Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

लोकमानस

इंजिनीयरिंगच्या प्रवेशाबाबत जाचक व चुकीची अट

 

नुकत्याच लागलेल्या एचएससी, सीईटी परीक्षांच्या निकालानंतर असे दिसून आले आहे की, काही विद्यार्थ्यांना सीईटी मध्ये१४०/१५०/१६० गुण मिळूनही केवळ १२ वीच्या परीक्षेत PCM गटामध्ये १५० गुण न मिळाल्यामुळे इंजिनियरिंग/ फार्मसीमध्ये प्रवेश मिळू शकत नाही.
एकीकडे इंजिनियरिंगच्या जागा रिकाम्या राहात असताना केवळ १२वीच्या परीक्षेत किमान पात्रता गुण न मिळाल्यामुळे मुलांना इंजिनियरिंग प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी त्यांचे अख्खे एक वर्ष फुकट जाणार आहे. एचएससी परीक्षेत PCM मध्ये १५० गुण मिळण्याची अट फक्त महाराष्ट्रात आहे.
यासंबंधी संचालक, तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य यांना वरील अट शिथिल करण्याकरिता निवेदन देण्याचे ठरविले आहे. तरी संबंधित विद्यार्थ्यांनी/पालकांनी खालील ई मेल पत्त्यावर व मोबाइल वर संपर्क साधावा, ही विनंती.
अनिल पटवर्धन, मुंबई
apat_2000@yahoo.co.in
9820563297

मराठी भाषेच्या सेवेची अशीही संधी
इंटरनेट वापरणाऱ्यांना विकिपीडिया हे एक मोठे ज्ञानभांडार उपलब्ध असते. तो इंटरनेचवरचा विश्वकोश आहे. कोणत्याही शब्द वा विषयाबाबतीत नेमकी माहिती येथे इंग्रजीत उपलब्ध असते व ती उत्तम प्रकारे लिहिलेली असते.
विकिपीडियाच्या मुखपृष्ठावर जगातील महत्त्वाच्या भाषांच्या लिंक दिलेल्या असून ज्या भाषेतून विश्वकोश वाचायचा त्यावर क्लिक केले की तीच माहिती त्या त्या भाषेत मिळते. उदा. फ्रेंच, जर्मन, ग्रीक वगैरे. यात ‘मराठी’ भाषेतून कोश वाचण्याची लिंकही असते. पण दुर्दैवाने ते पान अनेकदा कोरेच असते.. त्यावर विकिपीडियातर्फे आवाहन केलेले असते की कोणीतरी त्या मराठीत ती माहिती लिहावी. तेथेच हेसुद्धा नमूद केलेले असते की असे काम करणाऱ्यास कोणताही मोबदला मिळणार नाही, कारण ही सेवा वाचकांसाठीही मोफत आहे. (उलट विकिपीडियाकर्त्यांचेच आर्थिक मदत करण्याचे आवाहन आपण वाचतो.)
मराठीबरोबरच अन्य भारतीय भाषांच्याही मुखपृष्ठावर लिंक आहेत व त्यांचीही स्थिती थोडय़ाफार फरकाने मराठीसारखीच आहे- कोरा कागज! गरज सर्वच भारतीयांनी प्रयत्न करण्याची आहे. हे कार्य केल्यास काहीच पैसे मिळणे संभवत नाही व तेथे लेखकाचे/ अनुवादकाचे नावसुद्धा असत नाही. म्हणजे आपल्या नावाची प्रसिद्धीही नाही. परंतु मराठी भाषेची सेवा करण्याची ही उत्तम संधी आहे. समाजातील अनेक लोक दोन्ही भाषा (इंग्रजी व मराठी) उत्तम जाणतात व त्यातले बरेच इंटरनेट वापरणारेही असतात. शिवाय अनेक लेखक भाषा-साहित्यविषयक संमेलने सर्व अर्थानी गाजवतात. अशा सर्वाना खुले आवाहन आहे की त्यांनी सदर कार्य हाती घ्यावे.
मात्र हे कार्य निरपेक्षपणे करणे अपेक्षित आहे. काहीतरी थातूरमातूर छापणेही योग्य होणार नाही. अनुवाद योग्य असावा व शुद्धलेखनाच्या चुका नसाव्यात. अनेक क्षेत्रांत आघाडीवर असणाऱ्या मराठी माणसाने या कामी मागे पडू नये.
सुभाष कौशिककर, नागपूर

जैव वैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीस जबाबदार कोण?
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कारभार अत्यंत हलगर्जीचा म्हणून भारताच्या महालेखापरीक्षकांनी आपल्या अहवालांत त्यांच्यावर कडक शब्दात ताशेरे ओढले, असे वृत्त (१३ जून) वाचण्यात आले.
लोकसंख्या वाढत गेली व इस्पितळे, दवाखाने वाढल्यामुळे जैव वैद्यकीय कचऱ्याची उत्पत्ती वाढत गेली. गेल्या काही वर्षांत एड्स, हिपॅटायटिस बी यांसारखे आजार भयानक प्रमाणात वाढू लागले. यासाठी साध्या दवाखान्यातही इंजेक्शन घेताना इंजेक्शनचे सीरिंज व सुई नवीन असावी असा दंडक घातला गेला, तरीही अनेक दवाखान्यांत अजूनही त्याच सुया वापरून इंजेक्शने दिली जातात. अचानक अपघात घडल्यास सार्वजनिक इस्पितळाच्या आपत्कालीन व अतिदक्षता विभागात ग्लोव्हज् न वापरता ड्रेसिंगपासून इंजेक्शन दिली जातात. एखादा एड्स किंवा हिपॅटायटिस बी चा रुग्ण या रुग्णांमध्ये असेल तर तो हा आजार चटकन डॉक्टर, कर्मचारी व इतर रुग्णांमध्ये पसरवू शकतो. आपत्कालीन कक्षात या आजारासाठी चाचण्या करण्यापेक्षा चटकन रोग्यावर प्रथम इलाज करण्याची गरज असते पण यापासून होणारा जैविक कचरा, रोग्याची वापरलेली इंजेक्शने, सुया, ड्रेसिंग व कापूस व्यवस्थित वेगळा ठेवला जातो का?
जैव वैद्यकीय कचरा दोन प्रकारांत निर्माण होतो. सुका कचरा एक वेळ काही दिवस ठेवला तरी चालेल परंतु ओला कचरा म्हणजेच रोग्याच्या शस्त्रक्रियेनंतर काढलेले ओले भाग, रक्त, शस्त्रक्रियेत वापरलेला कापूस व पू वगैरे ताबडतोब नष्ट करणे किंवा अठ्ठेचाळीस तासांत नष्ट करणे गरजेचे असते. मोठमोठय़ा शहरांत यासाठी मोठय़ा योजना आखण्यात आल्या. सरसकट दवाखाने, इस्पितळे, रक्तपेढय़ा यांची शिरगणती करण्यात येऊन त्यांना या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बंधने घालण्यात आली. तयार होणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्याच्या वजनानुसार शुल्क ठरवून खासगी आरोग्य सेवांना कंत्राट देण्यात आले. साध्या दवाखान्यात जेथे अत्यल्प असा कचरा निर्माण होतो त्यांनाही महागडे शुल्क लावण्यात येऊन अनेक खासगी दवाखान्यांतील डॉक्टरांना साधारण वीस हजारांपर्यंत दंड भरण्याची ताकीद देण्यात आली. हे तथाकथित कंत्राटदार कधी गाडी नाही म्हणून त्यांच्या मनाप्रमाणे या डॉक्टरांच्या हॉस्पिटलांना व दवाखान्यांना भेट देण्याचे अगोदरच पैसे मिळाल्यामुळे टाळतात. ही सद्यपरिस्थिती आहे.
एक- दोन वर्षांत महाराष्ट्र प्रदूषण नियोजन मंडळाने काही अधिकाऱ्यांना डॉक्टरांकडे जाऊन आता आम्ही हे कंत्राट घेतले आहे म्हणून सांगण्यात आले. डॉक्टर वर्ग आधीच्या कंत्राटदाराला पैसे देऊन बसल्यामुळे संभ्रमात पडला. आपणास वीस हजारांपासून काहीही शिक्षा होऊ शकते म्हणून घाबरून काही डॉक्टरांनी फक्त कन्सल्टेशन प्रॅक्टिस सुरू केली.
आज सर्व नियम कोणत्या डॉक्टरांसाठी आहेत? ज्या डॉक्टरांनी आरोग्याचे धडे द्यावयाचे त्याला भरमसाठ पाण्यासाठी शुल्क भरावे लागत आहे. जैव वैद्यकीय कचरा मोठय़ा शहरांत महानगरपालिका डंपिंग ग्राऊंड किंवा इतर ठिकाणी इन्सिनरेटर लावून जाळून टाकण्याची व्यवस्था करत आहेत. परंतु छोटय़ा छोटय़ा गावांत छोटय़ा इस्पितळांनाही महागडे इन्सिनरेटर घेऊन हा कचरा जाळा म्हणून सांगितले जाते, ते प्रत्यक्षात शक्य आहे काय?
आज मुंबई- पुण्यासारख्या शहरांत अनेक बोगस डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करून वैद्यकीय व्यवसायाला बदनाम करीत आहेत. सलाईनपासून भरमसाठ इंजेक्शन देणारे हे बोगस डॉक्टर किती कचरा निर्माण करतात? पण या बोगस डॉक्टरांवर कृती करण्यास ना आमच्या सरकारला वेळ, ना अधिकाऱ्यांना. डायबेटिसच्या रुग्णांना आम्ही स्वत:च इंजेक्शन घेण्यास प्रवृत्त करतो. एखाद्या रुग्णाने वापरलेली सुई कचऱ्यात टाकली तर जबाबदार कोण?
मुंबई- पुण्यासारख्या शहरांत महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या अनेक गाडय़ा ठराविक वेळेस फिरत असतात. त्या गाडय़ांमध्ये एक छोटी जागा या जैव वैद्यकीय कचऱ्यासाठी ठेवल्यास डॉक्टर त्यात तो कचरा टाकण्याची काळजी घेतील आणि त्याचे शुल्क नक्कीच कमी असल्यामुळे अनेक डॉक्टर या योजनेत सामील होतील.
डॉ. प्रकाश कवळी, दादर, मुंबई