Leading International Marathi News Daily

मंगळवार, २३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

देवदासींचे कासारवाडी येथे रास्ता रोको
पिंपरी, २२ जून / प्रतिनिधी

 

महाराष्ट्र शासनाने निराधार (विधवा)महिलांना मासिक दोन हजार रुपये अनुदान द्यावे, संजय गांधी निराधार योजनेतील जाचक अटी रद्द करुन महिलांना आयुष्यभर पेन्शन द्यावी, देवदासी महिलांचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांना दरमहा दोनशे रुपये अनुदान देण्याची अर्थसंकल्पात वेगळी तरतुद करावी, तसेच दारिद्र रेषेखालील निराधार व देवदासी, अपंग, अंध महिलांना पिवळे रेशन कार्ड द्यावे आदी मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड शहरातील देवदासींनी आज सकाळी नाशिकफाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले.
राज्यातील उपेक्षित व निराधार देवदासींच्या सामाजिक व आर्थिक प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र निराधार महिला संघटना व महाराष्ट्र देवीदासी महिला संघटनांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काही काळ महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती.
विलासभाऊ रुपवते प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेशी संलग्न असलेल्या निराधार व देवीदासी संघटनांच्या भोसरी शहराध्यक्षा अफसाना चाँद शेख यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात शहर परिसरातील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या घोषणांनी हा परिसर दणाणून गेला होता. शहापूर पोलीस ठाणे हद्दीत १३ एप्रिल २००९ रोजी संघटनेचे संस्थापक विलास रुपवते व कार्याकर्त्यां लत्ताताई सकट यांच्या वाहनास झालेल्या अपघाताची सखोल चौकशी करुन गुन्हेगारास कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली.
दारिद्र रेषेखालील निराधार व देवदासी, अपंग, अंध महिलांना पिवळे रेशन कार्ड द्यावे, तसेच त्यांना अंत्योदय योजनाचा फायदा द्यावा. ज्या महिलांचे पती मयत झाले त्यांना मृत्यूच्या दाखल्याशिवाय शिधापत्रिका मिळावी, त्यांच्यासाठी रॉकेलचा दर प्रतिलिटर नऊ रुपये असावा अशाही मागण्या आंदोलक देवदासी महिलांनी केल्या.