Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘टेन्गशेच्या स्वप्नात ट्रेन’!

 

‘काही वर्षांपूर्वी मुंबईत एका मतिमंद मुलीवर ट्रेनमध्ये बलात्कार झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीनं सर्वत्र खळबळ माजली होती. मीही ती बातमी वाचून भयंकर अस्वस्थ झालो होतो. पुढे ही घटना बराच काळ माझा पाठलाग करत राहिली. त्यावर आधारीत ‘टेन्गशेच्या स्वप्नात ट्रेन’ नावाची एक कथा मी २००२ सालच्या एका दिवाळी अंकात लिहिली होती. प्रा. सिद्धिविनायक टेन्गशे हा ४५ वर्षांचा मध्यमवर्गीय प्राध्यापक या कथेचा नायक होता. अर्थातच तो बुद्धिजीवी होता. कथा, लेख वगैरे लिहायचा. परंतु त्याचं हे बुद्धिजीवीपण निष्क्रिय होतं. त्या मुलीवर बलात्कार होत असताना घटनास्थळी हजर असलेल्यांपैकी कुणीच हे कृत्य करणाऱ्या नराधमाला विरोध करण्याचं धाडस केलं नव्हतं.. करू धजले नव्हते. टेन्गशे हाही त्याच गर्दीचा एक भाग होता. बलात्काराचं कृत्य कसं अमानुष आहे, यावर सगळेचजण तावातावाने चर्चा करतात, परंतु प्रत्यक्षात ती घटना घडत असताना टेन्गशे किंवा त्यावेळी त्या लोकल डब्यामध्ये असलेल्या मध्यमवर्गीय गर्दीपैकी एकहीजण त्या बलात्काऱ्याला रोखण्यासाठी पुढे येत नाही. अशा घटनेनंतर नुसतीच हळहळ आणि वांझोटा संताप व्यक्त करण्यापलीकडे आपला समाज काहीच करत नाही. कालांतरानं ती घटना लोकांच्या विस्मृतीतही जाते. या घटनेच्या निमित्तानं ट्रेनचं रूपक घेऊन बुद्धिजीवी मध्यमवर्गाच्या नाकर्तेपणावर, सामाजिक-राजकीय निष्क्रियतेवर आणि आजच्या गुंतागुंतीच्या भयाण वास्तवावर भाष्य करण्याचा प्रयत्न मी या कथेतून केला होता.’ .. नाटककार जयंत पवार ‘टेन्गशेच्या स्वप्नात ट्रेन’ची जन्मकथा सांगत असतात.
‘टेन्गशेची ही कथा पुण्यातील ‘समन्वय’ या प्रायोगिक नाटय़संस्थेच्या शशांक शेंडे यांना मी वाचायला दिली. त्यांना ती आवडली. त्यांना त्या कथेत नाटकाचं बीज दिसत होतं. अर्थात कथा लिहीत असताना मला मात्र त्यात ‘नाटक’ दिसलं नव्हतं. किंवा त्यावर नाटक लिहिता येऊ शकेल असंही तेव्हा वाटलं नव्हतं. शशांक शेंडे मग वर्ष- दीड वर्ष या कथेवर विचार करत होते. ‘समन्वय’च्या ग्रुपमधील चाळीसेक तरुण कलावंतांसमोर त्यांनी कथेची अनेकदा वाचनं केली. या नाटय़वाचन प्रक्रियेत सहभागी झालेल्या कॉलेज-तरुणांनी आपापल्या परीनं त्यावर बरंच विचारमंथन केलं. ही मंडळी चांगलं साहित्यवाचन करणारी होती. टेन्गशेच्या कथेचे त्यांनी अनेक अन्वयार्थ लावले. त्यातून त्यांना धूसरसं नाटय़ही खुणावू लागलं. त्या सर्वानी या कथेचं इम्प्रोव्हायझेशन करून दीर्घाक सादर करायचं ठरवलं. कथेतील काही भागाचं इम्प्रोव्हायझेशन करत त्यांनी ‘टेन्गशेच्या स्वप्नात ट्रेन’ नाटक साकारायला सुरुवात केली. परंतु नाटकात ते वापरू बघत असलेला वास्तववादी दृष्टिकोन इथे कामाचा नव्हता. ही मंडळी कथेचा तार्किकरीत्या विचार करीत होती. परंतु कथेचा विषय मात्र अ‍ॅब्सर्डिटीची मागणी करणारा होता. मी त्यांच्या इम्प्रोव्हायझड् केलेल्या तालमी पाहिल्या आणि मला त्यातला गोंधळ ध्यानी आला. मात्र हा विषय त्यांना योग्य तऱ्हेनं कळलाय, हेही त्या तालमींतून जाणवत होतं. दिग्दर्शक शशांक शेंडे यांना मला काय म्हणायचंय, हे व्यवस्थित कळलेलं होतं. माझी-त्यांची त्या अर्थानं वेव्हलेंन्ग्थ जुळलीय, हेही मला जाणवलं. त्यांनी माझ्याही कल्पनेत नसलेल्या अनेक गोष्टी नाटकात वर्कआऊट केल्या होत्या. ज्यांच्या आधारे मला नाटय़संहिता लिहून देणं शक्य आहे, हे माझ्या लक्षात आलं. नाटकातील आशय-विषयाला योग्य दिशा देण्यासाठी त्यांना नाटक लिहून देणं मला गरजेचं वाटलं. आणि मग ही दीड तासाची संहिता आकाराला आली. ही प्रोसेस होताना कथा फोडून नवं काही त्यात मला अंतर्भूत करावं लागलं. त्यामुळे नाटक कथेपेक्षा खूपच वेगळं झालेलं आहे.’
‘मला स्वत:ला लहान असल्यापासून ट्रेनबद्दल भीतीयुक्त आकर्षण वाटत आलेलं आहे. या कथेतल्या (आणि नाटकातल्यासुद्धा!) प्रा. टेन्गशे यांनाही वयाच्या पाचव्या वर्षांपासून सतत स्वप्नात ट्रेन येत असते. आज ते पंचेचाळीशीचे आहेत. म्हणजे गेली ४० वर्षे ते ट्रेनचं हे स्वप्न पाहत आलेले आहेत. त्यांचे वडील मोटरमन होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांचा ट्रेनशी संबंध आहे. मात्र, त्यांना आता समजत नाहीए, की आपण गेली ४० वर्षे ट्रेनचं एकच एक स्वप्न सलगपणे पाहतोय, की ट्रेनची वेगवेगळी स्वप्नं आपल्याला वेळोवेळी पडत आलीयेत? मी कथेत ट्रेनचा रूपक म्हणून वापर केलाय.
अनेक वृत्ती-प्रवृत्तींची, निरनिराळ्या मानसिकतेची, विविध भावभावना, इच्छा-आकांक्षा, स्वप्नं उराशी कवटाळून प्रवास करणारी ट्रेनमधली माणसं.. त्यांचे हर्ष-खेद, राग-लोभ, त्यांच्यातील गुण-दोष, त्यांच्या ठायीचे विकार-वासना यांच्या सरमिसळीतून जगण्याचं हे रहाटगाडगं अखंड सुरू आहे. त्यांचं वास्तवातलं जगणं आणि त्यांची स्वप्नं यांचा कुठं मेळ बसतो का, असा प्रश्न मला नेहमी पडतो. ट्रेन हे माणसाच्या आयुष्याचं प्रतीक आहे. आपल्या आयुष्यावर माणसाचा ताबा नाही. काही वेळा त्याला आपल्या जगण्यावर आपलं नियंत्रण आहे असं वाटतंही, परंतु एखाद्या गाफील क्षणी त्याचा त्यावरील ताबा सुटतो आणि मग त्याचंच काय, कुणाचंच त्याच्या जगण्यावर नियंत्रण उरत नाही. स्वप्न आणि वास्तव यांची अशी सरमिसळ सबंध नाटकभर होत राहते. या नाटकाची अशी अत्यंत गुंतागुंतीची रचना आहे. हे नाटक कधी वास्तवाच्या पातळीवर घडतं, तर कधी स्वप्न-वास्तवाच्या सीमारेषावर! तर कधी स्वप्नावस्थेतही ते घडत राहतं. स्वप्न हे वास्तव असू शकेल, किंवा कधीतरी वास्तवही स्वप्नवत भासू शकतं. किंवा कधी कधी तर या साऱ्याच्या पल्याड भासमान वास्तवासारखं माणसाचं जगणं असू शकतं. हे सारं अ‍ॅब्सर्ड आहे. आणि तसं ते मांडताना मांडणीची मोडतोड ही करावीच लागते. ती या नाटकात आपसूक होते. त्यामुळे हे नाटक नीट समजून घेऊनच केलं जायला हवं, असं मला वाटत होतं. समन्वयच्या तरुण रंगकर्मीनी ते नीट समजून घेतलंय, पचवलंय असं मला वाटतं. त्यासाठी त्यांनी दोन महिने अतिशय कसून मेहनत घेऊन तालमी केल्या. या नाटकाचं इम्प्रोव्हाइझ्ड रूप आणि आताचा दीर्घाक यांच्यातला फरक मी स्वत: प्रयोगात अनुभवलाय. यातल्या कलावंतांनी या नाटकातील विषयाशी समांतर असंही भरपूर वाचन केलंय. इतरांशी चर्चा, विचारविनिमय करून त्यांचे इनपुट्सही त्यांनी त्यात समाविष्ट केलेत. त्यामुळे वर्कशॉप प्रॉडक्शनसारखं हे नाटक आकारास आलेलं आहे. शशांक शेंडे यांनीही दिग्दर्शक म्हणून त्यावर खूप काम केलेलं आहे. ‘समन्वय’ची संदेश कुलकर्णी, निखिल रत्नपारखींची पिढी आज नाटक-सिनेमांत बिझी झाल्यानं नव्या मुलांना घेऊन त्यांनी हे नाटक बसवलंय. त्यामुळे त्यांच्या रॉ फ्रेशनेसचा नाटकाला लाभ झाला आहे. ही गोष्ट या नाटकाच्या बाबतीत मला विशेष जाणवली..’ जयंत पवार यांनी नाटकाची प्रोसेस त्यातल्या खाचखळग्यांसह उलगडून दाखवताना असं संगतवार विवेचन केलं.
‘टेन्गशेच्या स्वप्नात ट्रेन’चं नेपथ्य श्याम भूतकर यांनी केलं असून, संगीत प्रदीप वैद्य यांचं आहे. प्रकाशयोजनेची धुरा हर्षवर्धन पाठक सांभाळत आहेत. सोनल खराडे यांची वेशभूषा, तर निर्मिती सूत्रधार आहेत किरण यज्ञोपवित. या नाटकात अनुजा साठे, गौरी कोंगे, नीता पवार, श्रृती ढवळे, प्रमिला, तृप्ती तेंडुलकर, अमर गायकवाड, आदित्य टावरे, बादल इर्ले, भक्तिप्रसाद देशमाने, चिन्मय कुलकर्णी, धनराज, मिहिर देवरे, नितीन धंदुके, रोहित नाईक, ऋतुराज शिंदे, सचिन पाटील, शशांक शेंडे, सुदर्शन कराड, शशांत जोशी हे कलाकार आहेत. येत्या शनिवारी, २७ जून रोजी सायं. ७ वा. दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये ‘टेन्गशेच्या स्वप्नात ट्रेन’चा मुंबईतला पहिला प्रयोग होणार आहे.
रवींद्र पाथरे