Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

वसंतदादा कारखाना कामगारांचा मदन पाटील यांच्या घरावर मोर्चा
सांगली, २३ जून / प्रतिनिधी

वसंतदादा साखर कारखाना कामगारांनी आपल्या आंदोलनाच्या एकविसाव्या दिवशी कारखान्याचे अध्यक्ष रोहयोमंत्री मदन पाटील यांच्या घरावर मोर्चा काढून साखर कामगारांचे प्रश्न सोडविता येत नसतील, तर मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास द्यावा, अशी मागणी करीत अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा दिला. कामगारांनी आज दिवसभर कारखान्याच्या संचालकांच्या घरासमोर तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर निदर्शने केली.

बॉक्साईट ट्रक अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांचे धनादेश
कोल्हापूर, २३ जून / विशेष प्रतिनिधी

बॉक्साईट वाहतूक करणाऱ्या ट्रक अपघातात ठार झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला.बॉक्साईट वाहतूक करणाऱ्या ट्रक अपघातात ठार झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी बॉक्साईट कंपन्याकडे सातत्याने पाठपुरावा करून मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळवून दिली.

पुनर्वसन खात्याकडून जमिनींचे बेकायदेशीर वाटप
काळम्मावाडी धरणग्रस्तांचे ठिय्या आंदोलन
कोल्हापूर, २३ जून / विशेष प्रतिनिधी
जिल्हा पुनर्वसन खात्यातील अधिकारी उच्च न्यायालयाचे आदेशही धाब्यावर बसवून दलालांमार्फत जमिनींचे बेकायदेशीर वाटप करीत आहेत. या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि न्यायालयाची दिशाभूल करून धरणग्रस्तांच्या कब्जे वहिवाटीत असलेल्या जमिनींचे अन्यत्र वाटप करण्याचे बोगस आदेश काढल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे या अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट व अनागोंदी कारभाराची तातडीने चौकशी व्हावी या मागणीसाठी काळम्मावाडी धरणग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारला आहे.

वीजनिर्मिती यंत्रे लवकर बनवून देण्याचे आदेश - विलासराव
कोल्हापूर, २३ जून/प्रतिनिधी
वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या अवजड यंत्रांची निर्मिती करण्याचे काम माझ्याच नियंत्रणाखाली असलेल्या ‘भेल’ या औद्योगिक संस्थेतून केले जाते. अवजड यंत्रे लवकरात लवकर तयार करून ती महाराष्ट्राकडे अग्रक्रमांकाने पाठवून देण्याचे आदेश मी माझ्या मंत्रालयाला दिले असल्यामुळे २०१२ साली महाराष्ट्र राज्य भारनियमनमुक्त होईल, असा ठाम विश्वास अवजड उद्योगाचे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी आज येथे बोलताना व्यक्त केला. करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला या गावी आमदार पी.एन.पाटील यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभ व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे सहकारमंत्री व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील हे होते.

आषाढी यात्रा आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले अधिकाऱ्यांना
पंढरपूर, २३ जून/वार्ताहर

वारकऱ्यांच्या सेवेसाठी सर्वानी मिळून काम करीत यात्रा चांगल्या रीतीने पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी केले. जिल्ह्य़ातील सर्वच अधिकाऱ्यांची आढावा बैठक पंढरपूर येथे मंगळवारी दुपारी आयोजित केली होती. त्यात ते बोलत होते. या वेळी उरलेली कामे २७ जूनपर्यंत योग्य पद्धतीने करून घ्यावीत, अशा सूचना दिल्या आहेत. पालखीमार्गावर जी कामे अपुरी अन् निकृष्टपणे झाली आहेत ती तातडीने चांगल्या प्रकारे करून घ्यावीत. या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी सुनावले.

मान्सूनपूर्व पावसाने माण तालुक्यात दीडशे एकर डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त
पाच कोटींचे नुकसान
सातारा, २३ जून/प्रतिनिधी
माण तालुक्यात नुकत्याच झालेल्या मान्सूनपूर्व गारांच्या पावसाने सुमारे १५० एकर क्षेत्रातील डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या असून, पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महावीर जंगटे यांनी नुकसानग्रस्त भागास भेट देऊन पाहणी केली व पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनामे झाल्यानंतर त्याचा अहवाल लवकरच शासनाला सादर केला जाईल व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक नुकसान भरपाईची मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.

कुलगुरू शोधसमितीच्या अध्यक्षपदी एम. के. सुरप्पा
कोल्हापूर, २३ जून / विशेष प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठाच्या नूतन कुलगुरूपदाच्या शोधसमितीवर इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ टेक्नॉलॉजीचे (रोपर, पंजाब) संचालक प्रश्न. एम. के. सुरप्पा यांच्या नांवावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या भाषा भवन येथे व्यवस्थापन व विद्यापरिषदेची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत सुरप्पा यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या होकारासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत असल्याची माहिती विद्यापीठ सूत्रांनी दिली. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची निवडप्रक्रिया सध्या सुरू आहे. या निवडीसाठी नव्याने निकष तयार करण्यात आले आहेत. या निकषानुसार शोध समितीसाठी विद्यापीठाकडून एका सदस्याची शिफारस केली जाते. ही शिफारस करण्याचे अधिकार व्यवस्थापन व विद्यापरिषदेला आहे. यानुसार ही बैठक घेण्यात आली. या समितीत प्रश्न. सुरप्पा यांनी सहभागी होण्यास नकार दिल्यास पर्याय म्हणून कानपूरच्या इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक प्रश्न. संजय गोविंद धांडे यांची शिफारस करण्यात आली आहे.

महाबळेश्वर नगराध्यक्षपदाची ३० जूनला निवडणूक
महाबळेश्वर, २३ जून/वार्ताहर

महाबळेश्वर नगरपरिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुका मंगळवारी (दि.३०) घेण्यात येणार असल्याची अधिसूचना जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी लोकप्रतिनिधी व पालिकेकडे पाठविली आहे. या अधिसूचनेनुसार पालिका सभागृहात ३० जून रोजी वाईचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक ह ोणार आहे. नगराध्यक्षपद हे खुल्या वर्गासाठी आरक्षित असून, यासाठी २४ ते २५ जून रोजी दुपारी २ वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज दाखल करायचा आहे. याच दिवशी अर्जाची छाननी होणार आहे. २७ जून रोजी अधिकृत नामनिर्देशन झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. २९ जूनला दुपारी ४ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे व ३० जून रोजी दुपारी १ वाजता पालिका सभागृहात याबाबतची निवडणूक सभा व निवडणूक होणार आहे. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ३० जूनला सकाळी १० ते १२ पर्यंत अर्ज भरणे, छाननी व अर्ज मागे घेणे व अध्यक्षनिवडीनंतर निवडणूक होणार आहे.

सोलापूरच्या स्मृती उद्यानात पावसाच्या कवितांचा आनंद
सोलापूर, २३ जून/प्रतिनिधी
आनंदश्री प्रतिष्ठानने आयोजिलेल्या कालिदास स्मृती सोहळय़ात रसिक श्रोत्यांनी पावसाच्या कवितांचा मनमुराद आस्वाद घेतला. कंबर तलावाजवळ स्मृती उद्यानात भल्या पहाटे झालेल्या या संस्मरणीय सोहळय़ात पावसाच्या कवितांबरोबरच हिरव्याकंच निसर्गाच्या मोहमयी जादूचा सुखद अनुभव रसिकांना घेता आला. सोलापूर आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी सुनील शिनखेडे यांच्या कविता, स्नेहा शिनखेडे यांचे रंजक निवेदन, जोडीला चवदार भजी, गरम चहा आणि घनविभोर वातावरणात आमरसिकांची मांदियाळी जमली होती. डॉ. वासुदेव रायते यांनी प्रश्नस्ताविक केले. या वेळी त्यांच्याच पुनर्मुद्रित ‘वासुदेवाची आरोग्यवाणी’ या पुस्तकाचे पुन्हा प्रकाशन प्रश्नचार्य वि. म. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. कवी दत्ता हलसगीकर यांनीही कविता सादर केल्या. सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, कवी नारायण कुलकर्णी, उद्योजक किशोर चंडक, सुधाकर देशमुख, अ‍ॅड. जे. जे. कुलकर्णी, डॉ. निनाद शहा, सिद्राम पुराणिक, डॉ. राजा ढेपे, सुभेदार बाबूराव पेठकर, शशिकांत लावणीस, सुरेखा शहा, दीपक कलढोणे आदींची या कार्यक्रमास प्रश्नमुख्याने उपस्थिती होती.

दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी सर्वसाधारण लाभार्थीना घरकुले
सोलापूर, २३ जून/प्रतिनिधी
सोलापूरचे पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने सोलापूर जिल्ह्य़ासाठी इंदिरा आवास योजनेंतर्गत मोठय़ा प्रमाणात घरकुले मंजूर झाली असून, त्यात दक्षिण सोलापूर तालुक्यास ७६९ घरकुले मिळणार आहेत. विशेष म्हणजे या मंजूर घरकुलांपैकी तब्बल ७४८ घरकुले सर्वसाधारण गटासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती दक्षिण सोलापूर तालुका पंचायत समितीचे सभापती उमाकांत राठोड यांनी दिली. इंदिरा आवास योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून प्रत्येकी ४३ हजार ५०० रुपयांप्रमाणे ७६९ घरकुलांसाठी तीन कोटी ४६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या योजनेचा हा पहिला टप्पा असून, यात सर्वसाधारण लाभार्थीसाठी जास्त प्रमाणात उद्दिष्ट देण्यात आल्याचे सभापती राठोड यांनी सांगितले. पालकमंत्री मोहिते-पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे घरकुले मंजूर झाली असताना त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील केंद्रेकर यांचे योगदान उल्लेखनीय ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

कृष्णा पाटील उद्या सांगलीत
सांगली, २३ जून / प्रतिनिधी
एव्हरेस्ट शिखर सर करणारी महाराष्ट्राची कन्या कृष्णा पाटील ही दि. २५ जून रोजी सांगलीत येत असून विविध संस्थातर्फे तिच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती इमेज पब्लिकेशन्स बारामतीचे सांगली जिल्हा विकास अधिकारी रमेश सरडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कृष्णा पाटील हिने दुर्दम्य आत्मविश्वास व जिद्द ठेवून एव्हरेस्ट शिखर सर केले. ही अभिमानाची गोष्ट आहे. ती इमेज या शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी परीक्षापध्दती आणणाऱ्या संस्थेची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून सांगलीत येत आहे. दि. २५ जून रोजी सकाळी अकरा वाजता मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय येथे पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्याहस्ते सत्कार करण्यात येणार आहे. दुपारी बारा वाजता जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांच्याहस्ते सत्कार करण्यात येईल. सांगलीकरांनी कृष्णा पाटील हिचे दिमाखात स्वागत करावे, असे आवाहन श्री. सरडे यांनी केले आहे.

बालकामगारांच्या समस्येवर सर्व घटकांचे प्रयत्न आवश्यक - न्या.शर्मा
माळशिरस, २३ जून/वार्ताहर

दिवसेंदिवस बालकामगारांची समस्या जटिल होत असून, समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊनच त्यावर तोडगा काढला पाहिजे, असे प्रतिपादन येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. शर्मा यांनी केले. अकलूज ग्रामपंचायत माळशिरस विधी सेवा समिती व वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अकलूजच्या कर्मवीर बाबासाहेब माने पाटील खुले नाटय़गृहात बालकामगार विरोधी सप्ताहाचा सांगता समारंभ त्यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी येथील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश एस. एस. साळवे, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस. एस. ओझा, तसेच व्ही. एम. सुंदाळे, आर. डी. गाडवे, अकलूजचे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील आदी उपस्थित होते. दुकाने व वजनमापे निरीक्षक दत्ता जाधव यांनी प्रश्नस्ताविक केल्यानंतर न्या. साळवे, अ‍ॅड. दिलीप फडे व किशोरसिंह माने पाटील यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. कार्यक्रमासाठी अकलूज व परिसरातील उद्योजक, व्यावसायिक, हॉटेल, दुकान मालक व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. उपसरपंच बाळासाहेब सणस यांनी आभार मानले, तर अ‍ॅड. दत्ता आडत यांनी सूत्रसंचालन केले.

महादेव कोळी समाज संघाचा धरणे आंदोलनासह घंटानाद
सोलापूर, २३ जून/प्रतिनिधी
विस्तारित सेवा क्षेत्रातील महादेव कोळी समाजातील अनेक कर्मचाऱ्यांना १०-१० वर्षे सेवाकाल होऊनही जातपडताळणीच्या माध्यमातून नोकरीतून कमी केले जात असल्याच्या प्रश्नावर महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या वतीने येत्या २६ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनासह हलगी व घंटानाद करण्यात येणार आहे. महादेव कोळी बांधवांचे जातीचे दाखले खोटे ठरवून त्यांना नोकऱ्यांतून कमी करण्याचा सपाटा लावण्यात येत असून, या प्रश्नावर यापूर्वी अनेक वेळा आंदोलने झाली. परंतु शासनाकडून केवळ आश्वासनाखेरीज काहीही पदरात पडले नाही. १५ जून १९९५च्या शासननिर्णयाची व्याप्ती ४ जून २००३ पर्यंत वाढविण्याचे आश्वासन शासनाने देऊनसुद्धा त्याची पूर्तता झाली नाही. त्यामुळे संघटनेने आक्रमक भूमिका घेत या प्राावर तीव्र आंदोलनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार दि. २६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, हलगी आणि घंटानाद करण्यात येणार असल्याचे संघटनेचे शहराध्यक्ष संजीवकुमार कोळी, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बैगालोलू, महिलाध्यक्षा कमल ढसाळ, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पंचप्पा हुग्गे यांनी कळविले आहे.

वसंत व्याख्यानमालेचे आज उद्घाटन
सांगली, २३ जून/प्रतिनिधी

सांगली महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वसंत व्याख्यानमालेचे उद्घाटन बुधवार दि. २४ जून रोजी सायंकाळी सहा वाजता वि. स. खांडेकर वाचनालयात करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या वि. स. खांडेकर वाचनालयाच्या सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत या व्याख्यानमालेचे आयोजन केले असून, महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या हस्ते उपमहापौर शेखर इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली या व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन समारंभास स्थायी समितीचे सभापती हरिदास पाटील, आयुक्त दत्तात्रय मेतके उपस्थित राहाणार आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेत अनुक्रमे प्रश्न. अरुण घोडके यांचे ‘असे होते शंभुराज’, प्रश्न. बापू जाधव यांचे ‘बदलत चाललेली शहरी संस्कृती’, मधुकर काकडे यांचे ‘भन्नाट माणसं’ हा एकपात्री प्रयोग, प्रश्न. नामदेव माळी यांचा ‘हसत-खेळत जगण्याचा मूलमंत्र’ हा विनोदी कार्यक्रम, तर श्रीराम पच्छिंद्रे यांचे ‘साहित्य, पत्रकारिता व समाज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि. २४ ते २८ जूनदरम्यान वि. स. खांडेकर वाचनालयाच्या हॉलमध्ये दररोज सायंकाळी साडेसहा वाजता व्याख्यानमाला होणार आहे. या व्याख्यानमालेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

गोपाळ महाराजांना समर्थ पुरस्कार प्रदान
सातारा, २३ जून / प्रतिनिधी

सज्जनगड येथील श्री रामदास स्वामी संस्थानच्या वतीने देण्यात येणारा श्री समर्थ रामदास स्वामी पुरस्कार या वर्षी जुक्कल (आंध्र प्रदेश) येथील मठाधिपती श्री गोपाळमहाराज रामदासी यांना करवीर पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य स्वामी विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते जुक्कल येथे नुकताच प्रदान करण्यात आला असल्याची माहिती सज्जनगड संस्थानचे अध्यक्ष व अधिकारी स्वामी सु. ग. तथा बाळासाहेब स्वामी यांनी दिली. आंध्र प्रदेशातील जुक्कल येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास समर्थ वंशज सु. ग. स्वामी, भूषण स्वामी, प्रसाद स्वामी. ऋग्वेदाचार्य वासुदेवशास्त्री जोगळेकर, धर्मप्रश्नण पंडित प्रवर गणेश्वरशास्त्री द्रविड पंढरीनाथ महाराज देगलूरकर आदी मान्यवरांसह हजारो समर्थभक्त उपस्थित होते. श्री समर्थ रामदास स्वामींच्या लोककल्याणकारी तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसारासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराने गौरविण्यात आलेले गोपाळमहाराज रामदासी यांनी आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र तसेच देशातील विविध भागात तेलगु, मराठी, हिंदी व संस्कृत भाषेतून श्रीसमर्थ चरित्र व साहित्याचा प्रसार केला आहे. वेद वेदांत, षट्शास्त्र, ज्योतिष आदी क्षेत्रात त्यांचा गाढा व्यासंग आहे. सज्जनगड संस्थानच्या वतीने देण्यात येणारा पुरस्काराचा उपक्रम स्तुत्य आहे. श्रीसमर्थाच्या विचारांची व त्यांच्या आचाराची आज समाजाला खरी गरज आहे, असे गौरवोद्गार शंकराचार्य स्वामी विद्यानृसिंह भारती यांनी काढले.