Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

वीजनिर्मिती यंत्रे लवकर बनवून देण्याचे आदेश - विलासराव
कोल्हापूर, २३ जून/प्रतिनिधी

 

वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या अवजड यंत्रांची निर्मिती करण्याचे काम माझ्याच नियंत्रणाखाली असलेल्या ‘भेल’ या औद्योगिक संस्थेतून केले जाते. अवजड यंत्रे लवकरात लवकर तयार करून ती महाराष्ट्राकडे अग्रक्रमांकाने पाठवून देण्याचे आदेश मी माझ्या मंत्रालयाला दिले असल्यामुळे २०१२ साली महाराष्ट्र राज्य भारनियमनमुक्त होईल, असा ठाम विश्वास अवजड उद्योगाचे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी आज येथे बोलताना व्यक्त केला. करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला या गावी आमदार पी.एन.पाटील यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभ व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे सहकारमंत्री व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील हे होते. शिरोली दुमाला येथे आयोजित केलेल्या या समारंभात विलासराव देशमुख यांनी हा समारंभ म्हणजे आमदार पी.एन.पाटील यांच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी आपल्या संपूर्ण भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करून कोणतीही राजकीय टोलेबाजी केली नाही. केंद्रीय मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल विलासराव देशमुख यांचा, तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल मदन पाटील यांचा आणि लातूर राखीव मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल काँग्रेसचे कार्याध्यक्ष जयवंतराव आवळे यांचा या समारंभात सत्कार करण्यात आला.
जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची दहा वर्षाची कारकीर्द यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल आमदार पी.एन.पाटील यांचाही विलासराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. देशातील १६ राज्यांमध्ये अवजड उद्योगांचे जाळे आहे. महाराष्ट्र ही देशाची औद्योगिक राजधानी असतानाही अवजड उद्योग चालविणाऱ्या उद्योगपतींची पावले महाराष्ट्राकडे फारशी वळलेली नाहीत. सध्या या आव्हानात्मक खात्याचा मी अभ्यास करतो आहे. आजारी पडलेल्या अवजड उद्योगांना संकटातून बाहेर काढावयाचे आहे. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर एखादा अवजड उद्योग महाराष्ट्रातील कोल्हापुरात आणण्याचा माझा प्रयत्न राहील, असे विलासराव देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले.
जयवंतराव आवळे यांना मी माझी कर्मभूमी असलेल्या लातूर येथून खासदार म्हणून दिल्लीत पाठवले. आवळे हे राजर्षी शाहूंच्या भूमीतील आहेत. त्यांना निवडून देऊन लातूरच्या जनतेने राजर्षी शाहू महाराजांच्या ऋणातून मुक्त होण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे, असे सांगून विलासराव देशमुख म्हणाले की, काँग्रेसमध्ये निष्ठेला फार महत्त्व असते.
मुख्यमंत्रिपदावरून मी खाली उतरल्यानंतर माझ्यावर राज्याच्या प्रचाराची धुरा श्रेष्ठींनी सोपविली. जवळपास गडचिरोलीपासून निपाणीपर्यंत ३५ हजार किमीचा प्रवास यानिमित्ताने केला. राज्यातून काँग्रेसचे १७ खासदार दिल्लीत पाठवले. बाभुळगावचा सरपंच ते केंद्रीय मंत्री हा माझा प्रवास काँग्रेसनिष्ठेमुळेच झाला असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचा मी दोनवेळा मुख्यमंत्री झालो. पण सत्तेत नसतानाही माझ्या पाठीमागे ठामपणे राहाणाऱ्या पी.एन.पाटील यांना मी मंत्री करू शकलो नाही, याबद्दल खंत व्यक्त करून येत्या विधानसभा निवडणुकीत पी.एन.पाटील यांना निवडून द्या. त्यांना मंत्री करायची जबाबदारी माझी, असेही विलासराव देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले. तेव्हा उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांचा कडकडाट केला.
पी.एन.पाटील यांनी प्रश्नस्ताविक भाषण केले. स्वागत गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी केले, तर राज्याचे महिला व बालकल्याणमंत्री मदन पाटील यांनी महिलांच्या बचतगटांना चार टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा, तसेच राज्यात नवीन १२ हजार ८०० अंगणवाडय़ा सुरू करण्याचा, तसेच अंगणवाडीतील बालकांच्या पोषण आहाराची रक्कम दोन रुपयांवरून चार रुपयापर्यंत करण्यात आली असल्याचे सांगितले. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सरसकट कर्जमाफीतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना २० हजार रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय लवकरच अमलात येईल, असे सांगितले.