Leading International Marathi News Daily

रविवार , २१ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अरे संस्कार संस्कार!
सुनील डिंगणकर

‘आजची तरुण पिढी’ हा विषय अजिबातच तरूण नाही. ‘म्हाताऱ्या आई-बापांकडे होणारे दुर्लक्ष आणि तरुण पिढीचे स्वकेंद्रित आयुष्य’ या विषय रवंथ होऊन चोथा झालेला आहे. ‘मी तुला नऊ महिने पोटात वाढवले आहे, त्याचे असे पांग फेडतोस’छाप संवाद ऐकून कान िकटले आहेत. असे असले तरी प्रेक्षकांवर संस्कार करण्याची हौस भागलेली नाही. त्यातूनच, झालेच तर थोडे समाजप्रबोधनही करायचे असते. ‘तिन्हीसांजा’मध्ये अथपासून इतिपर्यंत प्रेक्षकांवर संस्कार करण्याचा प्रयत्न झालेला आहे.
संदीप धुमाळ (संदीप कुलकर्णी), त्याची पत्नी (सुलेखा तळवलकर) आणि आई-वडील

 

(आशालता वाबगावकर, रमेश देव) एकाच घरात राहत असतात. सासू-सुनेचे अधूनमधून खटके उडत असतात. रोजच्या भांडणांमुळे आईवडिलांनी आता वृद्धाश्रमात राहायला जावे, असे सूनेचे मत असते. ज्याच्यासाठी एवढय़ा खस्ता खाल्ल्या तो मुलगाच आपल्याला वृद्धाश्रमात पाठवायला निघाला, याबद्दल त्याला चार शब्द सुनावून आई-वडील वृद्धाश्रमात राहायला जातात. संदीप आणि त्याच्या पत्नीला करिअरच्या धावपळीत एकमेकांशी धड बोलायलाही वेळ नसतो. त्यातच त्यांना मुलगा होतो. मुलाचा सांभाळ करायला घरी कोणी नसतानाही ते आई-वडिलांना बोलवत नाहीत आणि मुलाला पाळणाघरात ठेवतात. संदीपला त्याची चूक कळावी म्हणून त्याच्या बॉसच्या घरी बरोब्बर विरुद्ध परिस्थिती दाखविली आहे. चित्रपटाचा शेवट गोड होतो, हे वेगळे सांगणे नकोच.
पूर्वीचा नायक बँकेत किंवा खासगी कंपनीत व्यवस्थापकाच्या पदावर काम करायचा. ‘तिन्हीसांजा’मधील नायक सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो आणि त्याची पत्नी अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये काम करते. सासू-सुनेतील भांडणे पाहून त्या सुनेचा राग किंवा सासूची कीव येत नाही. औषधाला चार-दोन विनोदी प्रसंगही नाहीत. त्यामुळे चित्रपटभर तेच ते संवाद आणि प्रसंग पाहण्यावाचून प्रेक्षकाला गत्यंतर नसते. एका आईबापाच्या दु:खात भरीस भर म्हणून वृद्धाश्रमातील इतर चार वृद्धांची दु:ख ऐकण्याचा बोनसही दिग्दर्शकाने दिला आहे.
द्विधा मनस्थितीतल मुलगा, समंजस बाप, भावूक आई आणि आधुनिक विचारांची सून या चारही व्यक्तिरेखा अनुक्रमे संदीप कुलकर्णी, रमेश देव, आशालता वाबगावकर आणि सुलेखा तळवलकर यांनी यथोचित साकारल्या आहेत. पण संदीपच्या लहानपणची आई आणि तो मोठा झाल्यानंतरची त्याची आई यात केस पांढरे झाल्याचा फरक वगळता इतर काहीच बदल नाही. देहबोलीतील चपळतेत आणि बांध्यात तरुण वयात आणि म्हातारपणात फरक पडतो हे दिग्दर्शक सोयिस्करपणे विसरलेला आहे. आशालता वाबगावकरांच्या अभिनयावर आक्षेप नाही तरी राहून राहून ही बाब खटकत राहते. कारण फ्लॅशबॅक चित्रपटात फार वेळा आलेला आहे. सुधीर मोघेंचे शब्द आणि अशोक पत्कींच्या संगीताने सजलेले शीर्षकगीत मात्र ओठावर रुळेल असे आहे. इतरही गाणी प्रसंगांना साजेशी आहेत. पण चित्रपटभर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष उपदेशांचा ओव्हरडोस झाला आहे. चित्रपटातून काहीतरी सामाजिक संदेश देण्याचा अट्टाहास न ठेवता किमान मनोरंजन करावे, हीच अपेक्षा आहे. जुनी कथा नव्या संदर्भासह सांगण्यापलिकडे तिन्हीसांजा प्रेक्षकांना काहीच देत नाही. तिन्हीसांजा
निर्माते - सुधाकर डाळींबकर
कथा - पुंडलिक धुमाळ
पटकथा - पुंडलिक धुमाळ व शंतनु रोडे
दिग्दर्शन - पुंडलिक धुमाळ
संगीत - अशोक पत्की
गीते - सुधीर मोघे
कलाकार - संदीप कुलकर्णी, सुलेखा तळवलकर, रमेश देव, आशालता वाबगावकर, अरुण नलावडे इत्यादी.