Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

तंत्रज्ञान
विद्यार्थी आणि उपग्रह

 

वैज्ञानिक अभ्यासासाठी अवकाशात उपग्रह सोडणे ही बाब आता नित्याची झाली आहे. विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी हे उपग्रह अवकाशात सोडणे आवश्यकही आहे. त्यातच भारताला मिळालेल्या ‘चांद्रयान-१’च्या यशानंतर देशातील प्रत्येकाला अवकाश संशोधनासंदर्भात उत्सुकता वाटायला लागली आहे. याचा सर्वाधिक प्रभाव विद्यार्थ्यांवर पडला आहे. यामुळे उपग्रह निर्मितीच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविण्यास सुरुवात केली आहे.
उपग्रह तयार करण्याचा पहिला प्रयोग देशातील विविध आयआयटी संस्थांमधील विद्यार्थ्यांनी केला. आयआयटी, मुंबईच्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षांच्या अखेरीस आपला ‘प्रथम’ नावाचा उपग्रह तयार करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली. तर आयआयटी, कानपूरचा ‘जुगनू’ हा छोटा उपग्रह अंतिम टप्प्यात आहे. यातील ‘प्रथम’ हा उपग्रह येत्या ऑगस्टमध्ये अवकाशात सोडण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. या विद्यार्थ्यांच्या उत्साहानंतर विविध विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनीही या क्षेत्रात काम करण्याची आपली इच्छा ‘इस्रो’कडे व्यक्त केली होती. पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचा ‘स्पेस रिकव्हरी एक्सपेरिमेंट-२’ हा उपग्रह तयार करण्यासाठी ‘इस्रो’ने सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. शिवाय ‘चांद्रयान-२’च्या मोहिमेतसुद्धा या विद्यार्थ्यांचा सहभाग असेल, असे ‘इस्रो’चे अध्यक्ष माधवन नायर यांनी नुकतेच स्पष्ट केले.
‘इस्रो’च्या या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. विद्यार्थ्यांना उपग्रह तयार करण्याचा अनुभव, त्याच्या बारकाव्यांचा अभ्यास करणे हा या उपग्रह निर्मितीच्या मागचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर अवकाशातील इतर अभ्यास या उपग्रहांद्वारे करण्यात येणार आहे. आयआयटी, कानपूरचा ‘जुगनू’ हा उपग्रह पूर, आपत्ती व्यवस्थापन यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काम करणार आहे. तीन किलोग्रॅम आणि ३४ से.मी. लांबीचा हा उपग्रह तयार करण्यास अडीच कोटी रुपये खर्च असून यात उच्चप्रतीचे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. हे कॅमेरे शेती, हवामान आणि मातीच्या विविध रूपांचे छायांकन करणार आहेत. तसेच अवकाशातील मोठय़ा उपग्रहांना जोडण्याचे कामदेखील हा उपग्रह करणार आहे. तर आयआयटी, मुंबईचा ‘प्रथम’ हा उपग्रह अवकाशातील इलेक्ट्रोन काऊन्टस्चा अभ्यास करणार आहे. विशेष म्हणजे ‘प्रथम’च्या निर्मितीमध्ये आयआयटीच्या विद्यार्थ्यांबरोबरच देशातील इतर विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. पुणे विद्यापीठाचा ‘स्पेस रिकव्हरी एक्सपेरिमेंट-२’ हा उपग्रह तांदळाच्या उत्पन्नावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार आहे.
आपल्याला भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला स्पेस टेक्नोलॉजीचा वापर करणे सध्याच्या काळात अनिवार्य असल्याचे मत ‘इस्रो’चे अध्यक्ष माधवन नायर यांनी नुकतेच पुणे विद्यापीठात लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. आपल्याला पुरेसे अन्न, आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी इत्यादी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ‘इस्रो’ने यापूर्वी केलेल्या अशा प्रकारच्या सर्व प्रयोगांना यश आले आहे. पण दिवसागणिक वाढत जाणारी लोकसंख्या आणि त्यातूनच वाढत जाणारी सुविधांची गरज भागविण्यासाठी स्पेस टेक्नोलॉजीमध्ये मोठय़ा प्रमाणावर संशोधन होणे गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे नायर यांनी यावेळी सांगितले. उपग्रह निर्मितीचे हे सर्व प्रयोग ‘इस्रो’च्या ‘स्पेस कॅप्सूल रिकव्हरी एक्सपेरिमेंट’चा भाग आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना उपग्रह विकासाच्या क्षेत्रात चांगली संधी मिळणार आहे. तसचे या माध्यमातून अनेक समस्यांवर तोडगा काढणेही शक्य होणार आहे.
नीरज पंडित
nirajpandit@in.com