Leading International Marathi News Daily

रविवार , २१ जून २००९

राज्य

पद्मसिंहांना ४ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी
पनवेल, २० जून/प्रतिनिधी

काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी खासदार पद्मसिंह पाटील यांना न्यायालयाने सुनावलेली सीबीआय कोठडी आज संपल्याने त्यांना ४ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पद्मसिंह यांना यापूर्वी १४ जूनला पनवेल न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना २० जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली होती.

पु. भा. भावे सभागृहाच्या मुक्तीसाठी ठाकरे पुढाकार घेणार
डोंबिवली, २० जून/प्रतिनिधी
महिलेला माहेरचा दगडसुध्दा देवासमान वाटतो. माहेरची कुणीही व्यक्ती भेटली तरी ती त्यास आपल्या कुटुंबातील घटक असल्यासारखीच वागवते. डोंबिवलीच्या माहेरवाशीण असलेल्या शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या धर्मपत्नी रश्मी ठाकरे यांना डोंबिवली ग्रंथालय स्थलांतराचा विषय, त्यानंतरचा भाषाप्रभू पु. भा. भावे सभागृहाच्या वास्तुविषयात होत असलेले दुर्लक्ष आदी प्रश्न अस्वस्थ करताहेत. गेल्या आठवडय़ात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीच्या निमित्ताने लोकसत्ताच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी हे विषय काढले. आणि ‘काय चाललय डोंबिवलीत’? असा प्रश्नच केला.

पिण्याच्या पाण्याअभावी ठाणे जिल्ह्यातील २० आश्रमशाळांना टाळे!
सोपान बोंगाणे, ठाणे, १९ जून

घरातील विपन्न आर्थिक परिस्थितीमुळे गरीब आदिवासी कुटुंबातील मुला-मुलींवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी अशा कुटुंबातील शाळाबाह्य मुलांना शाळेकडे आकृष्ट करण्यासाठी शासन एकीकडे कोटय़वधी रुपये खर्च करीत असताना ‘शाळेत पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही’ या क्षुल्लक कारणावरून ठाणे जिल्ह्यातील २० आश्रमशाळा बंद करून त्यातील १० हजार मुला-मुलींची घराकडे हकालपट्टी करण्याचा संतापजनक व अजब प्रकार उघडकीला आला आहे.

जळगाव : नगराध्यक्ष निवडणुकीत दोन ठिकाणी राष्ट्रवादीची सरशी
जळगाव, २० जून / वार्ताहर
जिल्ह्य़ातील विविध ठिकाणी आज झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भुसावळ व पाचोरा येथे राष्ट्रवादी, फैजपुरात भाजप तर चोपडय़ात शहर विकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला. सर्वाधिक चुरशीमुळे साऱ्या जिल्ह्य़ाचे लक्ष लागून राहिलेल्या भुसावळच्या नगराध्यक्षपदी अखेर रेखा चौधरी यांनी बाजी मारली.

‘पूर रेषा आखणीचे काम तातडीने पूर्णत्वास न्यावे’
नाशिक, २० जून / प्रतिनिधी

शहरातून वाहणाऱ्या नद्यांची पूर रेषा आखणी करताना गेल्या ५० वर्षांतील पूरस्थितीचा सरासरी अभ्यास करावा आणि या प्रक्रियेत मानवी हिताचा सर्वसमावेशक विचार करून हे काम तातडीने पूर्णत्वास न्यावे असे निर्देश नाशिकचे पालकमंत्री छगन भुजाळ यांनी दिले. आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. दरम्यान, प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी नाशिक-मुंबई दरम्यानच्या विमानसेवेची सकाळची फेरी बंद झाली असून केवळ सायंकाळची फेरी सुरू आहे. ही विमानसेवा कार्यान्वित राहण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

उत्तर महाराष्ट्रात पावसाची हजेरी
नाशिक, २० जून / प्रतिनिधी

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व जळगाव जिल्ह्य़ात दाखल झालेल्या पावसाने दुसऱ्या दिवशी चांगलाच जोर पकडला असून या भागास सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने झोडपून काढले. ठिकठिकाणी झाडे कोसळून वीज तारा तुटल्याने अनेक गावे अंधारात बुडाली.

शिंदखेडय़ाजवळ अपघातात ५ ठार
धुळे, २० जून / वार्ताहर

शिंदखेडा तालुक्यात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे खासगी आराम बस व ट्रेलर यांच्यात समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात पाच ठार तर २० जण जखमी झाले. मृत व जखमी हे इंदूर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातातील जखमींवर शिरपूर व धुळे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नगराध्यक्षपद निवडणूक: काँग्रेस मागणार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद
पनवेल, २० जून/प्रतिनिधी

पनवेल नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत निवडणूकपूर्व आघाडी करणाऱ्या राष्ट्रवादीने आपला नगराध्यक्ष निवडून आणल्याने नगरपालिका अधिनियमाचा भंग झाला असून, जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकाराबाबत दाद मागण्यात येणार आहे, अशी माहिती पायउतार झालेले नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी दिली.

पोलीस कोठडीतील आरोपींचा मुक्काम एसी लॉजमध्ये!
शहापूर पोलिसांचा प्रताप
पत्रकारांनी पाळत ठेवून बिंग फोडले
शहापूर, २० जून/वार्ताहर
शहापूरजवळील आटगाव येथील कंपनीतून पोलिसांनी अटक केलेल्या बडय़ा उद्योजकांसह चार जणांना शहापूर न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असताना त्यांची एका लॉजवरील एसी रूममध्ये व्यवस्था करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने शहापुरात खळबळ माजली आहे. त्या चार आरोपींसह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहापूरमधील पत्रकारांनी रात्रभर पाळत ठेवून हा प्रकार उघडकीस आणला.

ठाण्यातील अनधिकृत विक्रांत टॉवरवर हातोडा
ठाणे, २० जून/प्रतिनिधी :

गेली तीन वर्षे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कळव्यातील विक्रांत टॉवर या सात मजली अनधिकृत इमारतीवर अखेर आज पालिकेचा हातोडा पडला. उच्च न्यायालयाने दिलेल्या तंबीनंतर पालिकेने आज प्रचंड पोलीस बंदोबस्तात या इमारतीवर कारवाई सुरू केली.सन २००५ साली कळवा नाक्यावर निर्माण झालेला हा अनधिकृत टॉवर गेली चार वर्षे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

पहिल्याच पावसामुळे कल्याण अंधारात
कल्याण, २० जून / वार्ताहर

पहिल्याच पावसाने वीज वितरण कंपनीची दाणादाण उडवून दिल्याने शहरातील काही भागांत आज सुमारे १० तास वीजप्रवाह खंडित झाला. परिणामी नागरिकांना मेणबत्तीच्या प्रकाशात रात्री जेवण करावे लागले. यामुळे वीज वितरण कंपनीबद्दल संताप व्यक्त करण्यात येत होता. आज दुपारी सुरू झालेल्या पावसाने दुपारी बारवी सबस्टेशन वाहिनी ब्रेकर नादुरुस्त झाल्याने गोदरेज हिल, बिर्ला कॉलेज, मुरबाड रोड या भागांतील वीजप्रवाह खंडित झाला होता. हे काम होते तो टाटा पॉवर हाऊसवरून येणारी २२ केबी वाहिनीची डिस्क खराब झाल्याने वल्लीपीर, स्टेशन रोड, रामबाग परिसरातील वीजप्रवाह खंडित झाला. हे काम होत नाही तर रामबागेतील गुरुनानक शाळेजवळील कंडक्टर इन्शुलेटर फुटल्याने वीजप्रवाह खंडित झाल्याचे कनिष्ठ अभियंता सुनील कोळमकर यांनी सांगितले. रात्री ११ वाजता वीजप्रवाह पूर्ववत झाला.

दीपक मानकर व साथीदारांविरुद्ध दरोडय़ाचा गुन्हा
पुणे, २० जून / प्रतिनिधी

जमिनी बळकावल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी आणि काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर या ‘लॅण्ड माफिया’विरुद्ध खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्य़ात आज दरोडय़ाचेही कलम लावण्यात आले. नातू यांचा पुरवणी जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी हे कलम लावले आहे. या प्रकरणी फिर्याद देणाऱ्या निवृत्त प्रा. यशवंत नातू व त्यांच्या कुटुंबीयांना चोवीस तास पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.शिवाजीनगर ठाण्यासमोरील जमीन बळकावल्याच्या प्रकरणात शिवाजी मानकर यांच्यासह दीपक मानकर हे देखील सामील असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणातही दीपक मानकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे, अशी माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दिली. तसेच, मानकर व कर्नाटकी या दोघांचा शस्त्र परवानाही रद्द करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.