Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

रोजगाराभिमुख नाटय़शास्त्र विभाग

 

बदलत्या जगाचा वेध घेऊन अभ्यासक्रमात पूरक परिवर्तन करणे आणि काळानुरूप नवे अभ्यासक्रम सुरू करणे, हे ध्येय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अंगीकारले आहे. हेच धोरण अवलंबून विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागाने रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू केले आहेत. अलीकडे ‘लोकल टू ग्लोबल’ हे ब्रीद विभागाने स्वीकारले आहे. प्रादेशिकतेचे भान ठेवत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले स्थान निर्माण करण्याचा नाटय़शास्त्र विभागाचा मानस आहे. केवळ नाटक या एकमेव दालनापर्यंतच मर्यादित न राहता टी. व्ही. प्रॉडक्शन्स, बेसिक इन फिल्म मेकिंग, चित्रपट रसग्रहण, योगशास्त्र हे पदविका अभ्यासक्रमही विभागाने सुरू केले आहेत. तर नृत्य, संगीत हे पदवी, तसेच लोकरंगभूमी, इव्हेंट मॅनेजमेंट, मॉडेलिंग, फॅशन डिझायनिंग हे प्रमाणपत्र अभ्यासक्रमही विभाग सुरू करीत आहे. हे सर्व अभ्यासक्रम कलेच्या आराधनेसोबत विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देणारे आहेत.
नाटय़शास्त्र विभागातर्फे यावर्षीपासून ‘डिप्लोमा इन टी.व्ही. प्रॉडक्शन अ‍ॅण्ड बेसिक्स इन फिल्म मेकिंग’ हा पदविका आणि ‘चित्रपट रसग्रहण’ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. दूरदर्शन आणि चित्रपट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या अभ्यासक्रमासाठी गेल्या शैक्षणिक वर्षांत विषयतज्ज्ञ म्हणून राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरील तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी विभागात येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शहरी विद्यार्थ्यांसोबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दूरदर्शन, चित्रपटाच्या क्षेत्रात भरारी घेण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो आहे. गेल्या सत्रात काही चित्रपटांत विभागाच्या दहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांसाठी ‘बॅचलर ऑफ परफॉर्मिग आर्ट’ हा पदवी अभ्यासक्रम आहे. ज्यात संगीत, नृत्य, नाटय़ हे तीन विशेष विषय शिकविले जातात. तर बारावीचेच उत्तीर्ण विद्यार्थी बी. पी. ए. सोबतच टी. व्ही. प्रॉडक्शन्स अ‍ॅण्ड बेसिक्स इन फिल्म मेकिंग तसेच योगशास्त्र या पदविका अभ्यासक्रमासाठी आणि चित्रपट रसग्रहण, बालरंगभूमी, लोकरंगभूमी, मॉडेलिंग, फॅशन डिझायनिंग या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांतही प्रवेश घेऊ शकतील. विद्यापीठ पातळीवर हा देशातील बहुधा एकमेव असा अभ्यासक्रम आहे. कोणत्याही विद्याशाखेत स्नातक झालेल्यांना नाटय़शास्त्र या विषयात प्रवेश घ्यायचा असेल तर बॅचलर ऑफ ड्रॅमॅटिक्स (बी.डी.) हा एक वर्षांचा स्नातक बी.डी. हा ब्रिज कोर्स उपलब्ध आहे. पी.पी.ए. आणि बी.डी. या पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी एम.पी.ए. (मास्टर ऑफ परफॉर्मिग आर्ट) या दोन वर्षीय अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात. यातही अभिनय, क्रिएटिव्ह ड्रॅमॅटिक्स, स्टेजग्रॉफी, प्रॉडक्शन अ‍ॅण्ड डायरेक्शन, कम्युनिकेशन अ‍ॅण्ड मीडिया आर्ट, हे स्पेशलायझेशनचे विषय आहेत. हे सर्व अभ्यासक्रम ६० टक्के प्रात्यक्षिकांभिमुख आहेत. एम.पी.ए. नंतर विद्यार्थ्यांना पीएच.डी. करण्याची सोयही नाटय़शास्त्र विभागाने केली आहे. विषयाचे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील तज्ज्ञ मंडळी विभागाला सेवा देत असतात. यापूर्वीही आंतरराष्ट्रीय फुलब्राईट स्कॉलर ब्रायन ब्रॉफी, छाऊ या नृत्यप्रकाराचे तज्ज्ञ भूमिकेश्वर सिंग, रंगभूषा तज्ज्ञ प्रभाकर भावे, मूकाभिनय तज्ज्ञ निरंजन गोस्वामी, थांगटा या युद्धनृत्यप्रकाराचे तज्ज्ञ गुरू बिश्वजितसिंग, याशिवाय चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, डॉ. निशिगंधा वाड, मकरंद अनासपुरे, नाटककार प्रा. दत्ता भगत तसेच अभिनेते नंदू माधव, अभिनेत्री अतिषा नाईक, नाटय़ दिग्दर्शक प्रकाश बुद्धीसागर, प्रभृतींनी विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांत मार्गदर्शन केले आहे. गेल्या शैक्षणिक सत्रात हिंदी चित्रपट दिग्दर्शक सागर सरहदी, गजेंद्र अहिरे, महेश देशपांडे, सचिन गोस्वामी, चित्रपट रसग्रहण तज्ज्ञ अशोक राणे, चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. नाटय़शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांच्या मार्गदर्शनातून या अभ्यासक्रमांची निर्मिती झाली असून, कॉर्पोरेट पद्धतीने नाटय़शास्त्र विभागाची उभारणी ते करीत आहेत. काही राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहकार्याचे करारही येत्या काळात नाटय़शास्त्र विभाग करणार आहे. एकूणच नाटय़शास्त्र विभागाची व्याप्ती आता ‘डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिग आर्ट’ या नामाभिधानापर्यंत वाढवून तसे रूप-स्वरूप देण्याचा त्यांची आकांक्षा आहे. २०१७ पर्यंत परफॉर्मिग आर्टसना दैनंदिन जीवनाचा भाग करण्याचा विभागाचा मानस आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना कला, सांस्कृतिक क्षेत्रांत रोजगार उपलब्ध होऊ शकतील यादृष्टीने सल्ला सेवाही देण्याचा विभागाचा मानस आहे. शिक्षणकाळात विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या, विद्यावेतन, वसतिगृहाच्या सुविधा, कमवा व शिका योजना अशा सुविधाही उपलब्ध आहेत. याशिवाय वर्षभरात होणारे नाटय़ महोत्सव, कला महोत्सव, युवा महोत्सव, नाटय़ स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, चर्चासत्रे, कार्यशाळा, शिबिरे यांचाही लाभ विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. ज्यांना या अभ्यासक्रमात भाग घ्यायचा असेल त्यांनी कार्यालयीन वेळात विभागाशी संपर्क साधावा. विभागाचा पत्ता- नाटय़शास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. दूरध्वनी- ०२४०- २४०३३२०/ २४०३३२१.
डॉ. सतीश पावडे