Leading International Marathi News Daily

सोमवार , २२ जून २००९

इंडोनेशियन ओपनचे ऐतिहासिक विजेतेपद
नवी दिल्ली, २१ जून / पीटीआय

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने आज पुन्हा एकदा इतिहास घडविला. ऑलिम्पिकच्या उपान्त्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारणाऱ्या सायनाने इंडोनेशियन ओपन स्पर्धेत आपल्यापेक्षा सरस मानांकन असलेल्या चीनच्या लिन वांगला नमवून विजेतेपद पटकाविले. सुपर सिरीजची स्पर्धाजिंकणारी सायना ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली आहे.
सायनाने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत वांगवर १२-२१, २१-१८, २१-९ अशी मात केली. ४९ मिनिटे चाललेल्या अटीतटीच्या सामन्यात सायनाने पहिला गेम गमावला होता, पण अखेर तिने बाजी उलटवित स्पर्धा जिंकली.

‘पाक’ विजय
श्रीलंकेला ८ विकेट्सनी नमवून पाकिस्तान विश्वविजेता
शाहिद आफ्रिदी सामनावीर ’ दिलशान स्पर्धेत सर्वोत्तम
लंडन, २१ जून / वृत्तसंस्था

दहशतवादामुळे पोखरलेल्या, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून अलग पडलेल्या पाकिस्तानला ज्या दिलासा देणाऱ्या, आत्मविश्वास उंचावणाऱ्या, देशातील प्रत्येकाच्या आयुष्यात अशा कठीण परिस्थितीतही आनंदाचे चार क्षण देणाऱ्या विजयाची गरज होती, तो विजय त्यांना लॉर्ड्सवर गवसला. ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेला ८ विकेट्सनी पराभूत करीत पाकिस्तानने विश्वचषकाला कवटाळले. विश्वविजयाचे ‘पाक’ आणि तेवढेच बुलंद इरादे मनात ठेवून मैदानात उतरलेल्या पाकिस्तानचे स्वप्न अखेर पूर्ण झाले.

एकमेकांवर दोषारोप करणे थांबवा - अडवाणी
हुसैन-नकवी यांची मनेकांशी शाब्दिक खडाजंगी
देशव्यापी दौरा करण्याची अडवाणी यांची घोषणा
भाजप कार्यकारिणी अधिवेशनाचे सूप वाजले
नवी दिल्ली, २१ जून/खास प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकांतील पराभवानंतर खदखदणाऱ्या असंतोषाच्या पाश्र्वभूमीवर सुरु झालेल्या भाजपच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मनेका गांधी आणि मुख्तार अब्बास नकवी यांच्यात उडालेल्या तीव्र खडाजंगीमुळे अंतर्गत कलहाने कळस गाठला. आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या या बैठकीचा समारोप करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचे कोणतेही संकेत दिले नाही. उलट जनतेत जाऊन पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी येत्या काही महिन्यात आपण पुन्हा देशव्यापी दौरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

रेल्वे स्टेशनवर दहा रुपयांत पुरीभाजी!
नवी दिल्ली, २१ जून/पीटीआय

रेल्वेला मानवी चेहरा देण्याचा वज्रनिर्धार करणाऱ्या ममतादीदींनी धडाक्याने निर्णय घेण्यास सुरुवात केली असून, त्याचाच एक भाग म्हणून रेल्वेच्या सर्व विभागांतील रेल्वेस्थानकांवर लवकरच किफायतशीर दरात म्हणजे केवळ दहा रुपयांत पुरीभाजी उपलब्ध करून दिली जाणार आहे. पुरीभाजीची ही पॅकेट्स लवकरच स्थानकांवर दिसू लागतील. विशेष म्हणजे ही पुरीभाजी गलिच्छ ठिकाणी तयार केली जाणार नसून, स्वच्छ अशा स्वयंपाकघरांमध्ये तयार केली जाणार आहे.अगोदर रेल्वेस्थानकांवरच गलिच्छपणे हे सगळे अन्नपदार्थ तयार केले जात होते, आता तसे होणार नाही. सर्व विभागीय अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना देण्यात आल्या असून, दहा रुपयांत पुरीभाजी रेल्वेस्थानकावर उपलब्ध करून द्यावी, असे सांगण्यात आले आहे. या फूड पॅकेटमध्ये सात पुऱ्या व बटाटय़ाची भाजी दिली जाईल व लोणचेही असेल. हे जनता जेवण म्हणूनही प्रसिद्ध आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

नुसतीच हजेरी!
मुंबई, २१ जून / प्रतिनिधी
शनिवारी असलेले ढगाळ वातावरण, मुंबईच्या काही उपनगरांसह ठाणे, कल्याण, डोंबिवली आदी परिसरात झालेला हलका ते मध्यम पाऊस यामुळे तमाम मुंबईकरांना आता रविवारी पाऊस येणारच, अशी खात्री वाटत होती. मात्र पावसाने मुंबईकरांना हूल दिली. दिवसभराच्या ढगाळ वातावरणानंतर सायंकाळी शहर परिसरात पावसाचा शिडकावा झाला. मुंबईकरांना आता पावसाचा शिडकावा नको आहे, त्यांना प्रतिक्षा आहे ती वाजत, गाजत आणि गर्जत येणाऱ्या जोरदार पावसाची. दरम्यान मान्सून अलिबागपर्यत येऊन पोहोचला असून पुढील २४ ते ४८ तासात तो मुंबई व उपनगरात दाखल होईल, असे वेधशाळेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

पराभवाचा अहवाल कपोलकल्पित कटकारस्थान उदयनराजेंनी पक्षशिस्तीच्या चौकटीत काम करावे -आर. आर.
सातारा, २१ जून/प्रतिनिधी
राष्ट्रवादीच्या पराभवाचा अहवाल हे कपोलकल्पित कटकारस्थान आहे. पक्षाने कोणतीही समिती नेमलेली नाही. उदयनराजेंनी पक्षशिस्तीच्या चौकटीत काम करावे, पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले व निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीचे चालवलेले गुऱ्हाळ व घातलेला घोळच राष्ट्रवादीच्या पराभवास कारणीभूत असल्याचे सांगितले. उदयनराजे यांना राष्ट्रवादीमध्ये घेतले. त्यांची भूमिका पक्षाला तारक आहे की मारक, याबाबत विचारले असता आर. आर. पाटील म्हणाले, की आता तरी तारक असल्याचे सिद्ध झाले आहे. आणखी काम केले तर भविष्यातही तारक ठरेल अशी अपेक्षा आहे. वैयक्तिक मते मांडण्याचे पक्षांतर्गत पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यासाठी पक्षाचे व्यासपीठ आहे. त्याबाहेर जाऊन कुणी पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू नये.

९०:१० कोटय़ाच्या समर्थनार्थ पालक-शिक्षक संघटनेचीही याचिका
मुंबई, २१ जून / प्रतिनिधी
अकरावी प्रवेशासाठी ९०:१० कोटा लागू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर सीबीएसई व आयसीएसईच्या पालकांनी उच्च न्यायालयात या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. परंतु, ९०:१० कोटय़ाचा निर्णय योग्य असल्याने या कोटय़ाच्या समर्थनार्थ पालक-शिक्षक संघटनेच्या वतीने उद्या, सोमवारी याचिका दाखल करण्यात येणार आहे. राज्य सरकारनेही यापूर्वीच न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. राज्य शिक्षण मंडळ, आयसीएसई व सीबीएसई या तिन्ही मंडळांची विषय पद्धत, परीक्षा पद्धत, अभ्यासक्रम, गुणदान योजना यांमध्ये मोठा फरक आहे.

लालगढ मोहीम फत्ते आता स्वारी रामगढवर
लालगड, २१ जून/पीटीआय
लालगढ येथील महत्त्वाचे पोलीस ठाणे काबीज केल्यानंतर सुरक्षा दलांनी आज आणखी खोलवर मुसंडी मारली. माओवाद्यांनी त्यांचे बालेकिल्ले समजल्या जाणाऱ्या सुमारे १७ खेडय़ांना वेढा दिला असून, तेथील आदिवासींचा त्यांना पाठिंबा असल्याचे बोलले जाते. हा वेढा मोडून काढण्यासाठी आता सुरक्षा दलांचे जवान प्रयत्नशील आहेत. सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितले, की केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल व पश्चिम बंगाल पोलीस यांनी लालगढ येथून रामगढकडे कूच करायला सुरुवात केली आहे. इतर सतरा खेडय़ांकडे जाणारे रस्ते मोकळे करण्यासाठी मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. या खेडय़ांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर माओवाद्यांनी अडथळे निर्माण केले आहेत.

गोराई खाडीत नौका उलटून तिघे तरुण बेपत्ता
मुंबई , २१ जून / प्रतिनिधी
मासेमारीसाठी गेलेली नौका बोरिवली येथील गोराई खाडीमध्ये उलटून त्यातील तीन तरूण बेपत्ता झाले , तर नऊ तरूणांना वाचविण्यात जीवरक्षक आणि अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. पोलीस उपायुक्त संजय बॅनर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार , २० ते २५ वयोगटातील १२ तरुण रविवार असल्याने सकाळी गोराई खाडीमध्ये मासेमारीसाठी गेले होते. मात्र दुपारी पावसाळी वातावरणामुळे उसळलेल्या लाटांनी त्यांची नौका उलटली व सर्व तरुण त्यात अडकले. त्यानंतर काही वेळाने जीवरक्षक आणि अग्निशमन दलाला घटनेविषयी माहिती मिळाली व बचावकार्याला सुरूवात झाली. सायंकाळी उशिरा १२ पैकी नऊ तरुणांना वाचविण्यात जीवरक्षक आणि अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र तीन तरुणांचा अद्याप शोध लागलेला नाही. बेपत्ता झालेल्यांमध्ये महेश (२४) आणि परेश पागे (२४) या दोन भावासह विजय पागे (३०) या त्यांच्या नातेवाईकाचा समावेश आहे. विजयला पोहता येते परंतु महेश आणि परेश या दोघा भावांना पोहता येत नाही , असे वाचविण्यात आलेल्या तरुणांनी सांगितल्याचे बॅनजी म्हणाले. रात्री उशिरापर्यंत या तिघांना शोधण्याचे काम सुरू होते.

 


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी