Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांच्या समस्येवर निर्णय अपेक्षित
अलिबाग, २३ जून/प्रतिनिधी

 

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत होऊ घातलेले दगडी कोळशावरील औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प ही कोकणवासीयांची वर्तमानातील गंभीर आणि कळीची समस्या आहे. ओरोस येथे उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोकणवासीयांना त्यावर ठोस निर्णय अपेक्षित आहे. कोकणवासीयांची ही समस्या राज्याचे ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनाही मान्य आह़े
दोन दिवसांपूर्वीच मंत्रालयात अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड आदी नऊ गावांच्या क्षेत्रात होऊ घातलेल्या टाटा आणि रिलायन्स औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांना योग्य पर्याय देऊन, विनाशकारी प्रकल्पांना विरोध करणारे डॉ़ भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाबरोबरच्या बैठकीत तटकरे यांनी, आपण शेतकऱ्यांबरोबरच असून, रायगड आणि रत्नागिरी या दोनच जिल्ह्यांत एवढय़ा मोठय़ा प्रमाणात औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प असू नयेत या मताशी आपण ठाम असल्याचे स्पष्ट करून शहापूर-धेरंड या एकाच ठिकाणी दोन प्रकल्प नाहीच नाही, अशी आपली भूमिका स्पष्ट केली आह़े याखेरीज टाटा व रिलायन्स औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांच्या प्रस्तावांची फेरतपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ़ निपुण विनायक यांना याच बैठकीत दिल़े या पाश्र्वभूमीवर तटकरे उद्याच्या बैठकीत आपल्या या भूमिकेवर किती ठाम रहातात, याकडे कोकणातील जनतेचे लक्ष लागले आहे.
टाटा पॉवर १६०० म़े व्ॉट, रिलायन्स ४००० म़े व्ॉट, गेल १००० म़े व्ॉट, इस्पात १००० म़े व्ॉट आणि पटणी ५०० म़े व्ॉट असे एकूण ८१०० म़े व्ॉट वीजनिर्मितीचे पाच औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प एकटया अलिबाग तालुक्यांत प्रस्तावित आहेत़
रत्नागिरी जिल्ह्यात जयगड येथे जिंदालचा १२०० म़े व्ॉट च्या औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाचे काम अखेरच्या टप्प्यात असून, या प्रकल्पाच्या ३२०० म़े व्ॉट विस्तारीत प्रकल्पाच्या मान्यतेचा प्रस्तावही सरकारकडे आह़े पावस येथे फिनोलेक्सचा मूळ ४३ म़े व्ॉट औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प होता. आता प्रत्यक्षात तो १००० म़े व्ॉट क्षमतेचा होणार आह़े धोपावे-गुहागर येथे १६०० म़े व्ॉट चा ‘एमटीपीसी’चा तर भोपण येथे १९८० म़े व्ॉट चा जीएमआर इलेक्ट्रिकल्सचा, सिंधुदुर्गात मुणगे येथे ४००० म़े व्ॉट चा अल्ट्रामेगा थर्मलचा तर आदगांव-धाकोडे येथे १०५० म़े व्ॉटचा इंडभारत पॉवर कोकण लि़ चा औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प प्रस्तावित आह़े रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ७७८० तर सिंधुदुर्गात एकूण ५०५० म़े व्ॉट क्षमतेचे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प प्रस्तावित आहेत़ या व्यतिरिक्त रत्नागिरी जिल्ह्यातच माडबन येथे मूळ ९६०० म़े व्ॉट क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असून त्याच्या विस्तारीत प्रकल्पाची क्षमता ५४०० म़े व्ॉट आह़े
इंधन म्हणून दगडी कोळसा जाळून रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या २० हजार ९३० म़े व्ॉट वीजनिर्मितीच्या नियोजनाचा विचार करता, ही एकूण वीजनिर्मिती राज्याच्या आजच्या स्थापित क्षमतेच्या १२० टक्के अधिक आह़े