Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

नीलेश राणे यांच्या सत्काराप्रसंगी मायनिंग प्रकल्पाचे तीव्र पडसाद
सावंतवाडी, २३ जून/वार्ताहर

 

रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नूतन खासदार डॉ. नीलेश राणे यांच्या नागरी सत्काराच्या वेळी सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यात गाजत असलेल्या मायनिंग प्रकल्पाचे तीव्र पडसाद उमटले. त्यात माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी प्रकल्पाला विरोध करणारे भाष्य केले. मात्र पालकमंत्री नारायण राणे यांनी पर्यावरणप्रेमींवर टीका केली.
सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात अ‍ॅड. दिलीप नार्वेकर यांनी या मुद्दय़ाला हात घालत पालकमंत्री राणे यांना बदनाम केले जात असल्याचा आरोप केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण भोसले यांनी मायनिंग प्रकल्प प्रदूषणकारी आहे. फलोद्यान योजनेअंतर्गत लोकांनी फळबागा निर्माण केल्या आहेत. त्यावर परिणाम होणार असल्याचे सांगत कोकणचे नेतृत्व करणारे कै. पी. के. सावंत, कै. भाई सावंत यांच्या स्वप्नातील कोकणचा विकास आता नेते नारायण राणे यांच्या हाती असल्याचे सांगत जागतिक पर्यावरणाचा ऊहापोह केला.
माजी नगराध्यक्ष दीपक केसरकर यांनी मायनिंग ही राष्ट्रीय संपत्ती असल्याचे सांगत एन्रॉन व उषा इस्पात प्रकल्पांची उदाहरणे दिली. पर्यटनस्थळापासून दूर असणाऱ्या मायनिंग प्रकल्पाची उदाहरणे देत रेडीमुळे तेरेखोल या तीन कि.मी. परिसरावर परिणाम झाला नाही. मात्र मायनिंगमुळे रेडीत वर्षांकाठी ४० कोटींची उलाढाल होत आहे, असे सांगितले.
पालकमंत्री राणे यांनी, पर्यावरणप्रेमी म्हणून रायगडच्या वैशाली पाटील यांनी कळण्यात आंदोलन पेटविण्यापेक्षा रायगडमध्ये बोडक्या झालेल्या डोंगरांचे पाहावे, असा सल्ला देत मायनिंग प्रकल्पामुळे आर्थिक सुबत्ता वाढेल, असे स्पष्ट केले.