Leading International Marathi News Daily

मंगळवार, २३ जून २००९

माओवादी हे दहशतवादीच
सीपीआय माओवादी संघटनेवर केंद्र सरकारची बंदी
नवी दिल्ली, २२ जून/खास प्रतिनिधी
भाकप (माओवादी) या नक्षलवादी संघटनेवर बंदी घालण्याच्या मुद्यावर द्विधा मनस्थितीत सापडलेल्या पश्चिम बंगाल सरकारची प्रतीक्षा न करता आज केंद्र सरकारने ही संघटना दहशतवादी असल्याचे जाहीर करून तिच्यावर बंदी घातली. बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायद्याखाली भाकप(माओवादी) वर बंदी घालण्याची अधिसूचना आज गृह मंत्रालयाने काढली. अशा बंदीमुळे काहीही साध्य होणार नसल्याचे माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी म्हटले आहे.

डावे सर्वच स्तरांवर अपयशी ठरले-करात
नवी दिल्ली, २२ जून/खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांदरम्यान केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दारुण पराभवाचे प्रामाणिक विश्लेषण करताना माकपने सर्वसामान्यांशी संबंधित उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार, महापालिका आणि पंचायती अपयशी ठरल्याची स्पष्ट कबुली दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये डाव्या आघाडीला राजकीय, सरकारी आणि संघटनात्मक कारणांमुळे तर केरळमध्ये मुख्यमंत्री अच्युतानंदन आणि पिनरायी विजयन यांच्यातील संघर्षांमुळे डाव्या आघाडीचा पराभव झाल्याचे आज माकपच्या सर्वोच्च अशा केंद्रीय समितीने नमूद केले आहे. अणुकरारावरून केंद्रातील युपीए सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या निर्णयाचेही माकपने ठाम समर्थन केले आहे.

‘देशाच्या नेतृत्वासाठी महाराष्ट्राने न्यूनगंड सोडणे आवश्यक’
‘माझा महाराष्ट्र २०२०’ परिसंवादात डॉ. काकोडकरांचे प्रतिपादन
मुंबई, २२ जून / प्रतिनिधी
देशात आतापर्यंत महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये अग्रेसर राहिला असून भविष्यातही हे स्थान कायम राहील. त्यासाठी आवश्यक असणारी वैचारिक क्षमता महाराष्ट्रात असली तरी राज्यातील जनतेला न्यूनगंड सोडावा लागेल, असे मत अणूऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी आज व्यक्त केले. ‘स्टार माझा’ या वाहिनीच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त ‘माझा महाराष्ट्र २०२०’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन काकोडकर यांच्या हस्ते झाले. चर्चासत्रात लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख, भाजपचे सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर, कृषीमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजू शेट्टी, डॉ. विजय भटकर, अतुल देऊळगावकर आणि मधुकर चैनी आदी सहभागी झाले होते.

११वी प्रवेशाआधी ९०:१० चा फैसला!
मुंबई, २२ जून/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा (एसएससी) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ११वीच्या प्रवेशांमध्ये ९० टक्के जागा राखून ठेवण्याच्या राज्य सरकारच्या वादग्रस्त निर्णयाच्या विरोधात केल्या गेलेल्या याचिकांवर उच्च न्यायालयात येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे. इयत्ता १०वीचा निकाल गुरुवार दि. २५ जून रोजी लागणार आहे. त्यामुळे इयत्ता ११ वीचे प्रवेस दिले जाण्यापूर्वीच न्यायालयात या वादाचा निर्णय लागेल, अशी अपेक्षा आहे.

‘रेडिओ कॉलरिंग’ प्रणालीकडे वन विभागाचे साफ दुर्लक्ष
राखी चव्हाण
नागपूर, २२ जून

राज्यातील असंरक्षित वन क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक ‘रेडिओ कॉलरिंग’ तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करणे अनिवार्य झाले असताना महाराष्ट्राचा वन विभाग या महत्त्वाच्या गरजेकडे काणाडोळा करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशातील इतर राज्ये ‘रेडिओ कॉलरिंग’ प्रणालीचा वापर करून मानव-वन्यप्राणी यांच्यातील संघर्षांची तीव्रता कमी करण्याच्या प्रयत्नात असताना महाराष्ट्रात अद्यापही या प्रणालीसाठी एकाही वन अधिकाऱ्याने शिफारस केलेली नाही, ही धक्कादायक बाबही यानिमित्ताने उघड झाली आहे.

बिबळ्याला दगडांनी ठेचून मारले
यवतमाळ, २२ जून / वार्ताहर

मानवी वस्तीत घुसलेल्या बिबळ्याला गावकऱ्यांनी दगडांनी ठेचून मारल्याची घटना येथे घडली. जखमी अवस्थतेतील बिबळ्या आपले प्राण वाचविण्यासाठी एका झाडावर चढला पण तेथेच त्याचा मृत्यू झाला. हा बिबळ्या नीलेश हिरामण आडे याने पाहिला. त्याने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी प्रतिकार केल्याने बिबळ्या जंगलाच्या दिशेने पळून गेला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बिबळ्याला पकडण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांनीही बिबटय़ावर दगडांचा मारा केल्याने तो जबर जखमी झाला. त्याही स्थितीत तो झाडावर चढला आणि तेथेच मरण पावला. वन कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशी या बिबटय़ाचा मृतदेह झाडावर आढळला. त्याचे वय अंदाजे तीन वर्षांचे असावे. बिबटय़ाच्या मृत्यूचे नेमके कारण वन विभागाने अद्याप दिलेले नाही. तो पाण्याअभावी तडफडून मरण पावल्याचे वृत्त पोहोचवण्यात आले. नंतर बिबळ्याला गावकऱ्यांच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागल्याचे सांगण्यात आले.

स्वाईन फ्लूचे आणखी तीन रूग्ण सापडले
नवी दिल्ली, २२ जून / पी.टी.आय.
देशभरात सर्वत्र स्वाइन फ्लूच्या प्रतिबंधासाठी आवश्यक औषधे पुरविल्याचा दावा सरकारने केला असला तरी, आज या रोगाचा संसर्ग झालेले तीन संशयित रुग्ण आढळून आले. आता देशातील स्वाईन फ्लू रूग्णांची संख्या वाढली आहे. नवी दिल्लीमध्ये दोन, तर कर्नाटकातील बंगळुरु येथे एक संशयित रुग्ण आढळला असून, त्यांच्या तपासणीचे अहवाल अद्याप हाती यायचे आहेत. त्या तिघांवर उपचार सुरू आहेत. देशभरात आतापर्यंत स्वाइन फ्लूचे ६३ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३२ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. ‘‘या रुग्णांवरून स्वाइन फ्लू हा बरा होणे शक्य असल्याचे प्रतीत होते. त्यामुळे भीतीचे कारण नाही,’’ असे आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?
नवी दिल्ली, २२ जून/पीटीआय
आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या किमती काही प्रमाणात वाढल्याने पेट्रोलचे दर लीटरला दोन रुपयांनी तर डिझेलचे दर एक रुपयाने वाढवण्याचा सरकारचा विचार आहे, असे असले तरी या दोन्ही इंधनांवरचा अबकारी कर कमी करण्यात आला तर ग्राहकांची या संभाव्य दरवाढीतून सुटका होऊ शकेल. सध्याच्या दरपातळीचा विचार करता इंडियन ऑईल, हिंदूुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम या सरकारी कंपन्यांना पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस व केरोसिन यांच्या विक्रीतून दिवसाला १३५ कोटी रुपयांचा तोटा होत आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षांत महसुली तोटा ३८,७०० कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे. सध्या पेट्रोलच्या दर लीटरला ६ रु. ०८ पैसे, डिझेलच्या दर लीटरला २ रुपये ९६ पैसे तोटा होत आहे. या तोटय़ात पेट्रोलसाठी लीटरला दोन रुपये, डिझेलसाठी लीटरला १ रुपया इतका बोजा ग्राहकांवर टाकावा असे मंत्रालयाला वाटते. तोटय़ाचा उर्वरित भाग सरकारी रोखे, अनुदान यातून भरून काढावा, असा एक प्रस्ताव आहे.

 


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी