज यांच्या या कारवाईचे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मोठय़ा प्रमाणात स्वागत होत आहे.

फॅसिस्टवादी शक्तींचा पाडाव करा मल्लिका साराभाई यांचे आवाहन
मुंबई, २० जून / प्रतिनिधी
फॅसिझमची अनेक रूप आहेत. काही शक्ती उघड फॅसिझमवादी आहेत तर काही शक्ती पडद्याआडून कार्य करतात, अशा शक्तींचा पाडाव करण्यासाठी धर्मनिरपेक्ष विचारांच्या व्यक्ती, संघटनांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन गुजरातमधील सामाजिक कार्यकर्त्यां मल्लिका साराभाई यांनी आज केले.

‘त्या’ विमानाला उड्डाणाची परवानगी
मुंबई, २० जून / प्रतिनिधी
परवानगीशिवाय भारतीय अवकाशहद्दीत परवानगी न घेता घुसल्याने मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आलेल्या अमेरिकेच्या लष्करी विमानाला अखेरीस पुन्हा उड्डाण करण्यास भारत सरकारने परवानगी दिली आहे. आता हे विमान मुंबईहून कंदाहारला जाणार आहे. युक्रेनियन बनावटीचे असलेले एएन-१२४ हे विमान व्होल्गा नेप्र या रशियन कंपनीच्या मालकीचे आहे. अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी कारवाईसाठी अमेरिकी लष्कराने भाडय़ाने हे विमान घेतले होते. मालवाहू प्रकारातील हे विमान लष्करी साहित्य-सामग्री घेऊन कंदाहारकडे जात असताना ते काल शुक्रवारी रात्री आठ वाजता भारतीय हवाई हद्दीत परवानगी न घेता शिरले. या विमानात वाहने, औषधे, शस्त्रास्त्रेही आहेत. या संदर्भातभारतीय हवाईदलाच्या जनसंपर्क अधिकारी व विंग कमांडर टी. के. सिंघा यांनी सांगितले की, भारतीय हवाई हद्दीतून जाण्याची त्यांच्याकडे परवानगी नव्हती. त्यामुळे त्यांना मुंबई विमानतळावर विमान उतरविण्यास सांगण्यात आले. रात्री १०.४० वाजता हे विमान उतरविण्यात आले.

मुंबई पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे आज वितरण
मुंबई, २० जून / प्रतिनिधी
मुंबई मराठी पत्रकार संघाचा ६८ वा वर्धापन दिन सोहळा उद्या २१ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सीएसटी समोरील पत्रकार भवन, आझाद मैदान येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्र विभागाचे प्रा. जयदेव डोळे यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. यावेळी पत्रकारितेतील विविध पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

‘९०:१०’ कोटा प्रकरण न्यायालयात
मुंबई २० जून / प्रतिनिधी

राज्य सरकारने अकरावी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू केलेले ९०:१० कोटा प्रकरण अखेर अपेक्षेप्रमाणे न्यायालयात दाखल झाले आहे. कांदिवलीच्या ‘ठाकूर पब्लिक स्कूल’ या शाळेतील एका विद्यार्थीनीचे पालक विराज मणियार यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवले असून त्यांच्या बरोबर आज माहीमच्या ‘बॉम्बे स्कॉटिश’ शाळेचे पालक संजय गव्हाणकर यांनीही जनहित याचिका दाखल केली आहे. या दोघा याचिकाकर्त्यांना मुंबई, पुण्यातील अनेक पालकांची साथ मिळणार आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाची ही प्रकिया चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या निर्णयाला न्यायालयात आव्हान मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाने यापूर्वीच ‘कॅव्हेट’ दाखल केलेले आहे.