Leading International Marathi News Daily

रविवार , २१ जून २००९

विविध

लालगढ पोलीस ठाण्यावर सुरक्षा दलाचा ताबा
पिरकाटा (पश्चिम बंगाल), २० जून/ पीटीआय

माओवाद्यांनी वेढा घातलेल्या लालगढकडे आगेकूच करीत सुरक्षा दल आज लालगढ पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. माओवाद्यांच्या धास्तीने गेल्या अनेक महिन्यांपासून या भागाचा संपर्कच तुटला होता. भूसुरुंग शोघून ते निकामी करणाऱ्या पथकाने सुरक्षा दलासाठी प्रथम हा मार्ग रिकामा केला. त्यानंतर सुरक्षा दलाने पोलीस ठाण्याच्या इमारतीपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले. कारवाईदरम्यान माओवाद्यांकडून फारसा प्रतिकार झाला नाही. आतून बंद केलेल्या पोलीस ठाण्याचा त्यानंतर सुरक्षा दलाने ताबा घेतला.

माओवाद्यांवर बंदी घालण्याचा
विचार- भट्टाचार्य, नवी दिल्ली, २० जून/ पीटीआय

गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या सल्ल्यानुसार भारतीय कम्युनिस्ट पक्षावर (माओवादी) बंदी घालण्याबाबत विचार सुरू असल्याचे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी सांगितले. भट्टाचार्य यांनी आज दिल्लीत पंतप्रधान मनमोहनसिंग आणि केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांची भेट घेऊन, त्यांना लालगढमधील सद्य:स्थितीची कल्पना दिली.

‘गुजकोका’ विधेयकातील सुधारणा मोदींनी फेटाळल्या
नवी दिल्ली, २० जून/पीटीआय
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ‘गुजकोका’ विधेयकात केंद्राने सुचविलेल्या सुधारणा करण्यास सपशेल नकार देऊन, या विधेयकात सुधारणा करणे म्हणजे या प्रस्तावित कायद्याची शक्ती काढून घेतल्यासारखे होईल, असे म्हटले आहे. येथे आजपासून सुरू झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी आले असताना वार्ताहरांशी बोलताना मोदी म्हणाले की, आवश्यकता भासल्यास गुजरात सरकार ‘गुजकोका’ विधेयक पुन्हा राज्य विधानसभेत मांडेल.

रा.स्व.संघ भाजपच्या कुबडय़ांशिवाय चालू शकतो - गोविंदाचार्य
नवी दिल्ली, २० जून / पी.टी.आय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या कुबडय़ांशिवाय सरळपणे चालू शकतो, असे सांगून भाजपने संबंध तोडावेत, असे सांगण्याचे धारिष्टय़ एकेकाळचे भाजपच्या ध्येयधोरण ठरविणारे के. एन. गोविंदाचार्य यांनी आज येथे दाखविले. भाजपच्या सध्याच्या धोरणावर कडाडून टीका करताना त्यांनी पक्षाध्यक्ष राजनाथसिंह हे बेगडी हिंदुत्वाचा वापर करीत असल्याचे सांगून अन्य पक्ष नेत्यंवरही त्यांनी टीका केली. वरूण गांधी यांची निवडणुकीतील भाषणे ही देखील याच प्रकारची प्रतिक्रिया असून ती बेजबाबदारपणे केलेली आहेत व ते काही हिंदुत्व नव्हे असे सांगून सत्तेवर असो वा विरोधी पक्ष म्हणून असो भाजपने हिंदुत्व पाळले नाही, असेही त्यांनी सांगितले. तहलका साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही टीका केली आहे.भाजप हा संधीसाधूंचा पक्ष असून त्यांचे नेते राजकारणात केवळ धंदा म्हणून आले आहेत. त्यांची विचारसरणी केवळ सत्तेभोवती घुटमळणारी आहे, असेही गोविंदाचार्य यांनी सांगितले.