Leading International Marathi News Daily

रविवार , २१ जून २००९

क्रीडा

लंकाविजय
श्रीलंका अंतिम फेरीत
दिलशान नाबाद ९६, विंडीजवर ५७ धावांनी मात

लंडन, २० जून / पीटीआय

तिलकरत्नेची नाबाद ९६ धावांची झुंजार खेळी आणि अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज, मुरलीधरन व अजंता मेंडिस यांची भेदक गोलंदाजी यामुळे श्रीलंकेने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत वेस्ट इंडिजचा ५७ धावांनी पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत आता पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन मातब्बर संघ एकमेकांशी झुंजणार असून पुन्हा एकदा विश्वचषक आशियातच राहणार हे मात्र स्पष्ट झालेले आहे.
या स्पर्धेत सुरुवातीपासून सातत्यपूर्ण कामगिरी करून सर्वाधिक धावा जमविणाऱ्या तिलकरत्ने दिलशानने वेस्ट इंडिजविरुद्धही आपली कामगिरी कायम राखली. सलामीला जयसूर्यासह फलंदाजीला आलेला दिलशान अखेरच्या चेंडूपर्यंत मैदानावर राहिला व त्याने ९६ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे गटांगळ्या खाणाऱ्या श्रीलंका संघाला नवसंजिवनी लाभली व त्यांनी दीडशे धावांचा टप्पा ओलांडला. या धावसंख्येचा त्यांनी उत्तमरित्या बचावही केला.

दिलशानमुळेच सामन्याचा नूर पालटला
संगकारा, गेलची स्तुतिसुमने

लंडन, २० जून / पीटीआय
तिलकरत्ने दिलशानच्या ९६ धावांच्या नाबाद खेळीचे कौतुक श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकारानेच नव्हे तर वेस्ट इंडिजचा कप्तान ख्रिस गेल यानेही केले आहे. त्याच्या या खेळीमुळेच सामन्याचा नूर पालटल्याचे दोन्ही कर्णधारांनी मान्य केले. या स्पर्धेत तडाखेबंद फलंदाज म्हणून दिलशान नावारूपााला आला. मुख्य म्हणजे गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत दिलशान परिपक्व आणि जबाबदार फलंदाज म्हणून उदयास आला आहे. त्याला स्वत:ची क्षमताही आता लक्षात आली आहे, असे श्रीलंकेचा कर्णधार संगकाराने सांगितले.

सावधान, मधमाशीप्रमाणे डंख मारू!
गेलचा ‘टीम इंडिया’ला इशारा

लंडन, २० जून / वृत्तसंस्था

मधमाशीप्रमाणे डंख मारण्याची क्षमता आमच्या संघात आहे हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत वेस्ट इंडिजचा कर्णधार ख्रिस गेल याने भारतीय संघाला इशारा दिला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यानंतर तो पत्रकारांशी बोलत होता. ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेत सुपर एट फेरीत वेस्ट इंडिजकडून झालेल्या पराभवाचा बदला आम्ही विंडीजविरुद्ध मालिका विजय मिळवून घेऊ, या भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या वक्तव्याकडे त्याचे लक्ष वेधले असता त्याने वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

दिलखेचक आणि शानदार
लंडन, २० जून / वृत्तसंस्था

काही दिवसांपूर्वीपर्यंत श्रीलंका संघासाठी ओझे ठरलेला तिलकरत्ने दिलशान ट्वेंटी २० विश्वचषक स्पर्धेत आपल्या संघाचा तारणहार ठरला आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा आणि सर्वोच्च धावसंख्या दिलशानच्या नावावर आहे. शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने नाबाद ९६ धावा काढून स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या नोंदविली. त्याने आतापर्यंत या स्पर्धेत तीन अर्धशतकांसह ३१७ धावा काढल्या आहेत. त्याने स्पर्धेत सर्वाधिक (४६) चौकार ठोकले आहेत.

विश्वचषक कुणाचा?
पाकिस्तान-श्रीलंका यांच्यात आज ‘फायनल’

लंडन, २० जून / पीटीआय
‘उपविजेते’ हा शिक्का पाकिस्तान संघ पुसून टाकणार की, अंदाज व्यक्त न करता येणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध श्रीलंका पुन्हा सातत्याच्या जोरावर सरशी साधून विश्वविजेतेपदाला गवसणी घालणार.. उद्या, रविवारी उभय संघांमध्ये लॉर्ड्सवर रंगणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या अनुषंगाने ही उत्सुकता शिगेला गेली आहे. पाकिस्तान संघ विश्वविजेतेपदासाठी जेवढा आतुर झाला आहे तेवढाच श्रीलंकेचा संघही असल्यामुळे उद्या, जगप्रसिद्ध लॉर्ड्सवर या दोन आशियाई संघांमध्ये होणारी अंतिम झुंज रोमांचक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज इंग्लंड-न्यूझीलंड अंतिम झुंज
लंडन, २० जून / पीटीआय

महिला क्रिकेटमधील आपले वर्चस्व सिद्ध करण्याची संधी इंग्लंडचा संघ उद्या साधण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. उद्या न्यूझीलंडविरुद्ध त्यांची विजेतेपदासाठी झुंज होणार असून पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावून या प्रकारातही आपणच श्रेष्ठ आहोत, हे दाखवून देण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. इंग्लंडने एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद यापूर्वी पटकाविलेले आहे. न्यूझीलंडच्या संघानेही या स्पर्धेत आतापर्यंत पराभव पाहिलेला नाही. ती परंपरा कायम राखण्याची संधी ते साधणार आहेत. उपान्त्य फेरीत त्यांनी भारताला नमविले होते तर साखळीतील सर्व सामने त्यांनी जिंकले होते.

भारतीय संघाच्या पराभवाशी थकव्याचा संबंध नाही - गांगुली
नवी दिल्ली, २० जून / पीटीआय

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ थकव्यामुळे पराभूत झाला अशी चहुबाजूंनी टीका होत असताना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला मात्र तसे वाटत नाही. तो म्हणतो की, दमछाक हे खेळाडूंच्या पराभवाचे कारण नाही. उलट चाहत्यांनी आपल्या खेळाडूंच्या पाठीशी उभे राहायला हवे.

वेस्ट इंडिज संघात डॅरेन ब्राव्हो
किंग्स्टन, २० जून / वृत्तसंस्था

भारताविरुद्ध या महिन्याअखेरीस सुरू होत असलेल्या चार एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर करण्यात आला असून त्यात ड्वेन ब्राव्होचा भाऊ डॅरेन ब्राव्होला संधी देण्यात आली आहे. या मालिकेद्वारे तो प्रथमच विंडीज संघातून खेळणार आहे. संघ - ख्रिस गेल (कर्णधार), दिनेश रामदिन, लिओनेल बेकर, डॅरेन ब्राव्हो, ड्वेन ब्राव्हो, सुलेमान बेन, डेव्हिड बर्नार्ड, शिवनारायण चंदरपॉल, नरसिंह देवनारायण, रुनाको मॉर्टन, रवी रामपॉल, रामनरेश सरवान, जेरोम टेलर.

सायना नेहवाल अंतिम फेरीत
इंडोनेशियन ओपन
नवी दिल्ली, २० जून / पीटीआय

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने चीनच्या लॅन लुविरुद्धची लढत जिंकून जकार्ता येथे सुरू असलेल्या इंडोनेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. सहाव्या मानांकित सायनाने सातव्या मानांकित लु हिच्यावर २५-२३, २१-१९ अशी मात केली. अंतिम फेरीत सायनाची तृतिय मानांकित लिन वांगशी गाठ पडणार आहे. उपान्त्य फेरीत सायनाने जिगरबाज खेळ करीत विजय साकारला. पहिल्या गेममध्ये सायना आणि लु यांच्यात अटीतटीची झुंज झाली. प्रथम १३-१३ अशी बरोबरी आणि नंतर २३-२३ अशी कोंडी झाल्यानंतर अखेर सायनाने आपले वर्चस्व सिद्ध केले. दुसऱ्या गेममध्ये लुने स्वप्नवत कामगिरी करीत ०-५ अशी आघाडी घेतली पण जागतिक क्रमवारीत ८व्या स्थानावर असलेल्या सायनाने १३-१३ अशी बरोबरी करून नंतर २१-१९ अशी बाजी मारली.