Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

समस्यांना वाचा फोडण्यासाठी मोर्चानी होणार मंत्रिमंडळाचे स्वागत
सावंतवाडी, २३ जून/वार्ताहर

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच राज्य मंत्रिमंडळाची बैठक उद्या (बुधवार) ओरोस सिंधुदुर्ग नगरीत सकाळी साडेदहा वाजता होत आहे. या बैठकीचे सिंधुदुर्ग नगरीत गुढय़ा उभारून स्वागत केले जात आहे. कोकणातील शिवसेना- भाजप युतीचे आमदार आणि संघटना जिल्ह्यातील विविध प्रश्नांसाठी मोर्चा काढून ओरोस नगरी दुमदुमवून टाकणार आहेत.
मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह २५ कॅबिनेट व आठ राज्यमंत्र्यांचे दौरे होणार आहेत, असे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सांगितले. विधानसभा विरोधी पक्षनेते रामदास कदम उद्या येणार आहेत. ते मोर्चाचे नेतृत्व करतील. मुख्यमंत्र्यांना विचारूनच त्यांची भेट ठरविली जाईल, असे विक्रमकुमार म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळणारा पाऊस पाहता यंदा जून महिना संपत आला असूनही पाऊस कोसळत नसल्याने धरणेही आटली आहेत. निसर्गामध्ये झालेला बदल आणि अवेळी कोसळणाऱ्या पावसामुळे फटका बसलेले शेतकरी, बागायतदार, मच्छिमार यांनाही पॅकेज मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बैठक होत असल्याने कोकणात सिंधुदुर्ग व रत्नागिरीला झुकते माप देण्याचा प्रयत्न नारायण राणे पॅकेजच्या माध्यमातून करणार आहेत. कोकणाचा अनुशेष भरून काढण्यासाठी दोन हजार कोटींचे हक्काचे पॅकेज द्या, अशी मागणी शिवसेना आमदार शिवराम दळवी व आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे. कोकणातील युतीचे आमदार मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.