Leading International Marathi News Daily

रविवार , २१ जून २००९

पाण्याची बचत करा..
बंधुराज लोणे

यंदा पाऊस लांबल्यामुळे मुंबईकरांच्या तोंडचे ‘पाणी’ पळाले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोटक्षेत्रात जूनच्या पहिल्या आठवडय़ात मान्सून दाखल होईल, अशी आशा होती. मात्र पावसाने उशीर केल्यामुळे उपलब्ध पाणी जपून वापरण्याच्या सूचना पालिका प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाचपैकी तीन तलावांतील पाणीसाठा राखीव कोटय़ावर आला आहे, तर इतर दोन तलावांची स्थितीही नाजूक आहे. त्यामुळे यावर्षी मुंबईवर पाणीटंचाईचे संकट कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेला पाऊस कुणीकडे..
अभिजित घोरपडे

आज २१ जून. हवामानाच्या वेळापत्रकानुसार धो-धो पावसाचाच हा काळ! मुंबई सतत लागून राहणाऱ्या पावसाच्या धारा, रस्त्यांवर साचणारे पाणी, ओसंडून वाहणारी गटारे, बेभान वारा, त्याच्याबरोबरच उसळणाऱ्या महाकाय लाटा, वाहतुकीचा खोळंबा, रुळांवर पाणी साचून विस्कळीत होणारे लोकलचे वेळापत्रक आणि बरेच काही. पावसाळ्याच्या प्रमाणाचा विचार केला तर एकूणच कोकणात असेच वातावरण असते. साधारणत: जूनच्या सुरुवातीला पावसाचे आगमन झाल्यावर आतापर्यंत तो जम बसवतो आणि संपूर्ण वातावरण ‘चिंब थरंथरं वलं’ बनतं. मग भाताच्या लावण्यांच्या निमित्ताने खाचरांमध्ये लगबग पाहायला मिळते. चार-चार दिवस नावापुरतंही सूर्याचं दर्शन घडत नाही.

चकाचक ‘बनवाबनवी’
सुनील डिंगणकर

‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या विस्मरणात गेलेला नाही. स्त्रीवेशात चपखल बसलेला सचिन, लक्ष्मीकांत बेर्डेला लागलेले ‘बीडीचे डोहाळे’, ‘हृदयी वसंत फुलताना’ इत्यादींच्या चर्चा अजूनही होत असतात. तिच कथा परदेशातील चकचकीत लोकेशन्सवर घडते तेव्हा ‘पेइंग गेस्ट्स’ या नावाने प्रदर्शित होते. चार मित्रांना (श्रेयस तळपदे, जावेद जाफरी, आशीष चौधरी आणि वत्सल सेठ) राहण्यासाठी म्हणून एक घर हवे असते. त्यांना असे एक घर मिळते पण घरमालक बल्लूची (जॉनी लिव्हर) अट असते की, केवळ जोडप्यांनाच घर भाडय़ाने देणार. घराची बोलणी करायला गेलेले दोघे जण (आशीष चौधरी आणि वत्सल सेठ) सांगतात की, त्यांचे लग्न झाले आहे.

अरे संस्कार संस्कार!
सुनील डिंगणकर

‘आजची तरुण पिढी’ हा विषय अजिबातच तरूण नाही. ‘म्हाताऱ्या आई-बापांकडे होणारे दुर्लक्ष आणि तरुण पिढीचे स्वकेंद्रित आयुष्य’ या विषय रवंथ होऊन चोथा झालेला आहे. ‘मी तुला नऊ महिने पोटात वाढवले आहे, त्याचे असे पांग फेडतोस’छाप संवाद ऐकून कान िकटले आहेत. असे असले तरी प्रेक्षकांवर संस्कार करण्याची हौस भागलेली नाही. त्यातूनच, झालेच तर थोडे समाजप्रबोधनही करायचे असते. ‘तिन्हीसांजा’मध्ये अथपासून इतिपर्यंत प्रेक्षकांवर संस्कार करण्याचा प्रयत्न झालेला आहे.

‘नारद रागावलाय अर्थात् अडलंय माझा थेटर’
पुराणकथेला वर्तमानाची झालर

पं. सत्यदेव दुबे हे काही मूलत: नाटककार नाहीत. त्यांचा मूळ पिंड हा दिग्दर्शक आणि नाटय़प्रशिक्षकाचा! परंतु आपल्याला काही सांगायचंय, या निकडीतून त्यांनी काही नाटकंही लिहिलीत. अर्थात ती दर्जाच्या दृष्टीनं उत्तम होती अशातला भाग नाही; पण त्यांतून त्यांना आयुष्याबद्दलचं आपलं आकलन मांडायचंय, हे प्रकर्षानं जाणवत राहतं. त्यांच्या या नाटकांमध्ये एक बऱ्यापैकी जमलेलं त्यांचं नाटक म्हणजे ‘ब्रह्मा-विष्णू-महेश’! मूळ हिंदीतलं हे नाटक आता ‘आविष्कार’तर्फे ‘नारद रागावलाय अर्थात् अडलंय माझं थेटर’ या नावानं आता मराठी रंगभूमीवर आलेलं आहे.

प्रतापगडावर घोंघावताहेत बदलाचे वार
स्थळ : किल्ले प्रतापगड. रात्री अकराच्या सुमारास गाडी महाड येथे पोहोचली. महाडजवळील पोलादपूर फाटय़ावर समोर भव्य छत्रपतींचा पुतळा पाहिला आणि संपूर्ण प्रवासाचा थकवा दूर झाला. रात्रीचा मुक्काम पोलादपूर एस.टी. स्टॅण्डवर पार पडला आणि पहाटे सहा वाजता गाडी प्रतापगडाकडे निघाली.
दव पडून भिजलेला निवांत रस्ता अंधुक प्रकाशाने हळूहळू उजळून निघत होता. पोलादपूर फाटा ते किल्ले प्रतापगड हा रस्ता खडतर वळणांचा व अरुंद असला तरी भोवतालचे निसर्गसौंदर्य डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. खरं तर प्रतापगड येथे आमचा हा पहिलाच प्रवास होता.

बारवी धरणात दीड महिना पुरेल इतका पाणीसाठा
भगवान मंडलिक

पहिल्या पावसाचे मृग नक्षत्र कोरडे गेले तरी पावसाने हजेरी लावली नाही. हीच परिस्थिती पुढे काही दिवस राहिली तर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची काय अवस्था होईल अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. कल्याण-डोंबिवली शहरांना बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. एमआयडीसी, पाटबंधारे विभाग यांच्या नियंत्रणाखाली पाणीपुरवठा सुरू असतो. एमआयडीसीकडून कल्याण डोंबिवली पालिकेला शंभर दशलक्ष लिटर व पालिकेच्या स्वयोजनांमधून १५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा असा एकूण २५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. पाऊस लांबणीवर पडला तर काय करायचे असा विचार करून पाटबंधारे विभागाने तीन महिन्यापूर्वीच एमआयडीसीला पत्र पाठवून आठवडय़ातून दोन दिवस पाणी कपात करण्याचे सूचित केले होते. परंतु, दरम्यानच्या काळात लोकसभेच्या निवडणुका असल्याने या पाणीटंचाईचा रोष मतांच्या माध्यमातून नागरिकांनी व्यक्त करू नये म्हणून राजकीय मंडळींनी विशेषत: राज्यातील सत्ताधारी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी पाणीटंचाई रद्द करण्यास भाग पाडले.
बारवी धरणात सध्या ५० ते ५५ मीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा पुढील दोन महिने पुरेल इतका आहे, असे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या आठवडय़ात मुबलक पाऊस झाला तर कोणतीही चिंता करावी लागणार नाही. पाणीपुरवठय़ाचे प्रमाण सध्या आहे तेच कायम ठेवता येईल. मात्र, पाऊस अजून १५ दिवस ते एक महिना पुढे गेला तर मात्र पाणी कपात अटळ असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. कारण दीड महिने पुरेल इतका पाणीसाठा योग्य नियोजनाने वापरला नाही तर मात्र काळजी करण्याजोगी परिस्थिती निर्माण होईल. पहिला पाऊस सुरू झाल्यानंतर डोंगरदऱ्यांतून नैसर्गिक झरे तयार होतात. त्यामुळे धरणाच्या साठय़ात भर पडत जाते. पावसाने जोर धरला की धरणातील साठय़ात दिवसाकाठी वाढ होत जाते. पाऊस येत्या दोन ते तीन दिवसांत पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पाणीपुरवठय़ाबाबत काळजी करण्याचे काहीच कारण नाही, अगदीच बिकट परिस्थिती निर्माण झाली तर त्यावर मात करता येऊ शकते.