Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टस् प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

 

मुंबई विद्यापीठाच्या अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टस् या विभागातर्फे दोन वर्षांचा ‘मास्टर ऑफ थिएटर आर्टस्’ हा पूर्ण वेळ चालणारा पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविला जातो. या अभ्यासक्रमात प्रामुख्याने अभिनय, नाटय़दिग्दर्शन, नाटकाची तांत्रिक अंगे, नाटय़वाङ्मय व नाटय़इतिहास, नाटय़निर्मिती व त्यातील सहभाग, नाटय़लेखन, नाटय़समीक्षा आदी विषय शिकविले जातात. या अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिकांवर अधिक भर दिला जातो. त्यामुळे या अभ्यासक्रमात सिद्धांत व प्रात्यक्षिकांचे प्रमाण ४० ते ६० टक्के असे जाणीवपूर्वक ठेवण्यात आले आहे. दोन वर्षांच्या या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना नामांकित दिग्दर्शकांच्या दिग्दर्शनाखाली किमान तीन पब्लिक प्रॉडक्शन्समध्ये सहभागी होणे आवश्यक असते. आतापर्यंत या विभागाने ‘मध्यमव्यायोग’ (दिग्द. प्रा. वामन केंद्र), ‘जनशत्रू’ (दिग्द. विजय केंकरे), ‘किकीदिवी’ (दिग्द. राजश्री शिर्के-वैभव आरेकर), ‘पोस्टर’ (दिग्द. जयदेव हट्टंगडी), ‘मुखवटे’ (दिग्द. चंद्रकांत कुलकर्णी), ‘वेधपश्य’ (दिग्द. प्रा. वामन केंद्रे), ‘दि मोमेन्टस्’ (दिग्द. रामचंद्र शेळके), ‘सूर्याची पिल्ले’ (दिग्द. दामू केंकरे), ‘खेळ’ (दिग्द. मिलिंद इनामदार), ‘राजदर्शन’ (दिग्द. शिवदास घोडके), ‘मोहनदास’ (दिग्द. प्रा. वामन केंद्रे), ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ (दिग्द. विजय केंकरे), ‘हृदय’ (दिग्द. चंद्रकांत कुलकर्णी), ‘अजिंठा’ (दिग्द. मिलिंद इनामदार) या नाटकांची निर्मिती केली असून, त्यापैकी ‘मध्यमव्यायोग’, ‘वेधपश्य’, ‘हृदय’, ‘मोहनदास’ व ‘अजिंठा’ या नाटकांना विविध राष्ट्रीय नाटय़महोत्सवात सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांला दोन वर्षांत एक तरी नाटक दिग्दर्शित करणे अनिवार्य असते. अ‍ॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ९७ क्लासरुम प्रॉडक्शन्सची निर्मिती केलेली आहे.
या विभागामध्ये नाटय़शिक्षण देण्यासाठी देशातून व परदेशातून नाटय़क्षेत्रातील तज्ज्ञ व दिग्गज कलावंतांना आमंत्रित केले जाते. आतापर्यंत या विभागात प्रशिक्षण देण्यासाठी भालचंद्र पेंढारकर, डॉ. अशोक रानडे, प्रा. देवेंद्र राज अंकुर, अभिनेते गोविंद नामदेव, शफाअत खान, विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, शिवदास घोडके, कृष्णा बोरकर, अनामिका हकसर, डॉ. राजीव नाईक, निरजा पटवर्धन, राजश्री शिर्के, वैभव आरेकर, शमा भाटे, उदय देशपांडे, डॉ. जयश्री पाठक, डॉ. शुभदा शेळके, डॉ. सत्यदेव त्रिपाठी, कमलाकर नाडकर्णी, छाया-माया खुटेगावकर, अमोद भट, शिवानंद पाटील, उमेश जाधव, अनिल सुतार, डॉ. मिलिंद मालशे, टेरेन्स लुईस, वैशाली विचारे, अजित राय, राजन भिसे, रामचंद्र शेळके, डॉ. मंगेश बनसोड, संध्या रायते, मिलिंद इनामदार आणि प्रा. वामन केंद्रे आदी भारतीय नाटय़ प्रशिक्षकांबरोबरच प्रा. ली जेम्स (ऑस्ट्रेलिया), इमोझिन बटलर कोल व सायमन आणि जेफ (इंग्लंड), डॉ. डोरोथी फिग्युरा (अमेरिका), जेसेल बोको व गाय बिरान (क्रोएशिया), यास्मिन ब्राऊन व जॉन हेगले (इंग्लंड), तोबियास बियांकोन (स्वित्र्झलड), ज्युलियाना कॅम्पाना (अमेरिका), हाकूर गुन्नारसन (नार्वे) आदी विविध विषयांमध्ये तज्ज्ञ असलेल्या विदेशी प्रशिक्षकांना अ‍ॅकॅडमीत आमंत्रित करण्यात आलेले आहे.
अ‍ॅकॅडमीच्या या अभ्यासक्रमाचे स्वरूप लक्षात घेता दरवर्षी या अभ्यासक्रमासाठी केवळ पंचवीस विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो. कुठल्याही विषयामध्ये पदवी मिळविलेले पदवीधारक (१०+२+३) किंवा तत्सम दर्जाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज करू शकतात. नाटकातील व इतर प्रयोग कलाक्षेत्राचा अनुभव असलेल्या गुणी विद्यार्थ्यांना निवडप्रक्रियेत प्राधान्य दिले जाते. विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक सादरीकरण व प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाते. या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून, प्रवेश अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख १० जुलै २००९ ही आहे. प्रवेश परीक्षा १३ व १४ जुलै रोजी सकाळी ९ वाजल्यापासून आयोजित करण्यात आली आहे.
या अभ्यासक्रमाचे माहितीपत्रक व प्रवेश अर्ज सकाळी ११ ते ५ या वेळेत अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दुसरा मजला, विद्यानगरी कॅम्पस, कालिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई- ९८ येथे तसेच हे प्रवेश अर्ज व माहितीपत्रक मुंबई विद्यापीठाच्या ६६६.े४.ूं.्रल्ल या संकेतस्थळावर Faculty of Fine Arts या उपविभागामध्ये Academy of Theatre Arts येथे उपलब्ध करण्यात आले आहेत. प्रवेश अर्ज academyoftheatrearts2007@gmail.com आणि academyoftheatrearts@yahoo.com या ई-मेलवरदेखील स्वीकारले जातील.
अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२२-२६५०८२००/ ०२२-२६५४३०००/ २६५४३३००, विस्तारित क्रमांक- ३२०९ व ३२१० किंवा ०९८२०६८६५०६ अथवा ९८६९१५१९९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अ‍ॅकॅडमीचे संचालक प्रा. वामन केंद्रे यांनी केले आहे.