Leading International Marathi News Daily

रविवार , २१ जून २००९

नगर परिसरात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस
नगर, २० जून/प्रतिनिधी

वळव्याच्या पावसाने आज सलग तिसऱ्या दिवशी नगर शहरासह परिसरात जोरदार हजेरी लावली. सायंकाळी ५ वाजता सुरू झालेल्या पावसाने शहराला धुऊन काढले. शहरातील अनेक रस्ते व सखल भागात पाणी साठले होते. व्यावसायिक, शालेय विद्यार्थी, वाहनचालकांची या पावसाने त्रेधा उडविली. सकाळपासून काहीसे पावसाळी वातावरण होते. मात्र, सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान प्रत्यक्ष पावसाला सुरुवात झाली.

लालटाकी रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली
नगर, २० जून/प्रतिनिधी

महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज पोलीस बंदोबस्तात लालटाकी रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली. अप्पू चौक ते जिल्हा रुग्णालयादरम्यान अनेक अतिक्रमणे काढण्यात आली. टपऱ्या, सिमेंटचे ओटे, हातगाडीवाले पथकाने हटविले. काही दुकानदारांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु सरकारी कामात अडथळा आणू नये, अशी ताकीद देऊन पोलिसांनी त्यांना बाजूस काढले. त्यानंतर पथकाने सर्व अतिक्रमणे हटविली.

दहावीचा निकाल वेळेत लावण्याचा प्रयत्न - विखे
‘पुढील वर्षी राज्यभर अकरावीचे ऑनलाईन प्रवेश’

नगर, २० जून/प्रतिनिधी

पुढील वर्षीपासून राज्यभर ऑनलाईन पद्धतीने अकरावीचे प्रवेश सुरू करण्याचे सूतोवाच राज्याचे शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज येथे केले. त्याबरोबरच दहावीचा निकाल लवकर जाहीर करता यावा या दृष्टीनेही पुढील वर्षी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेनंतर बँकेचे उपाध्यक्ष आमदार राजीव राजळे यांच्या दालनात विखे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना वरील माहिती दिली.

आगळी प्रेमकथा
काल शिर्डीत असताना
अचानक एक व्यक्ती
समोर येऊन उभी राहिली
म्हणाली, ‘ओळखलंत का?’
मी खूप आठवायचा प्रयत्न केला
काही आठवेना
शेवटी त्यानेच स्वतची
ओळख सांगितली,
अन् मला तो दिवस आठवला
त्या दिवशी
ऑफिसमध्ये बसलो असताना
ऑफिसबाहेर दोन युवक
घुटमळताना मला दिसले
त्यातील एकाने

क्रीडा कार्यालयाचा निष्काळजीपणा
जिल्हा पुरस्कारापासून खेळाडू-मार्गदर्शक वंचित!

मोहनीराज लहाडे, नगर, २० जून

लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा बागूलबुवा उभा करीत जिल्हा क्रीडा कार्यालयाने यंदा खेळाडू-मार्गदर्शकांना जिल्हा क्रीडा पुरस्कारापासून वंचित ठेवले आहे! गुणवंत खेळाडूंवर हा अन्यायच ठरला आहे. प्रत्यक्ष ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार पुरस्कारासाठीचे प्रस्ताव आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मागविले जाणे आवश्यक होते. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या अक्षम्य निष्काळजीपणाबद्दल खेळाडू, संघटनांचे पदाधिकारी यांच्या भावना तीव्र आहेत. काहींनी तर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी करा, अशी मागणी केली.

नगर शहराला आज पाणी नाही
नगर, २० जून/प्रतिनिधी

पावसामुळे वीजपुरवठा खंडित होऊन पाणीपुरवठा यंत्रणेचा उपसा बंद पडल्यामुळे उद्या (रविवार) शहरासह उपनगरांना पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेने कळविले आहे. देहरे व विळद परिसरात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या दरम्यान वांबोरी चारी योजनेचे वीज खांब शहर पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेच्या वीज खांबांबर पडले. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान, झालेल्या या प्रकारामुळे मुळानगर, विळद, नागापूर पंम्पिंग स्टेशनमधील पाणीउपसा बंद झाला. तरी सतत सुरू असलेल्या पावसामुळे वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू झाला नव्हता. परिणामी उद्या (रविवारी) पाणीपुरवठा होणार नसून नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन महापौर संग्राम जगताप यांनी केले आहे.

गंगागिरीमहाराज पायी दिंडीचे श्रीरामपूरमध्ये उत्स्फूर्त स्वागत
माळवाडगाव, २० जून/वार्ताहर

पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या सरालाबेटच्या सद्गुरू गंगागिरीमहाराज पायी दिंडीचे श्रीरामपूर शहरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सराला बेट येथून काल पंढरपूरकडे महंत रामगिरीमहाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे प्रस्थान झाले. उंदिरगाव येथील मुक्कामानंतर ब्राम्हणगाव, शिरसगावमार्गे दिंडीचे श्रीरामपुरात दुपारी १२ वाजता आगमन झाले. आमदार जयंत ससाणे, नूतन नगराध्यक्षा मंदाबाई कांबळे, ‘मुळा-प्रवरा’चे उपाध्यक्ष सचिन गुजर, सभापती नानासाहेब पवार यांनी दिंडीचे स्वागत केले. अशोक उद्योग समूहाच्या वतीने माजी आमदार भानुदास मुरकुटे, सिद्धार्थ मुरकुटे, ‘अशोक’चे अध्यक्ष रावसाहेब थोरात, बाबासाहेब काळे यांनीही दिंडीचे स्वागत केले.

व्यापाऱ्यांचे कोपरगावात कांदा खरेदी बंद आंदोलन
कोपरगाव, २० जून/वार्ताहर

कृषी उत्पन्न बाजार समितीने लायसन्स कमिटीला विश्वासात न घेता येवले येथील कांदा व्यापाऱ्याला खरेदीचा परवाना दिल्याच्या कारणावरून येथील व राहुरीच्या कांदा व्यापाऱ्यांनी खरेदी बंद आंदोलन सुरू केले आहे. मागील आठवडय़ात येवल्याचे व्यापारी समदडिया यांना कांदा खरेदीचा परवाना दिला. त्यांनी इतर व्यापाऱ्यांपेक्षा १०० ते १५० रुपये जादा भाव दिल्याने शेतकरी खुशीत होते. बहुतेक शेतकरी कांदा देत होते. यामुळे येथील व्यापारी धास्तावले व त्यांनी खरेदी बंद केली. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शिवसेना जिल्हा उपप्रमुख बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली कांदाफेक आंदोलन केले. परिणामी व्यापाऱ्यांना लिलाव सुरू करावे लागले. बाहेरच्या व्यापाऱ्यामुळे येथील व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. स्थानिक ६ व राहुरीच्या १३जणांनी एकत्र येऊन बेमुदत बंद आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांना व बाजार समितीला वेठी धरण्याचा हा प्रकार आहे. मागेल त्याला खरेदीचा परवाना देऊन समितीने व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडीत काढावी, अशी मागणी होत आहे.व्यापाऱ्यांनी बाजार समितीला झुकवण्यासाठी बंदचे हत्यार उपसले आहे. मात्र, पदाधिकाऱ्यांनी कांदाउत्पादकांचे हित जोपासून निर्णय घ्यावा; अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही उत्पादकांनी दिला आहे.

नाटकात अभिनयाचा कस - सक्षम कुलकर्णी
शेवगाव, २० जून/वार्ताहर

नाटकाच्या व्यासपीठावर टेक-रिटेकला संधी नसते. त्यामुळे नाटकात अभिनेत्याच्या अभिनयाचा कस लागतो, असे मत ‘दे धक्का’ या गाजलेल्या चित्रपटातील अभिनेता सक्षम कुलकर्णी याने व्यक्त केले. अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या शेवगाव शाखा, तसेच बाळासाहेब भारदे विद्यालयाच्या वतीने एक दिवसीय बाल नाटय़ संमेलन झाले. अध्यक्षस्थानी ‘ज्ञानेश्वर’चे संचालक दिलीपराव लांडे होते. रावसाहेब पटवर्धन सभागृहात सक्षम याची मुलाखत उमेश कुलकर्णी यांनी घेतली. दोन सत्रात पार पडलेल्या या संमेलनात श्रोत्यांना मनमुराद हसवत त्याने धमाल उडवली. सह्य़ाद्री या दूरदर्शनच्या वाहिनीवर सादर होणाऱ्या ‘वारे वा’ या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रेरणा गोरे, रणजीत डहाळे, मुग्धा तळवळकर, अपूर्व सातपुते, विश्वजित शिंदे या बालकलाकारांनी पहिल्या सत्रात बहारदार कार्यक्रम सादर केले. पुणे येथील प्रकाश पारखी यांनी सादर केलेल्या ‘नकला नगरी’ या बहारदार कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शिबिराच्या दुसऱ्या सत्रात सक्षमने कलेत रस असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पाठांतर व स्पष्ट उच्चार हे अभिनय क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे अंग आहे, असे सांगून ‘पक-पक पकाक’ व ‘दे धक्का’ या चित्रपटातील काही धमालदार किस्सेही सांगितले. शिबिरास कलाप्रेमींसह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

चुलत भावजईस बेदम मारहाण करणाऱ्यास अटक
देवळाली प्रवरा, २० जून/वार्ताहर

अनैतिक संबंधास नकार देणाऱ्या चुलत भावजयीस बेदम मारहाण करणाऱ्याविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्ह्य़ाची नोंद केली. आरोपीला अटक करण्यात आली. राहुरी तालुक्याचीही मल्हारवाडी रस्त्यालगत राहणाऱ्या विवाहितेला तिच्या चुलत दिराने १७ जूनला पहाटे अंगणात झोपलेली असताना उठविले. नवरा तुला नांदवित नाही. माझ्याशी अनैतिक संबंध ठेव, असे म्हणून अर्जुन ऊर्फ दाद्या शिंदे (वय २१) याने तिला लाथा-बुक्क्य़ा व बांबूने बेदम मारहाण केली. मारहाणीत ती ३५ वर्षीय महिला जखमी झाली. तिला सुरुवातीला राहुरी पालिका रुग्णालय व नंतर नगरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

डॉ. कवडे गोळीबारप्रकरणी आणखी एका आरोपीस अटक
श्रीरामपूर, २० जून/प्रतिनिधी

भेर्डापूर येथील डॉ. प्रमोद कवडे यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी रवींद्रसिंग प्रितमसिंग पन्नो (मनमाड) यास ताब्यात घेतले. याप्रकरणी आठ आरोपी ताब्यात असून, आणखी दोघांचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील कडसाने यांनी दिली. डॉ. कवडे यांची व्यावसायिक स्पर्धेतून त्यांचाच चुलत भाऊ डॉ. संदीप कवडे याने जिवे मारण्याची सुपारी दिली होती. याप्रकरणी आतापर्यंत डॉ. संदीप कवडे, सुपारी घेणारे सागर बेग, सचिन यादव, अनिल सांगळे, मयूर सोनार, मुन्ना बोरा व टिन्नू गायकवाड यांना अटक करण्यात आली. बाळू कापुरे ऊर्फ जॅक व अशोक तलरेजा यांचा पोलीस शोध घेत आहेत. तलरेजा याचा शहरातील त्याच्या नातेवाईकांमार्फत ठावठिकाणा शोधण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत. पन्नो हा भंगारमालाच्या मालमोटारी चोरण्यात पटाईत आहे. त्याच्यावर मनमाड येथे गुन्हे दाखल आहेत. मध्य प्रदेश, वर्धा, आर्वी या ठिकाणी शिकलकरी लोक हुबेहूब पिस्तूल तयार करतात, अशी माहिती कडसाने यांनी पत्रकारांना दिली.

छप्पर पेटविल्याप्रकरणी तिघांना पाच दिवस कोठडी
देवळाली प्रवरा, २० जून/वार्ताहर

आठवडे बाजारात दारू पिऊन एकमेकांना शिवीगाळ करून त्यातून झालेल्या भांडणातून राहते छप्पर पेटवून दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तिघांनाही अटक करण्यात आला. गुरुवारी (दि. १८) हा प्रकार घडला. राहुरी तालुक्यातील गडदे आखाडा येथील चिमा कोळसे, भाऊसाहेब बाचकर, धमा जाधव, कारभारी टेंगळे हे सर्व गुरुवारी आठवडेबाजारासाठी राहुरीला आले होते. तेथे त्यांनी दारू घेतली. दारूच्या नशेत त्यांच्यात शिवीगाळ, हमरीतुमरी झाली. कोळसे याने शिवीगाळ का करता, असे म्हटले असता ‘तुला दाखवतोच घरी चल,’ असे इतरांनी म्हटले. त्याच दिवशी रात्री साडेदहाच्या सुमारास कोळसे याचे छप्पर पेटवून दिले. छपरासह कपडे, धान्य, संसाराच्या वस्तू जळून गेल्या. ३० त्यात हजारांचे नुकसान झाले. कोळसे याने दिलेल्या फिर्यादीवरून बाचकर, जाधव, टेंगळेविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश रा. स. पाटील (भोसले) यांनी ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

ताजनापूर योजनेच्या पाण्यासाठी लढा उभारावा झ्र् काकडे
शेवगाव, २० जून/वार्ताहर

ताजनापूर उपसा जलसिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे पाणी तालुक्याच्या पूर्व भागातील ३० गावांना मिळावे, या मागणीसाठी तरुण कार्यकर्त्यांसमवेत पक्षीय भेद विसरून एकत्रित लढा उभारावा. या लढय़ात आपण सर्वशक्तीनिशी उभे राहू, असे प्रतिपादन जनशक्ती मंच या संघटनेचे संस्थापक शिवाजीराव काकडे यांनी केले. तालुक्यातील चापडगाव येथे झालेल्या पाणी परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दूध कल्याण संघाचे गुलाबराव डेरे होते. नगर येथील स्नेहालय संस्थेचे विश्वस्त डॉ. गिरीश कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री. काकडे म्हणाले की, (कै.) आबासाहेब काकडे यांनी मुळा धरणाचे पाणी व ताजनापूर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी तालुक्याला मिळावे म्हणून संपूर्ण जीवन खर्ची घातले. त्यांच्या हा लढय़ाचा वारसा रक्ताचा अखेरचा थेंब असेपर्यंत आपण चालवू. तालुक्यातील राजकारण्यांनी तालुका भकास ठेवण्याचे पाप केले. परंतु सामान्य जनता एकत्र झाल्यास कोणतेही काम अशक्य नाही. या वेळी डॉ. कुलकर्णी यांचेही भाषण झाले. कार्यक्रमास जि. प. सदस्य हर्षदा काकडे, कृष्णा नेमाणे, सोमनाथ पातकळ, जगन्नाथ केदार, भाऊसाहेब काळे, नंदाताई राशीनकर उपस्थित होते.

नियमित विजेसाठी आंदोलनाचा इशारा
निघोज, २० जून/वार्ताहर

वीजकपातीबद्दल शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत असून, नियमित वीजपुरवठा न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांसाठी बारा तासांपेक्षा जास्त वीजकपात, तसेच घरगुती ग्राहक व व्यावसायिकांसाठी सहा तासांपेक्षा जास्त वीजकपात होत असताना कधी कधी २४ तास वीज गायब असते. येथील प्रश्नथमिक आरोग्य केंद्र परिसरातील काही भागात आठवडय़ातील तीन रात्री वीज खंडित असते. आरोग्य केंद्रात परिसरातील रुग्णांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. येथे नेहमीच शस्त्रक्रिया सुरू असतात. वीज कंपनीकडे वारंवार मागणी करूनही या भागात अंधाराचे साम्राज्य असते. वीज खंडित होण्यामुळे आरोग्य केंद्रातील रुग्णांना मोठा फटका बसतो. निघोज व परिसरातील अधिकृत मीटरधारकांची संख्या मोठी असली, तरी अनधिकृत वीजजोडधारकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळेच अनेक भागात कमी दाबाने वीजपुरवठा होत असतो. शिवाय आकडेधारकांकडे हिटर, शेगडय़ा अशी उपकरणे असल्याने जादा दाब येऊन वारंवार वीज खंडित होते. अनधिकृत वीजग्राहक वीज कर्मचाऱ्यांना मासिक बिदागी देतात! वीज कर्मचाऱ्यांच्या पाठबळाने त्यांना वीजजोडणीचे कृपाछत्रच मिळाले आहे.

घराचे अतिक्रमण हटविले; न्यायालयीन चौकशीचे आदेश
नेवासे, २० जून/वार्ताहर

आदेश नसताना घराचे अतिक्रमण हटवून जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल नेवासे ग्रामपंचायतीच्या माजी पदाधिकारी आणि ग्रामसेवकाविरुद्ध न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. संभाजीनगरमधील उषा भगवान उनावणे यांचे घर, अतिक्रमणातील शौचालय नेवासे ग्रामपंचायतीने २००७मध्ये पाडले. या वेळी उनावणे यांच्या घरातील फर्निचरची व घरातील राष्ट्रसंतांच्या प्रतिमांची मोडतोड झाली. याबाबत त्यांनी फिर्याद दिली होती. परंतु पोलिसांनी दखल न घेतल्याने अखेर त्यांनी नेवासे न्यायालयात दाद मागितली.पोलिसांनी गुन्हा झाला नसल्याचा अहवाल दिला. परंतु उनावणे यांनी स्वत पुरावे सादर केल्यानंतर चौकशी सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याचे उनावणे यांनी सांगितले. या वेळी त्यांचे वकील दिनकर आरगडे हजर होते. नेवासे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच राजश्री कडू, उपसरपंच व्यवहारे व ग्रामसेवक ज्ञानदेव चव्हाण यांच्यासह सर्वच ग्रामपंचायत सदस्यांविरुद्ध तक्रार देण्यात आली होती.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सर्पदंश झालेल्या मुलाचा मृत्यू
राहाता, २० जून/वार्ताहर

साईबाबा संस्थानच्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सर्पदंश झालेल्या संस्थान कर्मचाऱ्याच्या मुलाला प्रश्नण गमवावे लागले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कार्यकारी अधिकाऱ्यांकडे संताप व्यक्त केला. आकाश सखाराम डांगे (वय १०, रा. डोऱ्हाळे) असे मृत मुलाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी त्याला सर्पदंश झाला. त्याला तातडीने साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार न करता तेथील डॉक्टरांनी साईनाथ रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. तेथील डॉक्टरांनीही लोणीच्या रुग्णालयात हलविण्यास सांगितले. यामध्ये सुमारे दीड ते दोन तास गेले. अखेर या मुलाला बेशुद्धावस्थेत मोटरसायकलवर लोणी येथे नेताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. संस्थानच्या या दोन्ही रुग्णालयांत वेळेवर उपचार होऊ न शकल्याने मुलाला प्रश्नण गमवावे लागले. कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आश्वासन दिले असले, तरी आता यामधून काहीही निष्पन्न होणार नाही, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.