Leading International Marathi News Daily

रविवार , २१ जून २००९

टेक ऑफच्या प्रतीक्षेत विमानतळ
जयेश सामंत

नवी मुंबई - नवी मुंबईत उलव्यानजीक उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भवितव्याविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. १९९५च्या सुमारास पहिल्यांदा नवी मुंबई विमानतळाविषयी वाच्यता करण्यात आली होती. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाहतुकीचा बोजा लक्षात घेऊन मुंबईपासूनच जवळच कुठेतरी हे विमानतळ उभारले जावे, असा विचार तेव्हा पुढे आला. सिडकोने यासाठी पुढाकार घेतला आणि पुढे या विचाराला बळकटी मिळत गेली. ९७-९८च्या सुमारास नवी मुंबईतील विमानतळाचा प्रश्नरूप आराखडाही तयार करण्यात आला. राज्य सरकारने नवी मुंबईतच विमानतळ उभारायचे यावर शिक्कामोर्तब केले. हा निर्णय होऊन आता तब्बल एका तपाहून अधिक काळ लोटला आहे.

रेवस-करंजा पूल पुन्हा चर्चेत!
मधुकर ठाकूर

अठ्ठावीस वर्षापूर्वी धरमतर खाडीवर बांधण्यात येणाऱ्या रेवस-करंजा या रखडलेल्या पुलाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. शासनाच्या अक्षम्य अनास्थेमुळे अखेर बासनात गुंडाळण्यात आलेल्या रेवस-करंजा पुलाच्या उभारण्याच्या विलंबाबाबत आमदार विवेक पाटील यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधले. यामुळे अलिबाग- उरण- मुंबई हे अंतर कमी करणारा रेवस-करंजा पूल खरंच होईल काय, अशी विचारणा परिसरातून होऊ लागली आहे.

बॅन, बॅनर्स!
अनिरुद्ध भातखंडे

किल्ले रायगडावर नुकताच ३३६ वा शिवराज्याभिषेक दिन मोठय़ा उत्साहात साजरा झाला. हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या या गडावर जो मनुष्य एकदा जातो, तो त्यानंतर वारंवार जातो असे म्हणतात. यातील काही हौशी आणि उथळ पर्यटक दगडांवर आपली नावे लिहून ठेवतात, परंतु आश्चर्याची बाब म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये शून्यातून स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपतींचा नामोल्लेखही गडावर कोठेही दिसत नाही. वास्तविक स्वत:च्या स्तुतीपर शिलालेख कोरून घेणे महाराजांना अशक्य नव्हते. मात्र ‘इदं न मम’ या निरपेक्ष वृत्तीने राज्यकारभार करणारा असा राजा विरळाच. शिवाजी महाराजांचे ऊठसूट नाव घेऊन गलिच्छ राजकारण करणारे आजकालचे राज्यकर्ते आणि अन्य राजकारणी मात्र कमालीचे प्रसिद्धीलोलुप आहेत. राजकारणातील स्थान हे अळवावरचे पाणी असल्याने आत्मविश्वास, कर्तृत्व आणि भरीव समाजकार्य करण्याची इच्छाशक्ती नसलेले हे राजकारणी सतत भयगंडाने पछाडलेले असतात. मतदारांच्या नजरेसमोर सतत राहण्यासाठी ते नाना युक्त्या करीत असतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या या काळात फ्लेक्स फलकांचे चांगलेच हत्यार त्यांच्या हाती लागले आहे. मनी- मसल पॉवरच्या बळावर दिवसाढवळ्या कायद्याला धाब्यावर बसवून हजारो बॅनर्स लावले जात आहेत. दीड महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू असल्याने पनवेलमधील सर्व फलक गायब झाले होते. तसेच एकही फलक नव्याने लावण्यात आला नव्हता. या काळात राजकारण्यांची आणि त्यांच्या चेल्यांची चांगलीच कुचंबणा झाली असेल. काचबंद गाडीतून फिरताना प्रत्येक खांबावर लागलेले आपले फलक पाहताना या नेत्यांना खूपच धन्यता वाटत असेल, मात्र आचारसंहितेच्या कालावधीमध्ये त्यांना चुकल्याचुकल्यासारखे झाले असेल.