Leading International Marathi News Daily
रविवार, २१ जून २००९

अनंतहस्ते मिळेल
राशिस्थानी शुक्र, मंगळ, लाभात गुरू, पंचमात शनी, पराक्रमी सूर्य. दैव द्यायला लागले म्हणजे अनंतहस्ते कसे देते, याचा प्रत्यय अशाच ग्रहकाळात येतो. रविवारच्या शुक्र-मंगळ युतीपासून मेष व्यक्ती व्यापार, कला, विज्ञान, शिक्षण क्षेत्रात आघाडीवर येऊ लागतील. अचानक प्रवास होतील. हवामानाच्या परिणामांनी वेळापत्रकात बदल होऊ शकतो; पण यशाचे गणित त्यामुळे चुकणार नाही.
दिनांक : २१ ते २४ शुभकाळ.
महिलांना : श्रेष्ठत्व सिद्ध करणारा ग्रहकाळ आहे.

अपेक्षित उत्तरास विलंब
चतुर्थात शनी, व्ययस्थानी शुक्र, मंगळ, हवामानात दोष यामुळे निर्णय कृतीमधून अपेक्षित उत्तर अगदी सहज येऊ शकणार नाही; परंतु दशमातील गुरू, भाग्यांत राहू प्रतिष्ठा मजबूत ठेवतील. नियमित उपक्रमांना धक्का बसणार नाही. अवास्तव खर्च, आश्वासन, साहस कटाक्षाने टाळा. राशिस्थानचा बुध समस्यांच्या गर्दीतून बाहेर काढेल. शनिवारचा चंद्र-रवी शुभयोग त्यात सहभागी असल्याने पुढे चालत राहा.
दिनांक : २२ ते २६ शुभकाळ.
महिलांना : प्रयत्न करा, प्रगती होईल.

यश-क्रांतीचे पर्व
राशिस्थानी सूर्य, भाग्यात गुरू, लाभात शुक्र, मंगळ, पराक्रमी शनी. दीर्घकालीन लाभणारी एवढी अनुकूल ग्रहस्थिती विचार- निर्णय- कृती यांमधून यश- क्रांती घडवून आणणारी ठरली तर आश्चर्य ठरू नये. सोमवारच्या मंगळ-शनी नवपंचम योगाच्या आसपास याचा बऱ्याच विभागातील मिथुन व्यक्तींना प्रत्यय येईल. व्यापार, राजकारण, विज्ञान, शिक्षण अशा विभागातील व्यक्तींचा त्यात समावेश राहील. कला साहित्यात नवे करार प्रभाव वाढवतील. विदेश प्रवास संभवतो.
दिनांक : २२ ते २६ शुभकाळ.
महिलांना : हा ग्रहकाळ श्रेष्ठत्व सिद्ध करेल.

प्रयत्न-कल्पकता यांतून यश
साडेसाती, अष्टमात गुरू, व्ययस्थानी सूर्य यांच्यातील अनिष्टता बुध, शुक्र, मंगळ, राहू यांच्या आधाराने नियंत्रणात आणून कल्पकता-प्रयत्न यांमधून यश मिळवावे लागणार आहे. रविवारच्या शुक्र-मंगळ युतीची प्रतिक्रिया त्यामध्ये सहकार्य करणार असल्याने व्यापार, राजकारण, कला, साहित्य यामध्ये इभ्रत सांभाळणारी सफलता मिळवता येईल. नवीन प्रस्तावावर घाईगर्दीत कृती नको.
दिनांक : २१, २५, २६, २७ शुभकाळ.
महिलांना : संधी साधा, पण साहस नको.

यशस्वी व्हाल
भाग्यात शुक्र, मंगळ, लाभात सूर्य, दशमात बुध, सप्तमात गुरू. साडेसातीच्या अशुभ परिणामांना रोखून यावेळी सिंह व्यक्ती अनेक क्षेत्रांत यशस्वी ठरणार आहेत. रविवारच्या शुक्र-मंगळ युतीपासूनच नवे प्रस्ताव, अभिनव उपक्रम, नवे करार, बडय़ा मंडळींशी बैठका यातून याचा प्रत्यय येत राहील. व्यापारी घडी बसेल. शेतीची प्रकरणे मार्गी लागतील. श्रीमारुतीची उपासना-आराधना मन:शांतीची ठरावी.
दिनांक : २१ ते २४ शुभकाळ.
महिलांना : प्रतिमा उजळेल.

अटीतटीचा काळ
साडेसातीची अनिष्टता अष्टमातील शुक्र, मंगळाच्या काळात प्रखर होते आणि काही प्रसंग अटीतटींवर पोहोचतात. संयम आणि सत्य यांचा उपयोग केला तर सूर्य, बुध, राहू यांचं सहकार्य अटीतटीचं रूपांतर आपत्तीत होऊ देणार नाहीत आणि प्रतिष्ठा मजबूत राहील. दुसऱ्यांवर विश्वासून कृती कटाक्षाने टाळा, प्रकृती सांभाळा, आश्वासनात फिरवाफिरव करू नका. चंद्रभ्रमणाचे प्रतिसाद नैराश्य येऊ देणार नाही.
दिनांक : २१ ते २६ याची प्रचीती यावी.
महिलांना : अडचणीतून मार्ग शोधावे लागतील.

प्रवासाला वेग येईल
पंचमात गुरू, लाभात शनी, सप्तमात शुक्र- मंगळ यांचे शुभ परिणाम रविवारच्या शुक्र-मंगळ युतीपासूनच सुरू होतील आणि तुला व्यक्तींच्या कार्यपथावरील प्रवासाला अचानक वेग येईल. घेतलेले निर्णय, केलेली कृती, सुरू असलेले संपर्क यश निश्चित करीत राहतील. त्यातून नवीन उद्योग उभा करता येईल. सत्ता प्रबळ करू शकाल, प्राप्ती व्यापक होऊ शकेल. कृषीप्रयोग तर पंचक्रोशीत गाजतील. मंगळ-शनी नवपंचम योग शोधकार्यात अपूर्व यशाचा ठरतो.
दिनांक- २२ ते २६ शुभकाळ
महिलांना- प्रपंचात खूश राहाल.

प्रतिष्ठा मजबूत होईल
चतुर्थात गुरू, अष्टमात सूर्य आणि शुक्र-मंगळाची नाराजी- याच ग्रहांमुळे प्रयत्न-यश यांचा समन्वय घडय़ाळाच्या काटय़ांशी साधता येणार नाही. अनुकूल शनी-राहू प्रतिष्ठेला व या अशुभ परिणामांना स्पर्श करू देणार नाही. परंतु प्रत्येक पाऊल टाकताना, शब्द देताना रागरंग बघावा. परिस्थितीचा आवर्जून विचार करा. घाईगर्दी अडचणीत आणणारी ठरू शकते. त्यामुळे कोणतेही काम घाईगर्दीत उरकण्याच्या मागे लागू नका. मात्र तुमच्या नियमित उपक्रमांना समस्यांपासून दूर ठेवण्यात तुम्ही नक्कीच यशस्वी ठरणार आहात. त्यात मंगळ-शनी नवपंचम योगाचे सहकार्य खूपच उपयुक्त ठरेल.
दिनांक- २१, २५, २६, २७ शुभकाळ
महिलांना- समस्यांच्या गर्दीतून हुशारीने बाहेर पडता येईल. त्यामुळे विनाकारण काळजी करण्याचे कारण नाही. सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडता येतील.

कार्य चमत्कार घडवील
पराक्रमी गुरू, भाग्यात शनी, पंचमात शुक्र- मंगळ, सप्तमात सूर्य. शब्दांचा प्रभाव, अचूक निर्णय, प्रयत्नाचा वेग यातून धनू व्यक्तींचे कर्तृत्व समाजात उजळून निघावे अशा घटना घडतील. रविवारच्या शुक्र-मंगळ युतीपासून याची प्रचीती दृष्टिपथात येईल. न्याय, विज्ञान, शिक्षण, संगीत, साहित्य यांमध्ये चमत्कार घडावा असे कार्य उभे राहणे शक्य आहे. परमेश्वरी चिंतनातून आनंद मिळेल. अचानक प्रवास होतील. समाजातील बलवान प्रभृतींच्या भेटी होतील. त्यातून वेगळाच आनंद अनुभवाल. कृषिकार्यातून आनंद मिळेल. मनासारखी कामे होतील.
दिनांक- २२, २३, २४, २७ शुभकाळ.
महिलांना- प्रपंच आकर्षक कराल.

प्रभाव निर्माण कराल
गुरूची कृपा, राहूचे सहकार्य, बुध पंचमात, षष्ठात सूर्य याच ग्रहांमुळे शनी-मंगळाची अनिष्ट प्रक्रिया नियंत्रित करून मकर व्यक्तींना अनेक क्षेत्रांत प्रभाव निर्माण करता येईल. तुमच्या शत्रूंशी यशस्वीपणे सामना करू शकाल. तुमची बौद्धिक क्षेत्रातील सफलता अविस्मरणीय ठरावी अशीच असेल. चतुर्थातील शुक्र प्रपंचात प्रसन्न ठेवतो. मिळकतीच्या समस्या सोडवता येतील. मात्र आरोग्य आणि अधिकार या संबंधात दुर्लक्ष करू नका. प्रवास होतील.
दिनांक- २१, २५, २६ शुभकाळ.
महिलांना- प्रगतीची गणिते यशस्वीपणे सोडवाल.

वेगवान घटना घडतील
राशिस्थानी गुरू, पराक्रमी शुक्र-मंगळ, पंचमात सूर्य ही प्रगतीचा आलेख आकर्षक करणारी ग्रहस्थिती आहे. सोमवारच्या मंगळ-शनी नवपंचम योगापासून कार्यप्रांतातील घटना वेगवान होऊ लागतील. शुक्र- मंगळ युती कर्तृत्वाला उत्थान देईल आणि अर्थप्राप्ती बलवान करणारी ठरेल. बुध चतुर्थात, राहू व्ययस्थानी असल्याने जवळच्या मंडळींच्या कुरबुरीने अस्वस्थ व्हाल, परंतु प्रगतीवर कुरबुरींचा परिणाम होणार नाही. परमेश्वरी चिंतनातून आनंद मिळेल.
दिनांक- २२, २३, २४, २७ अनुकूल काळ
महिलांना- मोठी झेप यश देईल. कर्तृत्व उजळून निघेल.

प्रश्नांची उत्तरे सापडतील
चतुर्थात सूर्य, षष्ठात शनी आणि व्ययस्थानी गुरू. याच ग्रहांमुळे मीन व्यक्तींच्या भोवती नव्या नव्या प्रश्नांची संख्या वाढत राहणार आहे. परंतु रविवारची शुक्र-मंगळ युती, पराक्रमी बुध, लाभात राहू आपणास सहकार्य करीत असल्याने प्रश्नांची उत्तरे शोधण्यात यशस्वी ठरणार आहात. संयम, शिस्त, सत्य आणि प्रार्थना यांच्यापासून दूर जाऊ नका. कारण यामुळेच तुम्हाला तुमच्या मार्गक्रमणात यश पक्के करता येईल. व्यापारी प्रतिष्ठा सांभाळता येईल. प्रवास कराल. राजकीय गैरसमज दूर करता येतील.
दिनांक- २१, २५, २६ शुभकाळ
महिलांना- निर्धार आणि कृती यांचा समन्वय यश देणारा आहे.