Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

वसंतदादा कारखाना कामगारांचा मदन पाटील यांच्या घरावर मोर्चा
सांगली, २३ जून / प्रतिनिधी

 

वसंतदादा साखर कारखाना कामगारांनी आपल्या आंदोलनाच्या एकविसाव्या दिवशी कारखान्याचे अध्यक्ष रोहयोमंत्री मदन पाटील यांच्या घरावर मोर्चा काढून साखर कामगारांचे प्रश्न सोडविता येत नसतील, तर मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास द्यावा, अशी मागणी करीत अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा दिला. कामगारांनी आज दिवसभर कारखान्याच्या संचालकांच्या घरासमोर तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर निदर्शने केली.
वसंतदादा कारखान्यातील कामगारांची थकीत देणी द्यावीत, या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी कारखान्याच्या कामगारांनी गेले २० दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. परंतु त्याची दखल घेतली नसल्यामुळे आज संतप्त होऊन कामगारांनी रोहयोमंत्री मदन पाटील यांच्या घरावर मोर्चा काढला. कामगारांची देणी भागविण्यासाठी अल्कोहोल, अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड विकावे किंवा मालमत्ता तारण ठेवून कर्ज घ्यावे, असा सल्ला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुंबईत देण्यात आला होता. त्यामुळे कामगारांनी आपल्या आंदोलनाची दिशा बदलली असून, आता संचालकांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. मदन पाटील यांनी कामगारांचा विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा कामगार गप्प बसणार नाहीत, असा इशारा कामगार नेते आर. बी. शिंदे यांनी दिला. कामगारांचा मोर्चा मदन पाटील यांच्या घरासमोर आला असता ते घरी नाहीत, असे सांगण्यात आले. कामगारांनी जोरदार घोषणाबाजी करून मदन पाटील यांचा निषेध केला.
त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर निदर्शने करून बँकेच्या संचालकांना कामगारांची देणी देण्यासाठी बँकेने कारखान्याला सहकार्य करावे, असे आवाहन केले. या वेळी बँकेचे व कारखान्याचे संचालक डी. के. पाटील यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, कारखान्याचे जिल्हा बँकेकडे १०१ कोटी रुपयांचे कर्ज असून ३४ कोटी रुपयांचे शॉर्ट मार्जिन आहे. त्यामुळे जिल्हा बँक अथवा राज्य बँक कारखान्याला पैसे देणार नाही. कामगारांचे व कारखान्याचे प्रश्न सोडवायचे असतील, तर कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला देणे, हा एकमेव उपाय आहे. त्यादृष्टीने मी संचालक मंडळाची तातडीची बैठक बोलवून निर्णय घेण्यासंदर्भात मदन पाटील यांना विनंती केली आहे. परंतु त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. या प्रश्नावर तोडगा निघाला नाही, तर माझ्यासह काही संचालक राजीनामा देतील व कामगारांच्या पाठीशी राहतील, असे आश्वासन डी. के. पाटील यांनी दिले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेनंतर केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्या निवासस्थानासमोर कामगारांनी आंदोलन केले. तसेच दिवसभर कारखान्याच्या संचालकांच्या घरासमोर निदर्शने केली.